भागल्याचे तारू शिणल्
3217.
भागल्याचे तारू शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥१॥
ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाचीच राशी पांडुरंग ॥धृपद॥
सकळा सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळा ॥२॥
तुका म्हणे येथे आता उरे कैचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥३॥
अर्थ :
ही विठाबाई माऊली संसारसमुद्रामध्ये भागलेल्या भक्तांची नौका शिणलेल्या भक्तांची सावली आणि भुकेल्या भक्तांना प्रेम पान्हा पाजणारी आहे. अशी ही कृपाळू अनाथांची सखी पाडूरंग माऊली सुखाची राशीच आहे. अहो ही विठाबाई माऊली सगळयांवर कृपादृष्टी करण्यासाठी भक्तांच्या सन्मुखच उभी राहते त्यांच्या दृष्टीपुढेच राहते आणि भक्तांची भेट होण्यासाठी ही फार उतावीळ होते भक्तांशी फार उतावीळपणाने वाट पाहात असते. तुकाराम महाराज म्हणतात, मग असेही असताना अनेक जन्मीचा शीणभाग तरी कसा राहील ?
