देह गेह कर्म सारुनी
162.
देह गेह कर्म सारुनी । शेजे पहुडली निज समाधानी ।
कृष्ण वेणु गीत ये श्रवणीं । वृत्ति उचलली भेटी लागुनी वो ॥१॥
जीवी लागले हरीचें ध्यान । कांही केलिया न राहे मन ।
प्रेम पडीभरें येतसे स्फुदोन । हरिचरणीं ते वेधिलें मन वो ॥२॥
लाज सांडोनि जाले निर्लज्ज । सासू सासर्यांसी नाही मज काज ।
माया माहेर अंतरले सहज । हरिचरणीं तो वेधले निज वो ॥३॥
चिदाकाशींचे स्वच्छ चंदिणे । कृष्ण प्रभा ते चंद्र परिपुर्ण ।
ध्येय ध्याता खुंटले तेणे गुणे । एका जनार्दनी सहज एकपणे वो ॥४॥
