लाज वाटे पुढे तोंड द
2087.
लाज वाटे पुढे तोंड दाखविता । परि जाऊ आता कोणापाशी ॥१॥
चुकलिया कामा मागतो मुशारा । लाज फजितखोरा नाही मज ॥धृपद॥
पाय सांडूनिया फिरतो बासर । स्वामिसेवे चोर होऊनिया ॥२॥
तुका म्हणे मज पाहिजे दंडिले । पुढे हे घडले न पाहिजे ॥३॥
अर्थ :
देवा मी तुझी आज पर्यंत काहीच सेवा केली नाही त्यामुळे मला तुला तोंड दाखवण्याची देखील लाज वाटते परंतु आता मी जाऊ तरी कोणाजवळ? अहो मी कोणत्याही प्रकारची सेवा न करता केवळ कामचुकारपणा करून देखील तुम्हाला कामाचा मोबदला मागतो आहे खरोखरच माझ्यासारख्या फजीत खोर माणसाला लाजच नाही. माझ्या स्वामीच्या पायाची सेवा करायची तर मी ते पाय सोडून मनमौजे प्रमाणे कोठेही फिरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या या अशा वागण्यामुळे मला दंड केला पाहिजे कारण पुढे अशी चूक माझ्याकडून घडू नये म्हणून.
