नक्र उद्धार अभंग
1.
नक्र उद्धार अभंग
नक्र बोले ऐके हृ्षीकेशी । नाममात्रे तारिले गजेंद्रासी ।
काय कृपण झाले मजविशी । आता कैसा बा मोकलूनि जासी ॥१॥
कळले तुझे देवपण आता । सोडी ब्रीद आपुले दीनानाथा ॥धृ॥
दीनानाथा म्हणविशी कशासाठी । व्दैतभाव त्वा धरियेला पोटी ।
कैसे पाप लाविले माझे पाठी । तुझे रुप देखिले आजि दृष्टि ॥२॥
दीनानाथ बोलती वेद चारी । साधुसन्त गाताती नानापरी ।
सत्य ब्रीद मिरवत चराचरी । सोडी ब्रीद आपुले झडकरी ॥३॥
रज मात्रे तारिली अहिल्या शिळा । नामे करुनि उद्धरिले अजामेळा ।
पापी कैसा मी घननीळा । तुझे रुप देखिले म्या आजि डोळा ॥४॥
न्याय ब्रीद घेईन तुझे आता । पापी कैसा मी सांग दीनानाथा ।
कैसे पाप मारिले माझ्या माथा । अझूनि लाज का नये तुझ्या चित्ता ॥५॥
नक्र बोले देवासी हांसू आले । निंदा नोहे स्तवन माझे केले ।
दीनानाथे तात्काळ उद्धरिले । विष्णुदास नामा कौतुके बोले ॥६॥
नक्र उध्दार अभंग समाप्त
