चित्त घेऊनिया तू काय
2176.
चित्त घेऊनिया तू काय देसी । ऐसे मजपासी सांग आधी ॥१॥
तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघे जया तुटी येईल ते ॥धृपद॥
रिद्धिसिद्धि काही दाविसी अभिळास । नाही मज आस मुक्तीची ही ॥२॥
तुका म्हणे तुझे माझे घडे तर । भक्तीचा भाव रे देणे घेणे ॥३॥
अर्थ :
देवा तु माझे चित्त घेऊन त्या बदल्यात मला काय देशील ते आधी सांग. हे पंढरीराया तरच आपल्या मध्ये व्यवहार होईल आणि एक लक्षात ठेव जे घेण्यापासून माझे नुसकान होणार आहे ते मी घेणार नाही. देवा मला रिद्धी सिद्धी अशी काही अभिलाषा दाखवू नको आणि मला मुक्तीची ही अपेक्षा नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा जर तुझ्यात आणि माझ्यात घेण्या देण्याविषयी काही करायचेच असेल तर माझे चित्त तु घे आणि तुझा भक्तिभाव मला दे एवढेच कर.
