ऐक पांडुरंगा वचन माझ
2812.
ऐक पांडुरंगा वचन माझे एक । झालो मी सेवक दास तुझा ॥१॥
कळे तैसा आता करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढे ॥धृपद॥
दंभ मान माझा करू पाहे घात । झालिया ही थीत कारणाचा ॥२॥
हीन बुद्धी माझी अधम हे याती । अहंकार चित्ती वसो पाहे ॥३॥
तुका म्हणे मज बिघडता क्षण । नलगे जतन करी देवा ॥४॥
अर्थ :
हे पाडूरंगा माझे एक बोलणे तू ऐक ते म्हणजे असे की मी तुझा अन्न्यसेवक दास झालो आहे. देवा आता तुला जसा कळेल तसा माझा उध्दार कर यापुढे माझा विचारच खुंटला आहे. मी कोणतेही कार्य केले आणि ते पूर्ण झाले तर मला त्याचा अभिमान आणि दंभ होत आहे आणि अभिमान व दंभ हेच माझा घात करण्यासाठी टपलेले आहेत. माझी बुध्दी हीन आहे माझी जात देखील अधम आहे तरी देखील अहंकार माझ्या चित्तात वास्ताव्या करण्याचे पाहात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला बिघडण्यासाठी एक क्षण देखील लागणार नाही त्यामुळे तुम्ही माझे जतन करावे असे मला वाटते.
