मृगाचिया अंगी कस्तुर
3369.
मृगाचिया अंगी कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥
भाग्यवंत घेती वेचूनिया मोले । भारवाही मेले वाहता ओझे ॥धृपद॥
चंद्रामृते तृप्तिपारणे चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥२॥
अधिकारी येथे घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसे ॥३॥
तुका म्हणे काय अंधळिया हाती । दिले जैसे मोती वाया जाय ॥४॥
अर्थ :
हरणाच्या अंगामध्ये कस्तुरी असते व तिचा वास सर्वत्र पसरलेला असतो हरीणच खरा कस्तुरीचा अधिकारी असतो परंतू त्याला अज्ञानामुळे कस्तुरी कोठे आहे व त्याचे मौल्य काय हे माहित नसते. जे भाग्यवंत आहेत तेच चांगल्या वस्तूची मोल देऊन खरेदी करतात परंतू जे ओझे वाहणारे आहेत ते ओझे वाहू वाहूच मरतात. चंद्रामृताचे पान पिऊन चकोर तृप्त होतो आपले पारणे फेडतो तोपर्यंत तो उपाशीच परंतू चंद्रामृताचा आस्वाद चंद्राला घेता येत नाही भ्रमर फुलाचा सुगंधाचा आस्वाद घेतो परंतू फुलाला त्याच्या सुगंधाचा आस्वाद घेता येत नाही. याचा अर्थ असा जो अधिकारी मनुष्य आहे तोच मुख्य सार घेऊ शकतो कारण त्याला तशी हातोटी आलेली असते रत्नाची पारख असलेला मनुष्य जसा रत्नाची पारख करु शकतो अगदी त्याप्रमाणे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे आंधळयाच्या हातात जर मोती दिला तर तो मोती वायालाच जातो त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील भक्तीचा अधिकार ज्याला आहे त्यानेच भक्ती करावी अन्यथा कोणीही भक्ती केली तर ती व्यर्थ ठरते.
