कइ तो दिवस देखेन डोळ
2919.
कइ तो दिवस देखेन डोळा । कल्याण मंगळामंगळाचे ॥१॥
आयुष्याच्या शेवटी पायासवे भेटी । काळवेळ तुटी झाल्या तरे ॥धृपद॥
सरो हे संचित पदरींचा गोवा । उताविळ देवा मन झाले ॥२॥
पाउलापाउली करिता विचार । अनंतविकार चित्ता अंगी ॥३॥
म्हणउनि भयाभीत होतो जीव । भाकितसे कीव अट्टाहासे ॥४॥
दुःखा च्या उत्तरी आळविले पाय । पाहणे ते काय अजून अंत ॥५॥
तुका म्हणे होईल आइकिले कानी । तरि चक्रपाणी धाव घाला ॥६॥
अर्थ :
सर्वात कल्याणकारी आणि मंगळातही मंगळ असलेला दिवस असा मी कधी माझ्या डोळयाने पाहीन ? आयुष्याच्या शेवटी जर हरीच्या पायाची भेट जर घडली तरच मी भवसागर तरुन जाऊ शकेल. देवा माझ्या पदरी जे संचित कर्म बांधलेले आहे ते तुटून जावो ते नाश पावो यासाठी माझे मन उतावीळ झाले आहे. या प्रपंचामध्ये जर पावला पावलाला विचार केले तर अनेक प्रकारचे विकार आपल्या चित्तामध्ये येतात. त्यामुळे देवा माझा जीव भयभीत होत आहे व त्यामुळेच मी तुला देवा अट्टाहासाने काकूळतीला येऊन करुणा भाकीत आहे. मी दु:खी झालो आहे व दु:खपूर्ण शब्दांनी तुझ्या पायाला आळवीत आहे तरी देखील तू अजून माझा काय अंत पाहात आहेस देवा ? तुकाराम महाराज म्हणतात, अहो चक्रपाणी मी तुम्हाला ज्या दिवशी पूर्ण शब्दाने करुणा भाकील ते तुम्ही तुमच्या कानाने ऐकले तर माझ्याकडे तुम्ही धाव घाला.
