रामनामे तृप्त जे नर
787.
रामनामे तृप्त जे नर जाहले । पुनरावृत्ती न आले संसारासी ॥१॥
जाणार जाणार सर्व हे जाणार । रामनाम साचार जप करी ॥२॥
अभ्राची छाया मृगजळाचें जळ । तैसा हा देह केवळ मिथ्या असे ॥३॥
मिथ्याचें सत्य मनिती गव्हार । रामनामी विसर पडोनि ठेला ॥४॥
विसरुनी राम करिशी प्रपंच धंदा । भुललासी मतिमंदा नाशिवंता ॥५॥
नाशिवंतासाठी रडतोसी काह्मा । एका जनार्दनी पाया शरण रिघे ॥६॥
