पाळीला विधी तो आजि फ
1934.
पाळीला विधी तो आजि फळा आला । ऐसा हा कळला साच भाव ॥१॥
नामाची आवडी लागलीसे चित्ता । पाय आठविता सुख वाटे ॥धृपद॥
धरिल्या देहाचे साधले कारण । पुढील्या खंडन गर्भवासा ॥२॥
तुका म्हणे लाभ झाला एक सरे आणिक दुसरे नाही आता ॥३॥
अर्थ :
आजवर मी नेमाने जो विधी पाळला, पांडुरंगाची जी सेवा केली ती आज खऱ्याअर्थाने फळास आली. त्यामुळे मला जो खरा भाव गवसला आहे, माझ्या मनात विठुरायासाठी जी ओढ निर्माण झाली आहे ती याच विधीचा परिणाम आहे. त्यामुळे माझ्या चित्ताला नामाची आवड निर्माण झाली असून विठोबाचे पाय आठवताच सुख प्राप्त झाल्याचे अनुभवास येते. त्याप्रमाणे नरदेह लाभल्याचे कारण आता मला उमगले असून त्यानिमित्ताने आता पुढील गर्भवासाच्या दुःखातून म्हणजेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात असा हा लाभ इतक्या सहज आणि सरळ कळून आला की आता दुसरे काहीही कारण मला दिसत नाही आणि इतर कशातच माझे मन आता अडकत नाही.
