॥ श्रीएकनाथमहाराजकृत
17.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
किष्किंधाकांड
॥ सतरावा ॥
हनुमंताचे समुद्रावरुन उड्डाण
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
आख्याता गृध्रराजेन समुत्पत्य प्लवंगमाः ।
संगताः प्रीतिसंयुक्ता विनेदुः सिंहविक्रमाः ॥१॥
संपातीकडून सीतेची माहिती मिळाल्यामुळे वानरांना आनंद :
संपातीनें सीताशुद्धी । यथार्थ सांगितली बुद्धी ।
तेणे वानरांची मांदी । जयजयशब्दीं गर्जत ॥१॥
मिळोनि वानरांचा भार । सिंहनादाहूनि थोर ।
करिते जाले भुभुःकार । सीता सुंदर सांपडली ॥२॥
येरयेरा आलिंगण । येरयेरा अभिनंदन ।
सीता सांपडली चिद्रत्न । हर्षे उड्डाण करिताती ॥३॥
आमच्या कष्टांची जाली सिद्धी । आजि पावली सीताशुद्धी ।
म्हणोनि वानरांची मांदी । हर्षानुवादीं डुल्लत ॥४॥
येरयेरा दाविती वांकुल्या । येरयेरा करिती गुदगुल्या ।
सत्य सीताशुद्धी जालिया । आमची फिटली आशंका ॥१०५॥
अंगदे बैसोनि सपरिवार । शतयोजन हा सागर ।
उल्लंघो शके कोण वीर । तो विचार मांडिला ॥६॥
पाचारोनिया जुत्पती । समुद्रालंगनाचा अर्थी ।
कोणासी किती आहे शक्ती । तं समस्तीं सांगावे ॥७॥
अथांगदवचः श्रुत्वा सर्वे वानरपुंगवाः ।
स्वां स्वां गतिं समुत्साहमूचुस्तत्र समाहिताः ॥२॥
गजो गवक्षो गवयः शरभो गंधमादनः ।
मैदश्च द्विविदश्चैव सुषेणो जांबवान्नलः ॥३॥
अंगदाच्या प्रश्नावरुन वानरांचा पराक्रम :
ऐकोनि अंगदवचनोक्ती । अकरा जण सेनापती ।
समुद्रलंघनाचे अर्थीं । आपुलाली शक्ती सांगती ॥८॥
गज सांगे निजनिर्वाण । दश योजने मज उड्डाण ।
गवाक्ष बोले प्रमाण । त्याहूनि द्विगूण शक्ति माझी ॥९॥
शरभ सांगे अति निगुतीं । तीस योजने माझी शक्ती ।
चाळीस योजनांची गती । बोले पुरुषार्थीं वृषभ तो ॥१०॥
शक्ति बोले गंधमादन । पन्नास योजने मज उड्डाण ।
मैंद बोलिला आपणासाठी योजने शक्ति माझी ॥११॥
द्विविद आपुली थोरी । उड्डाण योजने सत्तरी ।
सुषेण महावीर वानरी । सरीं नांवावरी नेवों नये ॥१२॥
तारेचा पिता जो सुषेण । पश्चिमशोधा धाडिला जाण ।
त्याचेनि नावें वीर आन । त्याचे उड्डाण चार विसा ॥१३॥
सांगावया निजपुरुषार्थ । लज्जायमान जांबवंत ।
सुखी न करवेचि श्रीरघुनाथ । बळाचा घात वार्धक्यें ॥१४॥
जांबवंताचा पराक्रम :
मज तारुण्यावस्था असती । तै आणूनि सीता सती ।
सुखी करितो श्रीरघुपती । गेली शक्ती वार्धक्ये ॥१५॥
किंतु वक्ष्याम्यहं वीर्यमात्मनो यौवनोदये ।
सुषेणेन मया चैव वलियज्ञे सनातनः ॥४॥
प्रदक्षिणीकृतः पूर्व क्रममाणस्रिविक्रमः ।
विक्रमेण मया तात सशैलवनकानना ॥५॥
त्रिःसप्तकृत्यःपृथिवी परिक्रांता प्रदक्षिणम् ॥६॥
माझे तारुण्यपुरुषार्था । माझा मी सांगेन आता ।
करू नका उपहासता । समूळ कथा अवधारा ॥१६॥
बळियज्ञीं नारायण । वामनरुपी जावोनि आपण ।
करावया बळीचें छळण । जाला आपण त्रिविक्रम ॥१७॥
तेणे काळी मी आणि सुषेण । दोघा पूर्ण तारुण्यपण ।
करावया त्रिविक्रमप्रदक्षिण । दोघे जण निघालों ॥१८॥
त्रिवार करिंतां प्रदक्षिण । सुषेणाची शक्ति क्षीण ।
चालता मेटे वळली जाण । मूर्च्छापन्न तो पडिला ॥१९॥
ते काळी माझी आंगवण । लक्षोनि त्रिविक्रमचरण ।
पृथ्वी सशैलवनकानन । केले प्रदक्षिण त्रिःसप्त ॥२०॥
एकवीस वेळां एके उच्छवासी । करोनि पृथ्वीप्रदक्षणेसी ।
सवेंचि गेलों कैलासासी । महेशासी वंदावया ॥२१॥
गत्वा वेगेन कैलासमागतो विबुधालये ।
दैत्यः पर्वतहस्तः सन्देवेंद्रमभिपद्यत ॥७॥
बलदैत्यो मम पिता देवेंद्रेण हतः पुरा ।
इत्युक्त्वा पर्वंत तस्मै चिक्षेपासुरनंदनः ॥८॥
ततः पतनखेदात्तु पर्वतो जानुना धृतः ।
तेन भग्नश्च जानुर्मे जातोऽहं न्यूनविक्रमः ॥९॥
स कदाचिद्गतो हंतुं विबुधानृषिस तमान् ।
बलपुत्रमहं हत्वा क्रोधान्मृत्युमिवापरम् ॥१०॥
बलकथन :
वेगी जावोनि कैलासासी । वंदोनियां महेशासी ।
बळपुत्र आला स्वर्गासी । इंद्रादिकांसी वधावया ॥२२॥
बळ दैत्य माझा पिता । इंद्रें वधिला अवचिता ।
त्याचा सूड घेईन आता । करीन घाता इंद्राच्या ॥२३॥
येणे रागे दैत्यसुतें । मारावया इंद्रातें ।
पर्वत उचलोनियां हातें । कोपे अद्भुत चालिला ॥२४॥
इंद्रे हाणितलें वज्रघातें । वज्र घेलोनि डावे हातें ।
मग मारावया इंद्रातें । कोपे अद्भुत चालिला ॥२५॥
बळपुत्र महाबळी । पर्वत झेलोनि करतळी ।
करावया इंद्राची रांगोळी । क्रोधानळी चालिला ॥२६॥
येता देखोनि गिरिवर । स्वर्गी कांपती सुरवर ।
तो म्या झेलिला सत्वर । उडी अति शीघ्र घातली ॥२७॥
पर्वत झेलिला त्वरेंकरी । तो निसटला दोही करी ।
मग म्या धरिला जानूंवरी । अमरपुरी वांचविली ॥२८॥
क्रोधे येता बळपुत्रासीं । म्या दृढ युद्ध केले त्यासी ।
माझे बळे होता कासाविसी । लघु लाघवेंसीं पळूं पाहे ॥२९॥
पर्वतघातें भग्नचरण । तेणेंसी शीघ्र करोनि उड्डाण ।
बळपुत्राचा घेतला प्राण । तेणे सुरगण सुखावले ॥३०॥
तैंपासूनि भग्नचरण । माझी वार्धक्यें शक्ति क्षीण ।
तरी समुद्री उड्डाण । नव्वस योजने करीन ॥३१॥
नळ, नीळ जांबवंत वीर्यकथन :
नळ बोलिला आपण । समुद्रामाजी उड्डाण ।
सत्याण्णव योजने करीन जाण । त्यावरी त्राण मज नाही ॥३२॥
नीळ बोलिला वचन । एके उड्डाणे शत योजन ।
करीन समुद्रोल्लंघन । हे आंगवण पै माझी ॥३३॥
वालिसुत राजकुमर । अंगद जो का महावीर ।
समुद्रोल्लंघनप्रकार । निजनिर्धारे सांगत ॥३४॥
शतयोजनें अब्धिलंघन । एक उड्डाणे करीन जाण ।
पुढती यावयालागीं जाण । संदेहापन्न मति माझी ॥३५॥
एके उड्डाणे उठाउठी । जाईन समुद्रपरतटीं ।
तेथे आलिया राक्षसथाटी । युद्ध निजनेटीं होय नव्हे ॥३६॥
माझे अंगी बाळपण । नाही निवडली आंगवण ।
तरी स्मरोनि श्रीरामचरण । सीता साधीन निमेषार्धे ॥३८॥
ऐकोनि अंगदाचें उत्तर । वानरी केला जयजयकार ।
जुत्पती करिती जोहार । तू राजकुमर आतुर्बळी ॥३९॥
आम्ही असता सेवक सकळ । राजकुमर आणि तू बाळ ।
समुद्रलंघनाचें स्थूळ । तुजवरी सळ नये घालूं ॥४०॥
जांबवंत हनुमंताची स्तुती करितो :
अंगद म्हणे हे करिता । प्राण देणे लागेल समस्ता ।
सीताशुद्धीवीण जाता । अपमानता अनिवार ॥४१॥
तंव बोलिला जांबवंत ॥ हनुमंत वीर अति विख्य़ात ।
हा का उगाचि असे पहात । अत्यद्भुत प्रतापी ॥४२॥
बाळपणी आकळितां भानु । राहूचा निर्दळिला अभिमानु ।
याचा पिता प्रभंजनु । बळवाहनु हनुमंत ॥४३॥
त्यासी गर्भी ब्रह्मचर्यकौपीन । त्याचा देखणार रघुनंदन ।
माता अंजनी न देखे नग्न । ब्रह्मचारी पूर्ण कपिराज ॥४४॥
मारूतीचे उड्डाणकथन :
ऐसे बोलता जांबवंत । स्तवनें हरिखला हनुमंत ।
लांगूल त्राहाटिले रोमांकित । आल्हादयुक्त उठिला ॥४५॥
शतयोजनें अब्धिलंघन । ते माझे पादक्रमण ।
तुम्हांसी संदेह तो कोण । सीता आणीन निमेषार्घे ॥४६॥
करोनि रावणा उपहती । राक्षसा लावोनियां ख्याती ।
प्रतापें आणीन सीता सती । श्रीरघुपतिसुखार्थ ॥४७॥
आणिक एक विचार । तुम्हांसी सांगेन साचार ।
जेणे सुखी होय रघुवीर । तोही प्रकार मी करीन ॥४८॥
अवज्ञेनें आणितां सीता । कोप य़ेईल श्रीरघुनाथा ।
तरी गांजोनि लंकानाथा । शुद्धि मी आता आणीन ॥४९॥
महासंहननोपतौ महान्तौ पुरुषर्षमौ ।
ऋष्यमूकात्पुनः शैलादुभौ तौ रामलक्ष्मणौ ॥११॥
आनयिष्यामि वैदेह्याः सकाशं वानरर्षभ ।
आनयिष्यामि तां देवीं । रामस्य महिषीं प्रियाम् ॥१२॥
राक्षसासी राम लक्ष्मण । वीर शूर दोघे जण ।
सीतेपासी मी नेईन जाण । सकुळी रावण निर्दळावया ॥५०॥
ऋष्यमूकपर्वताहूनि जाण । घेवोनिया राम लक्ष्मण ।
घालीन लंकेवरी उड्डाण । सकुळी रावण मारावया ॥५१॥
अथवा मी आतुर्बळी । करीन राक्षसा रवंदळी ।
सीता आणीन रामाजवळी । हरिखें टाळी पिटित ॥५२॥
सीता आणीन रामापासी । का राम नेईन सीतेपासीं ।
अथवा शुद्धि आणिन तुम्हांपाशीं । या कार्यासी मी कर्ता ॥५३॥
लंकाद्वारीं रणकल्लोळीं । खेळेन शिरांची चेंडूफळी ।
लंकेची करीन होळी । तरी मी बळी हनुमंत ॥५४॥
सीताशुद्धि ते तंव किती । यालागी कायसी कुंथा-कुंथी ।
सुखी रहावे समस्तीं । लंकेप्रती मी जातो ॥५५॥
ऐंसें बोलोनि आपण । समस्तांसीं घालोनि लोटांगण ।
अंगदे दिधले आलिंगन । गर्जे गगन आल्हादे ॥५६॥
कपी हरिखले समस्त । त्यांसी हनुमंत बोलत ।
माझा उड्डाण अंगवात । सहावया शक्त तुम्ही नव्हां ॥५७॥
माझे उड्डाणाचे निजनेटें । महेंद्र पृथ्वीमाजी दाटे ।
पर्वतशिखरें होती पीठें । कडे कपाटें बुजतील ॥५८॥
उड्डाणाचा अंगवात । पर्वत तुटोनि तळी पडत ।
शिखरें तृणप्राय उडत । वृक्ष उपडत समूळी ॥५९॥
वृक्ष उपडोनि समूळी । परिभ्रमती अंतराळीं ।
शुष्क पर्णें वाहुटळी । तैशा वेळुजाळी उडतील ॥६०॥
उचंबळेल समुद्रजळ । तेणे तिमेल ध्रुवमंडळ ।
दिग्गज कांपती चळचळ । अति तळमळ जळचरां ॥६१॥
अंगवाताचेनि घर्घरें । बैसती मेघांची दांतोरें ।
समुद्रगडगर्जनविसरें । येतील शाहारे कळिकाळा ॥६२॥
त्या नादाचा धाक अति दुर्धर । सुर नर धाकती निशाचर ।
तेथे तुम्ही गा वानर । कैसेनि धीर धराल ॥६४॥
यालागी तुम्ही वानरगण । हात धरोनि अवघे जण ।
पर्वत कवळा सत्राण । तरीच प्राण उरतील ॥६५॥
दक्षिणेचे पर्वतकडे । तुटोनि पडती झडाडें ।
तुम्ही राहावे उत्तरेकडे । होवोनि गाढे सुलीन ॥६६॥
जैसा श्रीरामाचा बाण । तैसे करीन उड्डाण ।
लंकेमाजी प्रथम कंदन । बोहणी जाण मी करीन ॥६७॥
करीन इंद्रजितासी सळ । तुकीन रावणाचे बळ ।
राक्षसांचें अमित दळ । ते मी सकळ गांजीन ॥६८॥
पाडोनि राक्षसदांतांसी । त्याच्या मी करीन राशी ।
मग मोजून कुडवेंसी । घालीन सळेंसी रावण ॥६९॥
घेता लंकेची घरधांडोळी । जरी न लभे जनकबाळी ।
लंका उपडोनी समूळी । रामाजवळी आणीन ॥७०॥
इति तस्य ब्रुवाणस्य सर्वे वानरपुंगवाः ।
चक्रुः प्रशंसां मुदिताः शक्रस्येव मरुद्गणाः ॥१५॥
तस्य पुष्पवतीं चक्रुर्वनमालां महात्मनः ।
चफुस्ते वानरश्रेष्ठा ब्रहुभ्यां मंगलानि च ॥१६॥
स तैः परिवृतः श्रीमान्वानरैर्वानरर्षभः ।
आरुरोह नगश्रेष्ठं महेंद्रमरिमर्दनः ॥१७॥
वानरांना आनंद व हनुमंताचे उड्डाण :
ऐसे हनुमंताचे वचन । ऐकोनिया वानरगण ।
हर्षे वंदिले त्याचे चरण । जेंवी मरुद्गण इंद्रासी ॥७१॥
श्रीरामस्मरणलीला । त्याचि सुमनांच्या माळा ।
वानरी विचित्र घातल्या गळा । वनी वनमाळा शोभत ॥७२॥
परिवारला वानरभारी । इंद्रासमान ज्याची थोरी ।
त्या चढला महेंद्रगिरीं । लंकापुरी लक्षोनी ॥७३॥
करोनिया श्रीरामस्मरण । देवोनि वानरा आलिंगन ।
करावयासी उड्डाण । आल्हाद पूर्ण हनुमंता ॥७४॥
मुखी श्रीरामनाममुद्रा । ह्रदयीं धरोनि श्रीरामचंद्रा ।
उल्लंघावया समुद्रा । कपिकुंजरीं आल्हाद ॥७५॥
पाहता निजबाहूंचे त्राण । अंगा आले निजस्फुरण ।
लांगूल त्राहटिता जाण । रोमांच पूर्ण थरकती ॥७६॥
उड्डाणाची प्रतिक्रिया :
पुच्छ आदळितां बळी । शिळाशिखरां झाली रांगोळी ।
वृक्ष मिळाले पै धुळी । पुष्पी फळी समवेत ॥७७॥
पक्षी कळकळती आकाशी । महाप्रळय दिग्गजांसी ।
तरस तगर बिळवासी । सिंहसूकरांसी अति त्रास ॥७८॥
उड्डाण करिता महाबळी । पर्वत दाटला पायतळीं ।
तेणे तो रुपला भूतळीं । सर्प पाताळीं दडपले ॥७९॥
अर्धसर्प दडपतां एक । बाहेर काढोनियां मुख ।
सक्रोध वमितां पै विख । शिळा निःशेख भस्म होती ॥८०॥
जैसी उभारिलीं छत्रे । सर्पफणा तदाकारें ।
अर्ध दडपिलीं शरीरें । फुफूत्कारें गर्जती ॥८१॥
सर्पीं वर्मितां पै गरळ । उठती अग्नीचे कल्लोळ ।
विख सरलिया सकळ । अति विकळ तळमळती ॥८२॥
पर्वती दिव्यौषधी अनेक । दाटल्या स्त्रवती पीयूख चोख ।
तो रस लागताचि देख । निःशेष विख निमाले ॥८३॥
भारें दडपला पर्वतू । श्वेत पीत आरक्त धात ।
धारावर्तीं पै स्रवतू । तेणे शोभतू गिरिराज ॥८४॥
वामन जाला त्रिविक्रम । तैसा वाढला तो वानरोत्तम ।
दृढ धरिला आक्रम । पराक्रम स्वामिकार्या ॥८५॥
पर्वणी वाढे जेंवी समुद्र । तैसा वाढला कपींद्र ।
तेणे दचकला काळाग्निरुद्र । ऐसा भ्यासुर भासत ॥८६॥
समुद्रलंघनाचे कौतुक पाहण्यासाठी देवादिकांचा मेळावा जमला :
समुद्रलंगनकौतुक । पाहू आले ब्रह्मादिक ।
सुरवर दाटले अनेक । सिद्ध गुह्यक गंधर्व ॥८७॥
नानापरींच्या विमानपंक्ती । नभीं दाटल्या नेणो किती ।
कैसा कैसा उडेल मारुती । पहावया समस्ता आल्हाद ॥८८॥
उम रमा आणि सावित्री । पाहू आल्या नवही नारी ।
समुद्रामाजीं वानरी । कैसेपरी उडिजेल ॥८९॥
उड्डाणाचे वर्णन :
समुष्टि बाहु धरोनि पुढा । वळून पुच्छाचा आंकडा ।
बळे उडतां पै माकडा । पडिल तडा गिरीतटीं ॥९०॥
कडे खचले सागरी । शिखरें उडालीं अंबरी ।
समूळ वृक्ष वारेनिकरीं । गगनांतरी परिभ्रमत ॥९१॥
जैसा बोळवोनि अति आप्त । सुहृद माघारे परतत ।
तेंवी पाषाण वृक्ष समस्त । मागे पडत सागरी ॥९२॥
विकट वानरे दिधली हाक । दुमदुमिले तिन्ही लोक ।
कळिकाळें घेतला धाक । सुर सांशक विमानी ॥९३॥
जाणोनि पवनाची शक्ती । उल्लंघोनि मनोगती ।
लंका लक्षोनि मारुती । शीघ्रगती निघाला ॥९४॥
वेगे उडतां वानर । क्षोभे खवळला सागर ।
तेणे भुलले जळचर । येरा येर झोंबती ॥९५॥
अंगवातें मारुती । खुंटली रविचंद्रांची गती ।
ग्रहनक्षत्रें डळमळिती । निजात्मगती खुंटली ॥९६॥
हनुमंताच्या अंगदीप्तीं । नभीं शशि सुर्य लोपती ।
नक्षत्राच्या लाह्या होती । तेजे मारुती देदिप्यमान ॥९७॥
बाळसूर्याचा ओतिला । की शेंदुराचा रचिला ।
न तो कुंकुमाचा घडिला । तैसा देखिला हनुमंत ॥९८॥
हनुमंताच्या अंगप्रभा । नभत्व लोपताहे नभा ।
दिव्य तेजाचा निजगाभा । तैसी शोभा शोभत ॥९९॥
जैसा रामबाण नभाआंत । तैसा हनुमंत असे जात ।
साधावया स्वामिकार्यार्थ । त्वरान्वित मारुती ॥१००॥
हनुमंताच्या विश्रांतीसाठी जळातून वर यावे अशी सागराची मैनाद्रिला विनंती :
जैसे तप्तचामीकर । तैसा जातसे वानर ।
विश्राति द्यावया सत्वर । सांगे सागर मैनाद्री ॥१०१॥
मी सागराचा स्थापित । सूर्यवंशाचा नित्यांकित ।
त्वरेनें जातसे हनुमंत । रामकार्यार्थ साधावया ॥१०२॥
अस्य साह्यं देयमिक्ष्वाकुकुलवर्तिना ।
इक्ष्वाकुकुलजो रामो मम पूज्यतमः परम् ॥१८॥
कुरु साचिव्यमस्मांकं विना कल्पात्ययो भवेत् ।
सलिलादूर्ध्वमातिस्ठ विश्रमेच्च यथा कपिः ॥१९॥
मज पुज्यता सूर्यवंशी । साह्य व्हावे हनुमंतासी ।
विसांवा द्यावया वानरासी । अति त्वरेंसीं भागला ॥१०३॥
यालागी तुवा मैनाद्री । वेगी निघावें जळाबाहेरी ।
संमुख निघोनि झडकरी । कपींद्रा करी विश्रांती ॥१०४॥
हनुमान जातो त्वरेंकरीं । विलंब होता जाईल दूरी ।
इतकें माझे प्राधान्य करी । देई वानरा विश्रांती ॥१०५॥
विश्रांति दिधलिया वानरी । सेवा उपतिष्ठे श्रीरामचंद्री ।
पुढील मार्ग लंकापुरी । क्षणामाझारी पावेल ॥१०६॥
ऐके मैनाद्रि गिरिनाथा । विश्रांति दिधलिया हनुमंता ।
सुखसंतोष श्रीरघुनाथा । हे कार्य सर्वथा तुवं कीजे ॥१०७॥
सागराच्या सांगण्यावरुन मैनाद्री वर येतो :
ऐसे सांगता सागर । उल्लासें वाढला गिरिवर ।
सुद्वादफळें अरुवार । निर्मळ नीर कपिपूजा ॥१०८॥
विश्रांतीस्थळ अति प्रबळ । मंद सुगंध मयनानिळ ।
पंचम कूजती कोकिळ । झनत्कारे अलिकुळें ॥१०९॥
मागील जावोनि सकळ श्रम । पुढे विश्रांति पावे परम ।
ऐसा साधिला आराम । वानरोत्तम विश्रांती ॥११०॥
ऐसिया आरामकैवाडे । हनुमंताच्या मार्गापुढें ।
गिरि वाढला वाडेंकोडें । विश्रांतिचाडें कपींद्रा ॥१११।
मैनाद्री व हनुमंत यांची उंच होण्याची स्पर्धा :
वाढला देखोनि पर्वत । उंच वाढला हनुमंत ।
गिरि वाढला मार्ग रोधित । त्याहूनि हनुमंत उंचावला ॥११२॥
जंव जंव पर्वत वरती वाढे । तंव तंव मारुती गगनी चढे ।
श्रम न बाधी तयाकडे । विश्रांतिचाडे उदास ॥११३॥
नभीं चढला योजनशत । द्विगुण वाढला पर्वत ।
हनुंमत चढला पांच शत । गिरिसप्त शत वाढला ॥११४॥
हनुमान चढला सहस्रवरी। इतकाचि वाढला गिरी ।
कपि चढला तयाहींवरी । समुद्रपरपारीं जावया ॥११५॥
गिरि वाढला लक्षकोटी । कपि चढला नभःपृष्ठीं ।
पर्वत स्वये कपाळ पिटी । चरणभेटी मज नव्हे ॥११६॥
मैनाद्रीची हनुमंताला प्रार्थना :
लंघोनि जाता हनुमंत । ग्लानी मैनाक विनवित ।
तू कृपाळु श्रीरामदूत । उपेक्षित का जासी ॥१७॥
तुझा लागलिया चरण । मी होईन अति पावन ।
यालागी मी वाढलों गा जाण । नाही अभिमान तुजसी मज ॥१८॥
सागरें सांगितले मजप्रती । हनुमंता पूजावें अतिथी ।
यालागी आलो मी तुजप्रती । द्यावया विश्रांति रामभक्ता ॥१९॥
सगरे स्थापिला साचार । यालागी नांवों तो सागर ।
तूंही सूर्यवंशीचा किंकर । आम्ही समग्र दास तुझे ॥१२०॥
तुझ्या पित्याचा स्थापित । मी वसत आहें समुद्रांत ।
तोही अवधारी वृत्तांत । उपेक्षित जाऊ नको ॥१२१॥
पूर्वी पर्वत पक्षधर । उड्डाणे घेती अति दुर्धर ।
पुरें पट्टणे करिती चूर । नगरेंनगर भंगिती ॥१२२॥
इंद्रें घेवोनिया वज्र । गिरीपक्ष घेदिले समग्र ।
माझेही छेदावया दुर्धर । वज्रधर चालिला ॥१२३॥
मज होता पलायमान । साह्य जाला तुझा पिता पवन ।
समुद्री आला गा घेवोन । तेणे हा प्राण वांचला ॥१२४॥
तुझ्या पित्याचा स्थापित । समुद्रामाजी होतो गुप्त ।
येता देखोनि हनुमंत । विश्रांतिहेतू वाढलों ॥१२५॥
हनुमंताचे उत्तर :
ऐकोनि मैनाद्रीच्या वृत्तांता । कृपेनें सांगे निजकार्यार्था ।
शोधावया श्रीरामकांता। अति शीघ्रता मी जातो ॥१२६॥
आधी असावी विश्रामता । मज द्यावी विश्रांतता ।
नामस्मरणें श्रीरघुनाथा । श्रमावस्था मज नाही ॥१२७॥
ज्यासी नाही नामी विश्वास । त्यासी बाधी श्रम शोक त्रास ।
श्रीरामाचा निजदास । श्रमाचा लेश मज नाही ॥१२८॥
तरीही मैनाद्रीचे हनुमंताला विश्रांतीस आमंत्रणः
ऐकोनि हनुमंताचे वचन । मैनाद्रीस आले रुदन ।
भाग्ये अभागी मी परिपूर्ण । हनुमंतचरण अप्राप्य ॥१२९॥
पर्वताचा खेद देखोन । हनुमंत बोलिला वचन ।
तुझे न घे फळ मूळ जीवन । अंगुलिस्पर्शन तुज न करी ॥१३०॥
पर्वत म्हणे हनुमंता । कृपेनें हात ठेवी माथा ।
इतकेन मी सनाथता । आणिक सर्वथा मागेंना ॥१३१॥
तंव इंद्र म्हणे मैनाद्री । जालासी हनुमंता साहाकारी ।
तुज मी सर्वथा न मारीं । समुद्राबाहेरी सुखें विचरे ॥१३२॥
मैनाद्री पर्वताच्या मनःशांतीकरिता त्याला अंगुलीचा स्पर्श व त्याचा परिणाम :
मग हनुमंते तये वेळीं । पर्वती ठेविली आंगोळी ।
भारें बैसला समुद्रतळीं । जाला पाताळी हाहाकार ॥१३३॥
पन्नग म्हणती पर्वतावरी । अतिशय भार पडला भारी ।
करील सप्तपाताळचुरी । नवनागांतरी हाहाकार ॥१३४॥
आंगोळी ठेवितांचि शिरी । पर्वत बुडाला सागरी ।
कपि बैसला जरी वरी । तै होता चकचुरी निर्नाम ॥१३५॥
इतुकी करोनि ख्याती । पुढे चािलला मारुती ।
ब्रह्मादिका विस्मय चित्ती । जयजय करिती सुर सिद्ध ॥१३६॥
इतुकी करोनि ख्याती । पुढे चालिला मारुती ।
उल्लंघावया अपांपती । शीघ्रगती निघाला ॥१३७॥
देव दानव अवघे जण । तेंही हनुमंताचा मार्ग रोधून ।
करावया चालिले विघ्न । तेंही कथन अवधारा ॥१३८॥
ततो देवाः सगंधर्वाः सिद्धाश्च ऋषयस्तदा ।
समब्रुवन्दानवानां मातरं सुरसां दनुम् ॥२०॥
अयं वातात्मजः श्रीमान्प्लवते सागरोपरि ।
हनूमान्नाम तस्य त्वं मुहूर्तं विघ्नमाचर ॥२१॥
बलमिच्छामहे ज्ञातं वयं चास्य पराक्रमम ।
किं करिष्यत्यपायं वा विषादं वा करिष्यति ॥२२॥
सागरावरी शीघ्र गमन । करिताहे वायुनंदन ।
राक्षसरुपें करावे विघ्न । गमनागमन खंडावें ॥१३९॥
किती बळ आहे हनुमंता । पहावया आवडी देवा समस्ता ।
दानवाची दनु जे माता । ते विघ्नार्था धाडिली ॥१४०॥
जावों शके निजात्मशक्ती । किंवा येईल काकुळती ।
काय करील मारुती । ते निश्चिती आम्ही पाहू ॥१४१॥
हनुमंताच्या सामर्थ्याची परिक्षा पाहण्यासाठी दनूला पाठविली :
दनु सुरसा दानवांची माता । कपटतेजें सतेजता ।
ऐकोनि देवांचि हे कथा । विघ्न हनुमंता करू आली ॥१४२॥
आश्रयूनि समुद्रजळ । राक्षसी जाहली विकराळ ।
मुख पसरोनि कराळ । कपि तत्काळ गिळो आली ॥१४३॥
येणे मार्गे जे जे येती । ते ते माझे भक्ष निश्चिती ।
तुम मी गिळीन पुसें युक्ती । रीघ मुखाप्रति वानरा ॥१४४॥
सीताशुद्धीसीं जातो लवलाहें । श्रीरामकार्यासी साह्य होयें ।
विघ्न न करी वो भाये । तुझे पाये वंदितों ॥१४५॥
भोजनी निवारी क्षुधिता । तो सज्ञान अति मूर्खता ।
कैंचा राम कैंची सीता । तुज मी आता भक्षिन ॥१४६॥
आपुलें चुकावया मरण । मज सांगसी ब्रह्मज्ञान ।
क्षुधेने निमालिया प्राण । सुकृत कोण भोगील ॥१४७॥
राक्षसीयें पसरिले वदन । हनुमंत जाला एक योजन ।
येरी मुख पसरिले द्विगुण । दशयोजन कपि जाला ॥१४८॥
मुख पसरी योजने वीस । हनुमंत जाला योजने तीस ।
येरी पसरिले चाळीस । कपि पन्नास होऊं सरला ॥१४९॥
शत योजने पसरी वक्त्र । तंव हनुमंत जाला अंगुष्ठमात्र ।
मुखी रिघाला सत्वर । नभी सुरवर देखती ॥१५०॥
देव म्हणती हनुमंता । सुरसेने गिळिले तत्वता ।
शुद्धी करणे राहिली सीता । अति मूर्खता आम्ही केली ॥१५१॥
हनुमंते शीघ्र करिता गमन । आम्ही का करविलें विघ्न ।
आम्हा कोपेल श्रीरघुनंदन । स्वर्गी सुरगण धाकती ॥१५२॥
हनुमंत रिघे राक्षसीवदनीं । अंतरी पाहता कश्यपपत्नी ।
दानवांची सखी जननी । माता सापत्नी देवांची ॥१५३॥
पवन जो का माझा पिता । त्याची हे सावत्र माता ।
इच्या करों नये घाता । हृदयी हनुमंता मानले ॥१५४॥
रामकार्याचे त्वरेंकरीं । येथोनि निघावें बाहेरीं ।
वानराची युक्ती भारी । देखे कर्णरंध्रीं निर्गम ॥१५५॥
सुरसा चाटी अवाळें । वानर दांती तोंडी नाकळे ।
मुखीचें मुखी हरपले । किंवा गुंतले दशनांतरी ॥१५६॥
राक्षसी घेता वदनधांडोळी । तंव हनुमान निघे कर्णबिळीं ।
भुभुःकार देता आतुर्बळी । पिटिशळी टाळी सुरवरी ॥१५७॥
हनुमंत विवेकी अति ख्यात । न करोनि सुरसेचा घात ।
निर्गम देखिला श्रवणांत । विघ्नातीत रामनामे ॥१५८॥
विघ्नातीत श्रीरामभक्त । त्यामाजी मुखरण हनुमंत ।
श्रीरामनाम जे स्मरत । ये यशवंत अति अपूर्व तिही लोकी ॥१६०॥
दनु व हनुमंत संघर्षांत हनुमंताची सुटका व त्याचे पुढे प्रयाण :
श्रीरामनाम मुखी मुद्रा । हृदयी स्मरण श्रीरामचंद्रा ।
कैचें विघ्न त्या कपींद्रा । क्षणे समुद्रा लंघील ॥१६१॥
न करोनि माझा जीवघात । हनुमंत निजबळे निर्मुक्त ।
देखोनि सुरसा संतोषत । आशीर्वाद देत हनुमंता ॥१६२॥
अब्रवीत्सुरसा देवी स्वेन रुपेण वानरम् ।
अर्थसिद्धयै हरिश्रेष्ठ गच्छ सौम्य यथासुखम् ॥२३॥
संयोजयस्व वैदेहीं राघवेण महात्मनां ॥२४॥
सांडोनि राक्षसी क्रूरता । सुरसा जाली शांत रुपता ।
अर्थसिद्धि पावसी हनुमंता । श्रीरामसीतासंयोगे ॥१६३॥
श्रीरामनामीं तुझी मिठीं यालागी तू दाटुगा सृष्टी ।
तुझेनि रामसीतेंसी भेटी । रामराज्य सृष्टी तुझेनि ॥६४॥
सीताशुद्धीची समयसिद्धी । तुझेनि होईल गा त्रिशुद्धी ।
निमेषे लंघिसील उदधी । तू सद्बुद्धि कपींद्रा ॥१६५॥
ऐसे बोलोनि उत्तर । सुरसा वंदिला वानर ।
येरू निघांला सत्वर । समुद्रपार लंघावया ॥१६६॥
सुरसा देवी देवविघ्न । कपीनें जिंकिली न मारुन ।
पुढे सागरी बळवाहन । केले कंदन ते ऐका ॥१६७॥
सकळ ग्रंथाचें माहेर । ते हे श्रीरामचरित्र ।
पवित्र वक्त्याचें वक्त्र । पवित्र श्रोत्र श्रोतियांचे ॥१६८॥
स्वामिसेवेसी विकिला प्राण । ब्रह्मज्ञानेचें भूषण ।
नवविधभक्तींचे जीवन । कपिकथन शिववंद्य ॥१६९॥
करिता हनुमंताचे स्मरण । विघ्न तेंचि होय निर्विघ्न ।
स्मरणे सुलभ ब्रह्मज्ञान । कथा पावन हनुमंते ॥१७०॥
एकाजनार्दना शरण । कपिप्रतापकथा गहन ।
पुढे काय केले कथन । सावधान अवधारा ॥१७१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
हनुमंतसमुद्रमध्यगमनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥१७॥
॥ ओंव्या १७१ ॥ श्लोक २४ ॥ एवं १९५ ॥
