तुर्या ते महाकारण ना
440.
तुर्या ते महाकारण नाही नाही जेथे ।
दर्शनाचे मते माझा मीच ॥१॥
गोल्हाट त्रिकुट श्रीहाटातीत ।
महाकारणाची मात जेथ नाही ॥२॥
क्षर अक्षर अनाक्षर नाही ।
कूटस्थ सर्वही असवला ॥३॥
ज्ञानदेव म्हणे ऐसे हे पाहाता ।
निवृत्तीने तत्त्वत कथनी केली ॥४॥
अर्थ :
ज्या अवस्थेमध्ये तुर्या अवस्था महाकारण देह हे सर्व नाहीसे होऊन एक आत्मवस्तुच राहाते. गोल्हाट, त्रिकुट, श्रीहाट व महाकारणदेह यांची गोष्ट त्याठिकाणी नाही. त्या स्थितीत क्षर, अक्षर व अनाक्षर भाव उरत नाही सर्वांची मिथ्या प्रतीती कूटस्थावरच येते. वरिल सर्व गोष्टी निवृत्तीनाथांनी आम्हाला सांगितल्या असे माऊली ज्ञानदेव सांगतात..
