संत नरहरी सोनार अभंग
संत नरहरी सोनार अभंग गाथा
संत नरहरी सोनार अभंग एकूण ३४
१.
नव्हे ते सगुण नव्हे ते निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥
आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसे तैसे ॥ २ ॥
म्हणे नरहरी सोनार तै क्षर ना अक्षर । परेहुनी परात्पर ब्रह्म जैसे ॥ ३ ॥
२.
अनुहात ध्वनी करित निशिदिनीं । मन हें लुब्धुनी गेले तया ॥ १ ॥
अखंड हें मनी स्मरा चिंतामणी । ह्रदयी हो ध्यानीं सर्वकाळ ॥ २ ॥
अखंड हें खेळे जपे सर्व काळी । ह्रदयकमळी आनंदला ॥ ३ ॥
प्रेम अखंडित निशिदिनीं ध्यात । नरहरीसी पंथ दाखविला ॥ ४ ॥
३.
ऐरावती बहु थोर । त्याला अंकुशाचा मार ॥ १ ॥
व्याघ्र बहु भयंकर । त्याला सांपळा हो थोर ॥ २ ॥
सर्पविष हो विखार । मंत्रवल्ली केली थोर ॥ ३ ॥
देह जठराग्नी भारी । अन्नपाणी शांत करी ॥ ४ ॥
गुरु गैबीनाथ । नरहरी दास हा अंकित ॥ ५ ॥
४.
काय तुझी थोरी वर्णू मी पामर । होसी दयाकर कृपानिधी ॥ १ ॥
तुजसरशी दया नाही आणिकासी । असे ह्रषीकेशी नवल एक ॥ २ ॥
जन हो जोडी करा नाम कंठी धरा । जेणे चुके फेरा गर्भवासी ॥ ३
नरदेही साधन समता भावभक्ति । निजध्यास चित्तीं संतसेवा ॥ ४ ॥
गुरुपदीं निश्चळ परब्रह्म पाहे । नरहरी राहे एकचित्ते ॥ ५ ॥
५.
काही करीना उपाय । दिवसें दिवस व्यर्थ जाय ॥ १ ॥
संसारी नाही समाधान । न चुकती जन्ममरण ॥ २ ॥
शेण लोणी सोने कांसें । एक मोले विके कैसे ॥ ३ ॥
दुर्जनसंग त्यागावा । संतसंग तो धरावा ॥ ४ ॥
नरहरी जोडोनिया कर । उभा सेवे निरंतर ॥ ५ ॥
६.
कृपा करी पंढरीनाथा । दीनानाथ तू समर्था ॥ १ ॥
अपराध करी क्षमा । तुझा न कळे महिमा ॥ २ ॥
करी भक्ताचा सांभाळु । अनाथाचा तू कृपाळु ॥ ३ ॥
आम्ही बहुत अन्यायी । क्षमा करी विठाबाई ॥ ४ ॥
आलो पतीत शरण । पावन करी नारायण ॥ ५ ॥
पापी अमंगळ थोर । कृपा करी दासावर ॥ ६ ॥
मी तरी अवगुण बहुत । दयाकरीं पंढरीनाथ ॥ ७ ॥
दयासागरा अनंता । कृपा करी पंढरिनाथा ॥ ८ ॥
तुझें नामामृत सार । नरहरि जपे निरंतर ॥ ९ ॥
७.
कृपाळु समर्था सद्गुरु अनंता । गुरु कृपावंता दया करी ॥ १ ॥
अनाथ अपराधी तारी हा भवाब्धी । मृगजळ नदी तारी देखा ॥ २ ॥
दीनाचा दयाळु भक्तांचा कनवाळु । करिता सांभाळु हरिभक्ताचा ॥ ३ ॥
हरिनाम उच्चारी देव कृपा करी । भक्तांचा कैवारी पांडुरंग ॥ ४ ॥
कृपाळु भगवंते पुरविला हेत । मुखी नामामृत नरहरी ॥ ५ ॥
८.
चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत । मनींचा मनोरथ अंतरींचा ॥ १ ॥
स्नान संध्या केली संध्यावळी झाली । गई वळत्या केली गोपाळपुरीं ॥ २ ॥
पांडुरंग न कळे आम्हा । नरहरी सप्रेमा सद्गदीत ॥ ३ ॥
९.
चित्तार्या चितरें काढी भिंतीवरी । तैसें जग सारे अवघे हें ॥ १ ॥
पोरें हो खेळती शेवटी मोडिती । टाकूनिया जाती आपुल्या घरा ॥ २ ॥
तैसे जन सारे करिती संसार । मोहगुणें फार खरें म्हणती ॥ ३ ॥
कैसी जड माती चालविली युक्ति । नानापरी होती देह देवा ॥ ४ ॥
कांहीं साध्य करा साधुसंग धरा । नाम हें उच्चारा नरहरी म्हणे ॥ ५ ॥
१०.
चरणी ठेविले पद्मतीर्थ झालें । गरुडपारीं केले रामतीर्थ ॥ १ ॥
भागीरथीतीरीं राम धनुर्धारी । अहिल्या उद्धरी क्षणमात्रें ॥ २ ॥
पताकांचा भार नामाचा गजर । प्रेमाचा पाझर साधुसंता ॥ ३ ॥
संतांचा हा दास नरहरी सेवेस । राहो रात्रंदिवस नाम घेत ॥ ४ ॥
११.
जग हें अवघे सारें ब्रह्मरूप । सर्वांभूतीं एक पांडुरंग ॥ १ ॥
अणुरेणू पर्यंत ब्रह्म भरीयेलें । सर्वांघटीं राहिले अखंडित ॥ २ ॥
विश्व हें व्यापिले भरूनी उरले । कवतुक दाविले मायाजाळ ॥ ३ ॥
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ । परब्रह्मीं खेळे अखंडित ॥ ४ ॥
अखंडित वस्तु ह्रदयी बिंबली । गुरुकृपें पाहीं नरहरी ॥ ५ ॥
१२.
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥ १ ॥
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने ॥ २ ॥
त्रिगुणाची करुनी मूस । आंत ओतिला ब्रह्मरस ॥ ३ ॥
जीव शिव करुनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी ॥ ४ ॥
विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ॥ ५ ॥
मनबुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ॥ ६ ॥
ज्ञान ताजवा घेउन हाती । दोन्ही अक्षरे जोखिती ॥ ७ ॥
खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी ॥ ८ ॥
नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥ ९ ॥
१३.
देह जन्मला व्यर्थ । झाले पापांचे पर्वत ॥ १ ॥
कांहीं नाही तीर्थ केलें । जन्मूनियां व्यर्थ झालें ॥ २ ॥
दान धर्म नाही केला । देह मसणवटीं गेला ॥ ३ ॥
नरहरी सेवक सद्गुरूचा । दास हो साधुसंतांचा ॥ ४ ॥
१४.
देह जन्मला व्यर्थ । झाले पापांचे पर्वत ॥ १ ॥
दान धर्म नाही केला । शेवटी जन्म व्यर्थ गेला ॥ २ ॥
देह अवघा क्षणभंगुर । दिसे स्वप्नवत् सार ॥ ३ ॥
नरहरी ह्मणे शेवटी । संगें न येई लंगोटी ॥ ४ ॥
१५.
धन्य पुंडलिक भक्त निवडला । अक्षयी राहिला चंद्रभागीं ॥ १ ॥
भक्त नामदेव अक्षयीं जडला । पायरी तो झाला महाद्वारी ॥ २ ॥
ज्ञानोबा सोपान निघती हे भक्त । अक्षयीं राहत परब्रह्मीं ॥ ३ ॥
बोधरज भला वचनीं गोविला । कीर्तनी राहिला पांडुरंग ॥ ४ ॥
साधुसंत फार येती थोर थोर । उभा निरंतर चोखामेळा ॥ ५ ॥
संत साधुजन वंदिती चरण । नरहरी निशिदिन सेवेलागी ॥ ६ ॥
१६.
सिक्का जयाचा आहे थोर । हाती पताकांचा भार ॥ १ ॥
भजन होय स्थळोस्थळीं । अवघी संत हे मंडळी ॥ २ ॥
वैकुंठीची खूण । रणखांब आहे जाण ॥ ३ ॥
खांबासी भेटती जन । शिळेवरी लोळे जाण ॥ ४ ॥
पापतापही जळाले । संतचरणीं नरहरी लोळे ॥ ५ ॥
१७.
नाशिवंत देह मनाचा निश्चय । सद्गुरूचे पाय ह्रदयीं असो ॥ १ ॥
कलीमध्यें फार सद्गुरू हा थोर । नामाचा उच्चार मुखी असो ॥ २ ॥
भजनाचा गजर नामाचा उच्चार । ह्रदयीं निरंतर नरहरीचें ॥ ३ ॥
१८.
नाम हे नगरी वैकुंठ पंढरी । नांदता श्रीहरी पांडुरंग ॥ १ ॥
नरदेहीं जन्मले पंढरीस गेले । दृष्टीभरि पाहिले पांडुरंग ॥ २ ॥
भीवरेचें स्नान देवाचे दर्शन । पाप हे जळोन जाय तेथें ॥ ३ ॥
चरणावरी माथा नरहरी ठेविला । ह्रदयीं बिंबला पांडुरंग ॥ ४ ॥
१९.
कांहीं उपाय चालेना । कांहीं स्वहित घडेना ॥ १ ॥
कांहीं केलें नाही पुण्य । काय जन्मासी येऊन ॥ २ ॥
केलीं नाही कांही भक्ती । देही नाही हो विरक्ती ॥ ३ ॥
कांही केलें नाही तीर्थ । जन्म गेला अवघा व्यर्थ ॥ ४ ॥
व्यर्थ प्रपंच हा केला । अवघा शेवटी वाया गेला ॥ ५ ॥
गुरु कृप होय जरी । नरहरी क्षणांत उद्धरी ॥ ६ ॥
२०.
पापांचे पर्वत मोठे झाले । शरीर नासलें अधोगती ॥ १ ॥
जन्मांतरीं केलें अवघे व्यर्थ गेले । देह हो नासले क्षणामाजी ॥ २ ॥
जिणें आशाश्वत देह नाशिवंत । अवघे सारें व्यर्थ असे देखा ॥ ३ ॥
कांहीं नाही दान कांहीं नाही पुण्य । जन्मासी येऊन व्यर्थ जाय ॥ ४ ॥
परोपकार कांहीं नाही केला देवा । सद्गुरु केशवा ह्रदयीं ध्यावा ॥ ५ ॥
सारामध्यें सार नाम असे थोर । ह्रदयीं निरंतर नरहरीच्या ॥ ६ ॥
२१.
पहा दिसतो पदार्थ । अवघा नाशिवंत व्यर्थ ॥ १ ॥
माया बहुरूपी नटली । नवखंडी प्रगटली ॥ २ ॥
प्रपंच हें माया जाळ । घातले भ्रांतीचे पडळ ॥ ३ ॥
उमज पडेना हो कांहीं । मस्तक सद्गुरूचे पायी ॥ ४ ॥
सद्गुरुनाम हें अमृत । नरहरी जपे ह्रदयांत ॥ ५ ॥
२२.
पंढरी नगरी नांदतो श्रीहरी । गाई वळित्या करी गोपाळपुरीं ॥ १ ॥
गोपाळ मिळाले गोपाळपुर झालें । अक्षयीं राहिले देव तेथें ॥ २ ॥
संध्या जेथें केली संध्यावळी झाली । प्रतिमा ठेवली स्थळोस्थळीं ॥ ३ ॥
चरण ठेविले पद्मतीर्थ झालें । अक्षयी राहिले तेव्हा तेथें ॥ ४ ॥
वेणु वाजवीत चंद्रभागीं आले । वेणुनाद झाले अखंडित ॥ ५ ॥
पंढरी हें स्थळ वैकुंठ सकळ । साधु हो निर्मळ आहे तेथें ॥ ६ ॥
कोटि लिंग आहे कोरटींत पाहें । चक्रोसी राहे देव सर्व ॥ ७ ॥
व्रत एकादशी करिती नेमेसी । पापी चांडाळांशी उद्धरती ॥ ८ ॥
पंढरी द्वारका भूमिका निर्मळ । साधु हो दयाळ आहे तेथे ॥ ९ ॥
राम लक्ष्मण सीता संतजणाची । हवेलींत पूर्ण अक्षयीं तो ॥ १० ॥
अखंडित वाचेते उच्चार नामाचा । सेवक संतांचा नरहरिदास ॥ ११ ॥
२३.
पंढरपुरचा जाणा विठ्ठल धणी । राणी रुक्मिणी सत्यभामा ॥ १ ॥
भूमीमध्ये गुप्त कानोपात्रा झाली । उजवे बाजू ठेली लक्ष्मी ते ॥ २ ॥
पुढें हो प्रतिमा नामदेव पायरी । उभा महाद्वारीं चोखामेळा ॥ ३ ॥
पुढे मल्लिकार्जुन महिमा असे फार । लिंग असे थोर महादेवाचे ॥ ४ ॥
पुढें भागीरथी मध्ये पुंडलिक । आणिकही तेथे वेणुनाद ॥ ५ ॥
आषाढी कार्तिकी साधुसंत येती । गोपाळकाला करिती आनंदानें ॥ ६ ॥
देवाचे समोर नरहरी सोनार । ह्रदयी निरंतर नांव घेतो ॥ ७ ॥
२४.
पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥
आषाढी कार्तिकी महापर्वे थोर । भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥
साधुसंत थोर पताकांचा भार । मुखी तो उच्चार नामामृत ॥ ३ ॥
आनंदाचा काला गोपाळकाला केला । ह्रदयीं बिंबला नरहरी ॥ ४ ॥
२५.
प्रारब्धाची गति । कदाकाळीं न सोडिती ॥ १ ॥
होणार सोडिना । आले कपाळी टळेना ॥ २ ॥
दैवयोगाची गती । जी होणार ती होती ॥ ३ ॥
जे जें कर्माचे फळ । तें ते भोगावें सकळ ॥ ४ ॥
ज्याचे बीज पेरियेलें । त्याचे त्यास फळ आले ॥ ५ ॥
ज्यानें जैसे आचरिलें । तैसें त्याच्या फळा आले ॥ ६ ॥
मानवाचें कल्पना बळ । देव करितो सकळ ॥ ७ ॥
किल्ली कैसी चालविली । घडामोडी कैसी केली ॥ ८ ॥
सत्य सार बुडविलें । अवघे असत्यचि झालें ॥ ९ ॥
नरहरी म्हणे नाम थोर । नाम साराहुनी सार ॥ १० ॥
२६.
प्रेम शांति दया शरण निर्धारेसी । बसले उदासी सर्व काळ ॥ १ ॥
काया वाचा मन निवडूनी प्राण । गुह्य ज्ञान पूर्ण सर्व साक्षी ॥ २ ॥
सद्गुरूची कृपा होय जयावरी । तो हा श्रीहरीचा संत झाला ॥ ३ ॥
संत साधुजन वंदुनियां पूर्ण । वचे नारायण नाम घेतो ॥ ४ ॥
नरहरी सोनार म्हणे हरिचा दास । भावे रात्रंदिवस नाम घेतो ॥ ५ ॥
२७.
भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर । तेथे मी पामर काय वर्णू ॥ १ ॥
भूषण जयाचे भुवना वेगळें । रुंडमाळा खेळे गळ्यामध्यें ॥ २ ॥
कर्पुरगौर भोळा सांब सदाशिव । भूषण धवल विभूतीचें ॥ ३ ॥
माथां जटाभार हाती तो त्रिशूळ । श्वेत शंख बळे फुंकीतसे ॥ ४ ॥
भांग जो सेवूनी सदा नग्न बैसे । जटेंतूनि वाहे गंगाजळ ॥ ५ ॥
गोदडी घालूनी स्मशानी जो राहे । पंच वस्त्र होय श्रेष्ठ भाग ॥ ६ ॥
नाम घेतां ज्याचे पाप ताप जाती । पापी उद्धरती क्षणमात्रें ॥ ७ ॥
नरहरी सोनार भक्ति प्रियकर । पार्वती शंकर ह्रदयीं ध्यातो ॥ ८ ॥
२८.
शरीराची होय माती । कोणी न येती सांगाती ॥ १ ॥
सारी अवघी कामे खोटी । अंतीं जाणे मसणवटी ॥ २ ॥
गोत घरे टाकुन सारी । शेवटी गांवाचे बाहेरी ॥ ३ ॥
स्वजन आणि गणगोत । उपाय नाही हो चालत ॥ ४ ॥
ऐसे स्वप्नवत असार । नरहरी जोडितसे कर ॥ ५ ॥
२९.
सकळ धर्माचें कारण । नामस्मरण हरिकीर्तन ॥ १ ॥
दया क्षमा समाधान । घ्यावे संतांचे दर्शन ॥ २ ॥
संत संग वेगी । वृत्ति जडों पांडुरंगी ॥ ३ ॥
नरतनु येयाची बा कदा । भावे भजा संत पदा ॥ ४ ॥
भुलूं नका या संसारी । हरी उच्चारी उच्चारी ॥ ५ ॥
सर्व जायाचे जायाचें । हरि नाम हेंचि साचे ॥ ६ ॥
विठोबा रक्षिल शेवटी । उभा कर दोन्ही कटी ॥ ७ ॥
नरहरी जाणूनि शेवटी । संतचरणा घाली मिठी ॥ ८ ॥
३०.
सूर्य असे गगनी । परी दिसतो जीवनीं ॥ १ ॥
मेघ असतो अंबरीं । पाणी पडे भूमीवरी ॥ २ ॥
आकाशीं चंद्र तारांगण । बिंब दिसे पाण्यांतून ॥ ३ ॥
बिंब पाहतां दर्पणीं । बिंबे दिसे त्यांतुनी ॥ ४ ॥
आत्मा अनुभवी पाहतां । देव दिसे हो तत्वतां ॥ ५ ॥
गुरु कृपा होय पूर्ण । नरहरी लंपट निशिदिन ॥ ६ ॥
३१.
नाम फुकाचें फुकाचे । देवा पंढरीरायाचें ॥ १ ॥
नाम अमृत हें सार । ह्रदयीं जपा निरंतर ॥ २ ॥
नाम संतांचे माहेर । प्रेम सुखाचे आगर ॥ ३ ॥
नाम सर्वांमध्यें सार । नरहरी जपे निरंतर ॥ ४ ॥
३२.
भस्म उटी रुंडमाळा । हाती त्रिशुळ नेत्री ज्वाळा ॥ १ ॥
गज चर्म व्याघ्रांबर । कंठी शोभे वासुकी हार ॥ २ ॥
भूते वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥
सर्व सुखाचे आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥
३३.
ऊठ बा होय जागा पहा वासुदेवाला सुदिन उगवला दान आपुले घाला ॥ १ ॥
आणिक हिता गा आला अवचित फेरा । हे घडी सांपडेना कांही दान पुण्य करा ॥ २ ॥
ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृते भर । भक्तासी भय नाही संत संगती घर ॥ ३ ॥
संसार सार नोहे माया मृगजळ भास । क्षणांत भ्रांती याचा काय विश्वास ॥ ४ ॥
घे करी टाळ दिंडी होय विठ्ठलाचा दास । सावधान नरहरी मालो चरणी निजध्यास ॥ ५ ॥
३४.
सत्य ज्योतिलिंग बारा । प्रातःकाळी स्मरण करा । कोटि कुळे उद्धारा । भव तरा बापहो ॥ १ ॥
वाराणसी विश्वनाथ । मोक्षदाता तो समर्थ । पुरवील अंतरीचे आर्त सोमनाथ । सोरटी ॥ २ ॥
ॐकार ममलेश्वर । सेतबंध रामेश्वर । भीम उगमीं भीमाशंकर । घृणेश्वर वेराळी ॥ ३ ॥
नागनाथ अमृतोदकीं । विश्वजन केलें सुखी । परळी वैजनाथ सुखी । सुकृत साचे जन्माचें ॥ ४ ॥
त्र्यंबक हा तीर्थराज । पुरवील अंतरीचे काज । त्याही तेजामाजीं तेज । महाकाळ उज्जनी ॥ ५ ॥
दुजे कैलास भुवन । श्रीशैल्य मल्लकार्जुन । वाचे स्मरता धन्य धन्य । अनुपम्य क्षेत्र ते ॥ ६ ॥
ब्रद्रिकेदार उत्तरें । ज्याचे स्मरणे भव हा तरे । ध्यान धरिता वृत्ति नुरे । निज निश्चळ दासाची ॥ ७ ॥
नरहरी म्हणे जन्मा यावे । शुद्ध सत्य प्रेम
संत नरहरी सोनार अभंग समाप्त
