समर्थपणे रंका का गां
1688.
समर्थपणे रंका का गांजितसा स्वामी | हे काये स्वधर्मी मिळतसे ॥१॥
आपुली करणी न विचारा मनी | दुसरियास झणी बोल ठेवा ॥२॥
निर्गुण निराकार होतेंती शून्यपणे | आम्हांसी असणे तेचि ठाया ॥३॥
सुखे एकरूप होतो तुझे पोटी | कासया हे सृष्टी वाढविली ॥४॥
विकाराचे मूळ दिधले हे शरीर | तेणे कष्टी थोर जालो आम्ही ॥५॥
पाप पुण्य दोन्ही लाविली सांगाते | म्हणऊनि सुखाते अंतरलो |॥६॥
यमलोकी वास रौरव यातना | तेणे नारायणा धाक थोर ॥७॥
खातो जेवतो ते न लगेचि अंगी | जालोंसे उद्वेगी रात्रंदिवस ॥८॥
ऐसे देह आम्हा कासया दिधले | काय मागितले आम्ही तुम्हा ॥९॥
सृष्टीपूर्वी पाप नव्हते हरी | कासया श्रीहरी कष्टी केले ॥१०॥
वेदशास्त्रभय आम्हांसी लाविले | ते तुम्ही टाकिले एकीकडे ॥११॥
वेदशास्त्रवचन चुकल्या अवचिता | गोसावी जी होता दंडावया ॥१२॥
मागा चुकलेती ते ठेवा एकिकडे | आता तरी पुढे सांभाळावे ॥१३॥
एकरूप तुम्ही होतेती निर्गुणी | तेथे आमुचे कोण्ही बोलो आलो ॥१४॥
निर्गुण सांडुनि व्हावे जी सगुण | ऐसे तुम्हा कोण बोलियेले ॥१५॥
आपुलिये इच्छे ब्रह्मांडे रचिली | काय सांगितली जी आम्ही तुम्हा ॥१६॥
लक्ष्मीचे विलास धरिले नाना वेष | हा काय उपदेश आम्ही केला ॥१७॥
विश्व हे निर्मुनि जालेती गोसावी | हे काय सांगावी आम्ही केली ॥१८॥
जे तुम्हा पाहिजे ते तुम्ही निर्मिले | आपणासवे केले कष्टी आम्हा ॥१९॥
कल्पजन्मांतरी युगयुगांतरी | जवळी श्रीहरी होतो आम्ही ॥२०॥
तुम्ही तेथे आम्ही आम्ही तेथे तुम्ही | विचारावे स्वामी पांडुरंगा ॥२१॥
तुम्हा आम्हा कांही वेगळिक नाही | बोलोनिया काई दावू आता ॥२२॥
आम्हांसि तुम्ही काय सोसिले अधिक | ठकितसा लोक तैसे नव्हे ॥२३॥
तुम्हांसी अवतार कोरडिये काष्टी | तुमच्या नामे कष्टी दैत्ये केले ॥२४॥
तुम्हांसी मातेने धाडियेले बना | आमची विटंबना बहुत जाहली ॥२५॥
वल्कले वेष्टोनी जालेती तापसी | वेष आम्हा देसी मर्कटाचे ॥२६॥
जवळीच असुनी हरविली कांता | आम्ही शुद्धिकरता कष्टी जालो |॥२७॥
तियेचे वियोगे शोक करा वनी | वानरे होऊनि हिंडो आम्ही ॥२८॥
तुम्ही स्वामीपणे बैसा एके ठायी | आम्ही शिळा डोई वाहिलेल्या ॥२९॥
लंकेपुढे आम्ही वेचियेले प्राण | तुम्ही ते दुरून बाण टाका ॥३०॥
अयोध्येचे राज्यो तुम्हा सिंहासन | आमचे कपाळी हीन चुकेचि ना |॥३१॥
वस्त्र अलंकार तुम्हा हस्ती घोड़े | आम्ही ते उघडे पायी चालो ॥३२॥
चाड सरलिया नाही आठवण | कांहो लक्षुमण दवडिला ॥३३॥
लोक म्हणो तरी पाठी सहोदर | जालेति निष्ठुर देवराया ॥३४॥
तुम्हा एकलेनि न करावे गमन | सर्व अवघेजण आलो आम्ही ॥३५॥
कंसाभेणे तुम्ही राखियेल्या गाई | तेथे आम्ही कार्ड नव्हतो देवा ॥३६॥
भोगा स्वामीपण राखिता गोधने | ठकोनिया खाणे आमच्या रोटया ॥३७॥
सर्पापोटी आम्ही घाबरलोसे विसे | तुम्ही आपुले सुखे वेगळेची ॥३८॥
खेळता यमुनेडोही टाकियेली उडी | आम्ही थंडी थडी रुदन करू ॥३९॥
गोवर्धन गिरी आमुचिये शिरी | तुम्ही नानापरि वेणु वाहा ॥४०॥
आम्हा चोरुनी नेले वर्षभरी | तुम्ही आपुले घरी सुखी असा ॥४१॥
असो आता चाड नाही येणेंवीण | आमुचे निर्वाण पाहू नका ॥४२॥
आमुचे दिवस काय वाया गेले | स्वामीया उगले राहा तुम्ही ॥४३॥
कल्पाचे शेवटी तुम्हा आम्हा भेटी | तेथे | ह्या गोष्टी कळो येती ॥४४॥
नामा म्हणे आम्ही पाईक फुकाये | धारक नामाचे दास तुझे ॥४५॥
