(बाळक्रीडा अभंग)
3810.
(बाळक्रीडा अभंग)
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥
रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥
सीण झाला वसुदेवदेवकीस । वधी बाळे कंस दुराचारी ॥३॥
दुराचारियासी नाही भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥
पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥
गर्भासी तयांच्या आला नारायण । तुटले बंधन आपेआप ॥६॥
आपेआप बेड्या तुटल्या शृंखळा । बंदाच्या आर्गळा कुलुपे कोंडे ॥७॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष नलगता ॥८॥
न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरी ॥९॥
नंदाघरी जाता येता वसुदेवा । नाही झाला गोवा सवे देव ॥१०॥
सवे देव तया आड नये काही । तुका म्हणे नाही भय चिंता ॥११॥
अर्थ :
गोकुळातील लोकांच्या जशा इच्छा तुम्ही पूर्ण केल्या अगदी तशाच माझ्या मनातील इच्छा देखील देवा तुम्ही पूर्ण कराव्यात. भक्ताचे ऋण फेडण्याकरता भगवंताने अवतार घेतला अविनाशी असा परमात्मा निर्गुण निराकार असून देखील भक्तांसाठी सगुण साकार होऊन आकाराला आला. वसुदेव देवकीला कंसाच्या बंदीखान्यात फार त्रास झाला. दुराचारी कंसाने वसुदेव देवकीचे याआधी सहा बाळे मारली होते. दुराचारी व्यक्तीच्या ठिकाणी भूतदया नसते त्याच्या ठिकाणी आपले परके पापपुण्य या भावनाच नसतात. वसुदेव व देवकीचे पुण्य उदयाला आले व प्रत्यक्ष देवच देवकीच्या गर्भामध्ये येऊन देवकीच्या पोटी जन्माला आले. देवकीच्या पोटी प्रत्यक्ष् नारायण जन्माला आले आणि त्यांच्या हातात कंसाने बांधलेल्या साखळयांचे बंधन आपोआप तुटून गेले. वसुदेव व देवकीच्या हाती असलेल्या बेडया व पायात असले
