(देवाने बाबाजी चैतन्
3453.
(देवाने बाबाजी चैतन्यांचे रूपाने स्वप्नात उपदेश केला त्यासमयीचे अभंग)
सत्य गुरूराये कृपा मज केली । परी नाही घडली सेवा काही ॥१॥
सांपडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥धृपद॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥
कांय कळे उपजला अंतराय । म्हणोनिया काय त्वरा झाली ॥३॥
राघवचैतन्य कैशवचैतन्य । सांगितली खुण माळिकेची ॥४॥
बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरी ॥५॥
माघ शुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥
अर्थ :
सद्गुरुरायांनी माझ्यावर कृपा केली ; परंतु माझ्याकडून काही त्यांची सेवा घडली नाही. गंगास्नानाला मी जात आहे, असे मला स्वप्न पडले, त्या स्वप्नात गंगेच्या वाटेत सदगुरु माझा शोध घेत आहे. त्यांनी माझ्या मस्तकावर आपला कृपाकर ठेवला. (कदाचित माझी परीक्षा पाहान्यासाठी) माझ्याकडे भोजनासाठी त्यांनी पावशेर तूप मागीतले. स्वप्नात मला त्यांचा विचार पडला. असा अंतराय मध्येच कसा काय निर्माण झाला, काही कळत नाही. त्यांनी निघण्याची घाई केली. राघवचैतन्य, केशवचैतन्य अशी गुरुपरंपरेचि खून सांगीतलि. स्वताचे नांव 'बाबाजी' असे सांगितले. 'रामकृष्ण हरी' हा मंत्र दिला. तुकाराम महाराज म्हणतात, सदगुरुनी माझा स्वीकार केला, तो दिवस माघ शुद्ध दशमीचा व वार गुरुवार होता.
