नव्हती हे उसणे बोल ।
2875.
नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण ॥१॥
अनुभव तो वरावरी । नाही दुरी वेगळा ॥धृपद॥
पाहिजे ते आले रुची । काचाकुची काशाची ॥२॥
तुका म्हणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥३॥
अर्थ :
लोकहो माझे बोल हे कोणाचे उसने किंवा कोणाचे मनोरंजन करण्यासाठी व्यर्थ मुळातच नाही. माझे बोल म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आहे हे केवळ वरवरचे अनुभव नाही तर ते सगळयापेक्षा वेगळे आहेत. मी जे काही बोलतो ते सर्वांच्या पचनी पडलेच पाहिजे आणि त्याचा अनुभवही सर्वांना आलाच पाहिजे एकदा की माझ्या बोलण्याचा अनुभव तुम्हाला आला की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझे अनुभवाचे बोल हे समजून घेण्याविषयी व त्याचा अनुभव घेण्याविषयी जर कोणापुढे लाज आडवी येत असेल तर त्याची आवड तरी कोणाला आहे.
