बरवा वो हरि बरवा वो
4.
बरवा वो हरि बरवा वो । गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥
सांवळा वो हरि सांवळा वो । मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥धृ ॥
पाहता वो हरि पाहाता वो । ध्यान लागले या चित्ता वो ॥२॥
पढिये वो हरि पढिये वो । बापरखुमादेविवरू घडिये वो ॥३॥
अर्थ :
जीवाचे कल्याणास उपयोगी पडतील असे अनंत उत्तम गुण ज्याच्या ठिकाणी आहेत, असा भगवान श्रीहरि म्हणा, गोविंद म्हणा किंवा गोपाळ म्हणा अशी हजारो नावे ज्याला आहेत; तोच श्रीहरि सर्वोत्तम आहे हो ! ॥१॥ तो सावळ्या वर्णाचा असून गाई राखतो खरा; परंतु तो मदनालाही मोह उत्पन्न करणारा आहे. ॥धृ ॥ काय सांगावे ! त्या हरीला पाहताच माझे चित्ताला ध्यान लागून गेले आहे हो ! ॥२॥ तोच श्रीहरि मनाला वारंवार आवडतो हो ! असे त्या श्रीहरीचे रूप आहे. ॥३॥
