ऐशिया सुखामाजी राहेन
211.
ऐशिया सुखामाजी राहेन सुखरुप ।
दुजा वागों नेदी आड येऊ संकल्प ।
भोगिन याचोचि वो सर्वदा पडप ।
करुनि भावना अखंड तद्रूप वो ॥१॥
ऐशी ये निश्चयाची सांगितली मात ।
तुम्हीही आयका हो कृपावंत संत ।
नकळे माझा मज सत्याचा इत्यर्थ ।
तुम्हीचि दावाल तो मानीन हितार्थ ॥२॥
येईल चित्तासी ते सांगा विचारुनी ।
माझे निजहित तेचि विवरुनी ।
मी तो नेणोंचि वो याचिये वाहाणी ।
हेचि कळासले हदयभुवनी वो ॥३॥
हाचि निजानंद आवडला मना ।
करु सर्व काळ हेचि विवंचना ।
रुप दृष्टीपुढे धरुनि गाऊ गुणा ।
करुनि तदाकार वृत्तीची भावना वो ॥४॥
यावीण नावडे चित्ता ऐसे झाले ।
दिवसरात्री हे ध्यानचि लागले ।
सांगती इतरे ते न मानेचि भले ।
नेणो कोण ऐसे कर्म उभे ठेले वो ॥५॥
हेचि राहेन वो धरुनिया दृष्टी ।
रुप नागर वो मुरली वाजे ओटी ।
खांदिये घोंगडे वो घेऊनि वेताटी ।
चाले गाईमागे सवे गोवळथाटी वो ॥६॥
ऐसिये आवडीचे पुरविले आर्त ।
येऊनी एकांती वो भेटले गोपिनाथ ।
तेणे मानस वो माझे झाले स्वस्थ ।
निळा म्हणे वो भोगिन एकचित्त वो ॥७॥
