वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 35. संत गोणाई › 1. संत गोणाई अभंग गाथा › 1. संत गोणाई संपूर्ण अभंग गाथा › 1. अभंग गाथा, संत गोणाई अभंग संख्या २६

संत गोणाई अभंग गाथा

🙏 35. संत गोणाई · ABH-081109 · अभंग क्र. १

संत गोणाई अभंग गाथा

🕉️अभंग गाथा, संत गोणाई अभंग संख्या २६

संत गोणाई
1.
नवमासवरी म्या वाहिलास उदरी । आस केली थोरी होसी म्हणोनी ॥१॥
शेखी त्वां रे नाम्या ऐसे काय केले । वनी मोकलिले निरंजनी ॥२॥
कारे नामदेवा जालासी निष्ठुर न बोलसी उत्तर मजसि काहीं॥३॥
सज्जन सोयरी सांडियेली लाज । जालासि निर्लज एकसरा ॥४॥
प्रेमपिसे तुज लाविले विठ्ठले । रूप दावुनि केले तद्रूप तुज ॥५॥
यासि सेविलिया कैची बाप माय सर्व हाचि होय सर्वाठायी ॥६॥
ऐसियाचा संग धरियला तुवा । परिणाम अनुभवा जाणशील ॥७॥
संत सनकादिका लावियेले वेधी । तीही संसार उपाधि सांडियेली ॥८॥
विठ्ठल विठ्ठल हेचि पै चिंतन । विटेसहित चरण धरियेले॥९॥
ऐसे शिकविता नाम्याचे न मोहरे चित्त पाहतसे तटस्थ तन्मय दृष्टी ॥१०॥
नामा म्हणे माते वाया का कष्टसी । विठोबा जीवेसि जडला जाण॥११॥

2.
माता म्हणे नामा राऊळाशी खेळता । तुज कोण्या दैवता ओडियलें॥१॥
लाजिरवाणे नाम्या तुवा केले जिणे हासती पिशुने देशोदेशी॥२॥
सोडि देवपिसे नको करू ऐसे व घर कैसे बुडविसी ॥३॥
जन्मा येऊनिया पराक्रम करी । का होसी संसारी भूमिभार॥४॥
सुदैवाची लेंकरे वर्तताति कैसी तू मज जालासि कुळक्षय ॥५॥
कैसी तुज नाही लौकिकाची लाज हेचि थोर मज नवल वाटे ॥६॥
अभिमान अहंता सांडुनिया जगी । नाचतोसि रंगी गीत गाता ॥७॥
तुजविण लोक अज्ञान नसती । क्षण न विसंबती मायबापा॥८॥
पुत्र आणि कलत्र घराची विपत्ति । तुज अभाग्याचे चित्त पंढरीनाथ ॥९॥
याते भजती त्याचे न उरेचि काही । हाचि देव पाही घरघेणा ॥१०॥
जयाचे खुंटे तो लागे याच्या पंथे । तुजसि शिकविते म्हणोनिया॥११॥
गोणाई म्हणे नाम्या हैं नव्हे मे भले । विठोबाने केले आपणा ऐसे॥१२॥

3.
कापड घेऊनी जाय बाजारासी गोणाई नाम्यासी शिकवितसे ॥१॥
लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फजिती केली नाम्या ॥२॥
नाम्या विठोबाचा संग नव्हे बरा गेंद हा खरा गलाकाटू ॥३॥
याचे संगतीने संसार जाळाया भोपळा हा घ्यावा भीक मागू ॥४॥
नको संग धरू नाम्या ऐक गोष्टी । गोणाई. हनुवटी धरूनी सांगे ॥५॥

4.
गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरी । तेंहुनि मी करी आस तुझी ॥१॥
उपजलासि तै मज जाला संतोष आनंद उल्हास वाटे जीवा ॥२॥
गणगोतामजी के बारे नांव पंढरीचा देव प्रसन्न केला ॥३॥
रात्रंदिवस लेखी अंघोळीवरी तू मज संसारी होसी म्हणोनि॥४॥
तंब तुम अवचित उपजली बुद्धी भोपळा हा खांदी आवडला ॥५॥
हाती टाळ घेऊनी करिसी आळवणी घागरिया चरणी बांधोनिया ॥६॥
सांडोनि घर-दार आपुला संसार नाचता विचार न धरिसी ॥७॥
नव्हे ते करिता कोण असे वारिता । परी त्वां आपल्या हिता प्रवर्तावे ॥८॥
मी एक आहे तव करीन तळमळ मग तुझा सांभाळ करील कोण ॥९॥
यानी नाही संसार हा बोल निर्धार सत्य माझा॥१०॥
कोण्या गुर्गे तुवा घेतले धर गोणाई म्हणे करणे फळा आले ॥११॥

5.
आपणा वेगळा कशाला निवडिसी का मज दवडिसी सांग नाम्या ॥१॥
बरवे पुत्रपण जालासी । उत्तीर्ण । आता अभिमान पाहे माझा ॥२॥
तुज नेल्यावीण नवजाय येथून पंढरी गिळीन विठोबासहित ॥३॥
माझेंसी लेकरू मज आहे वेव्हारू । मज आहे निर्धारू विठोबासी॥४॥
हा दानवांते छळी आपणा म्हणवी बळी । ते मजजवळी न चले काही ॥५॥
विटेसहित चरणी बांधिन आपुला गळा क्षण जीवा वेगळा जाऊ नेदी ॥६॥
आसनी शयनी न विसंबे भोजनी पालिन मुरडोनि हृदयामाजी ॥७॥
या देहाचा संकल्प आले करोन । घातलेंसे पाणी घरादारा ॥८॥
हा त्रिभुवनी समर्थ मी असे जाणत पाहेन पुरुषार्थ आजी याचा ॥९॥
अठ्ठाविस युर्गे भरली तथा बोला धरोनि उभा केला पुंडलिके॥१०॥
गोणाई म्हणे देवा होई का शहाणा वाया का परधना धरिसी लोभु॥११॥

6.
वडील वडील आमुची बोलतील गोष्टी परी तुज ऐसा सुटी देव नाही॥१॥
दर्शना आलिया पाडिसी आव्हाटा मन मारूनी चोहाटा भुलविसी तू ॥२॥
ऐसा कैसा कोणे केला देव आमुच्या जाणिवा खेच आणिवेला ॥३॥
माझे बाळ तुझ्या दर्शनास आले । ते त्वां भुलविले केशिराजा ॥४॥
रात्रिदिवस तुझ्या नामाचा रे छंदु । गोविंद गोविंद म्हणतसे॥५॥
तान्ह भूक विसरला पिसाट पै जाला । नोळखे मजला काय करू ॥६॥
परतोनि संसाराची सांडियेली आस दिसतो उदास सर्वापरी॥७॥
लोकांची लेकुरे का गा चाळविसी । आपणया ऐसे करसी भलत्यासी॥८॥
आणिक असता नाश वेगळा थोर मग माझा विचार कळता तुज ॥९॥
तुम एक धर्म पुंडलिक आहे जेणे जहविले पाय विटेवरी॥१०॥
याहुनी आणिक अधिक पावसी । आम्हा दुबळ्यासी कष्टविता॥११॥
मार्गे पुढे तुज ऐसेचि फावले । ते तव न चले मजसी काही॥१२॥
जीव मी देईन का नामा नेईन । नांव मी करिन गोतामाजी॥१३॥
आता बरवे विचारी अगा ये श्रीहरी । माझा नामा करी मज आधीन॥१४॥
नाही तरी जीवित्व वेचिन तुझ्या पायी । विनविते गोणाई केशिराजा॥१५॥

7.
अगा ये विठोबा पाहे मजकडे । का गा केले वेडे बाळ माझे॥१॥
तुझे काय खादले त्वां काय दिधले । भले दाखविले देवपण ॥२॥
आम्ही म्हणू तू रे कृपालू अससी आता तू कळलासि पंढरिराया॥३॥
का देवपण आपुले भोगू जाणावे भक्त सुख द्यावे हेळामात्र ॥४॥
देव देव होऊनिया अपेश का प्यावे । माझे का बिघडावे एकुलते बाळ ॥५॥
तू कैसारे देव या देशावेगळा बांधिते तुझा गळा परि संता भ्याले ॥६॥
तुझी करणी अवघी आम्हा ठाउकीच आहे । बोलोनिया काय हलकट व्हावे॥७॥
जाणोनि पुंडलिक तुझी न पाहेचि वास । तू भला नव्हेस घरघेणा॥८॥
तो बैस पै न म्हणे तुज याचकाकरणें । जडसी जीवेप्राणे सात्विकभावे ॥९॥
झणी तू आपुला करिसी बोमाटा मग येईल वीट लोकाचारी ॥१०॥
थोरपणे नामा करी मज आधीन गोणाई म्हणे चरण धरिन तुझे॥११॥

8.
माझा नामा जव नांवरूपा आला जंब म्हणो लागला घरदार ॥१॥
तब कैसे विघ्न उठिले गे माये । नामा पंढरिराये भुलविला ॥२॥
सांग बा विठ्ठला म्या काय केले । नामया का मुलविले कवण्या गुणे ॥३॥
आम्ही गा सिंपिये अनाये मे दीने करू सिवने टिपणे पोट भरू॥४॥
त्यासी देवा तुवा आणियेला क्षयो । कैचा आम्हा देवो निर्मिलासी ॥५॥
असता चराचर न बुडता हे सृष्टी का गा घेसी पाठी दुर्बळीची ॥६॥
एक बाळ माझे धरिली त्याची आस । त्या कैसी निराश मांडियेली ॥७॥
दिसा मासा गर्म जाणोनिया पोटी । त्याची आस मोठी करिती लोक॥८॥
एवढा माझा नामा कैसेन विसरेन । देई कृपादान दुर्बळासी ॥९॥
तू अनाथा गोसावी दीनाचा कैवारी । ते ब्रीद श्रीहरी काय जाले ॥१०॥
बिघडले पाडस करी एके ठायी । विनविते गोणाई केशिराजा॥११॥

9.
बुडविली क्रिया बुडविले कर्म बुडविला धर्म पाहा येणे॥१॥
तुझिया नामाचे लागलेसे पिसे । असोनि न दिसे लोकाचारी॥२॥
नेणो काय कळे तुवा वागविला संबंध तुटला मज नाम्याचा ॥३॥
बुडविला आचार बुडविला विचार बुडविला संसार कुळासहित॥४॥
आपुले पारिखे सर्वथा सारिखे नेणो कवणे सुखे वेडावला ॥५॥
बुडविला मोहो बुडविली ममता बुडविली अहंता मी तू पण॥६॥
हा नेणे वेव्हार का इंद्रियांचे सुख अखंड याचे लक्ष तुझे पायीं॥७॥
बुडविली कल्पना समूळ वासना । बुडविली सेवा त्रिविध कैसी ॥८॥
हांसे नाचे प्रेमे फुंदतु । अहर्निशी गातु नाम तुझे॥९॥
असोनि नसता केला ये संसारी । म्या वाहिला उदरी तैसा नाही॥१०॥
गोणाई म्हणे देवा त्वां केली निरास चाळविले उदास बाळ माझे॥११॥

10.
ऐके गोणाई म्हणे केशिराज सदा अरज तुझे नामदेवा॥१॥
संसारादि यासी नायडेचि काही मिठीच वो पायी घातलीसे ॥२॥
नेणो याच्या जीवे घेतलेसे काही लोळणींच पायी पातलिये ॥३॥
पुमे वो जीवी काय काय आवडे उमगोनि कोर्डे नेई पासी ॥४॥
देता काही न मागे नसता काही नेथे गुज न सांगे अंतरीचे ॥५॥
जन्मोनि सांकडे घातले वो कैसे गिलि मज ऐसे वाटतसे ॥६॥
मी भावासि भुललो सांपडलो वाचे हाती करिल काय अंती न कही ॥७॥
एक वेळ मज सोडवी या पासोनी । दे का मज लागोनि जीवदान ॥८॥
माझिये पे बोले मज गोविले जाते आगिले अनाथ म्हणोनि ॥९॥
अंगोळिये धरिता खांदा बोगिये आता माझे केले न चले काही॥१०॥
तू आपुलिया मनी विचारूनि पाही । नामा आपुला नेई आवडता॥११॥
माय लेक दोघे साम्राज्य करा । घ्यावे धरणीवरी सुख याचे ॥१२॥
कठिण बोल तुझे बहूसाळ ऐकिले । नाही त्वां गे पाहिले मागेंपुढे॥१३॥
आता तुझी कैसी झांकोळिली माया । मज करिसी वाया इष्ट तू गे ॥१४॥
ऐसे देवाचे बोलणे ऐकोनि उदास । नाम्या जाले क्लेश तयेवेळी॥१५॥
नामा म्हणे देवा ऐसे पैसो घडे सुशीहि पे बुडे तरी न सोडी तुज॥१६॥

11.
विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी॥१॥
दर्शना आलिया हृदयी संचरसी । देहभाव घेसी हिरोनिया॥२॥
या विश्वावेगळे नवल तुझे करणे सांगावे गाऱ्हाणे कवणालागी ॥३॥
सर्वांगे सुंदर परी हृदये कठोर । नेणसी जिव्हार मज दुर्बळीचे ॥४॥
मज अनाथाचे बाळ वेधोनि मोहिलें । बहुत दुःख झाले सांगो कोणा ॥५॥
कासया पितृभक्ति पुंडलिके केली विवसी आणिली पंढरीसी॥६॥
माय दुखवुनी मोहिसी बाळके । देवपण निकै कैसे तुझे॥७॥
याते अनुसरल्या कैची बाप माय नाठवेची सोय संसाराची ॥१८॥
ऐसियाने संग धरिला तुझा देवा । प्रत्यक्ष अनुभवा आले मज॥९॥
आता माझिया जीवीचे जाणसी ते गुज तरी काई तुज उणे होते॥१०॥
माझा नामा लावी संसाराचे सोई विनविते गोनाई केशवा॥११॥

12.
बहुत दिवस भरले पै गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये॥१॥
नामा माझा वेग देई माझ्या हाती जाऊ दे परती अनाथनाथा ॥२॥
खाऊ जेऊ तुज असोस पै देऊ । कीर्ति तुझी गाऊ जगामाजी ॥३॥
तुम काय जाणे ब्रह्मांडनायका नव्हेसी मजसारिखा एकदेशी॥४॥
अनंत ब्रह्मांडे क्षणे घडामोडीसी का मज दुर्बळीसी कष्टाविले॥५॥
तुज दुजेपणाचा सहज आला वीट । तू तव एकट एकलाची॥६॥
ऐसी कीर्ति वेद वर्णिती पुराणे । ते का लाजिरवाणे करिसी देवा ॥७॥
तू कृपेचा कोंवळा म्हणति विश्वजन । त्या तुझे निर्वाण कळले नाही ॥८॥
मैंद मुद्रा धरणे गळा तुळसीमाळा । निवटितोसि गळा न कळता॥९॥
आता आपुला भ्रमु राखे तो शहाणा झर्णे माझ्या निर्वाणा पहासी देवा॥१०॥
गोणाई म्हणे माझा नामा देऊनी हाती । अंगिकारी कीर्ति पंढरिराया॥११॥

13.
निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा॥१॥
कपट करोनि भक्तांसि तारिसी । तुझा तू ठकसी पंढरिराया॥२॥
ठकुली पुंडलिकासी न्यावया वैकुंठासी या बुद्धी आलासी पंडरिये ॥३॥
तव त्या भक्तराजे धरियेले चित्ते । परतोनि मागुते जाऊ नेदी ॥४॥
अठ्ठावीस युगे गेली विचारिता । निर्गम सर्वथा नव्हे देवा ॥५॥
मग कटावरी कर धरोनिया धीर उभा निरंतर राहिलासी॥६॥
सर्व घे प्रेमे ते हिरोनि बांधिले । विचारे साधिले कोर्णे कोणा ॥७॥
द्वारी द्वारपाळ जालासी अंकित सांग बुद्धीमंत कोण ऐसा॥८॥
नाथिलेनि करिसी आपणा गोविसी । बोल का ठेविसी नामयाते॥९॥
गोणाई म्हणे तुझे नकळे विंदान । देई कृपादान बाळ माझे॥१०॥

14.
माझे घर तुवा पूर्वीच बुडविले जे दर्शनासी आले बाळ माझे॥१॥
नेणो काय वर्म तुझे सांपडले हाती । रिघालासी चित्ती जेणे द्वारे ॥२॥
लौकिक परिहार देखील कासया । मी तुज ऐसिया बरवे जाणे ॥३॥
कटी ठेउनि कर उभा गरुडपारी हैं तव अंतरी हारपला॥४॥
नाही चळणवळण न लावी पात्या पातें । लागले निरूते लक्ष तुझे ॥५॥
तुझी याची खूण अंतरींची एकी । दाविसी लौकिकी भिन्नपण ॥६॥
सांडियेली येणे लौकिकाची लाज नव्हे माझा मज काही केल्या ॥७॥
तुझेंनि सुखे घाला आनारिमा जाला अभिमान मावळला समूळ याचा ॥८॥
देही मे असोनी विदेही दिसत । प्रेमे वोसंडत हृदयकमळी॥९॥
तू अनाथा कैवारी ऐसी वेदवाणी परी का नये अजोनी कणव तुज ॥१०॥
गोणाई म्हणे माझा नामा देई हाती लागेन पुढता-मुझे॥११॥

15.
लावोनि भवभये तुवा केले साचे । देह नव्हे याचे ऐसे केले ॥१॥
सुखभोग सर्व दिला टाकोनिया नेणे तुझ्या पायांपरते काही ॥२॥
ऐसे काय केले नामया चाळविले । समूळ बुडविले अपणांमाजी ॥३॥
आम्हा दुर्बळांचा करोनिया घात केला वाताहात घराचार ॥४॥
आता तुजविण कोणाचे साउली । पाळली पोसिली तुझी सेवा ॥५॥
संकटी उदरी वाहिली म्या आशा होता भरवसा थोर याचा ॥६॥
तव तुवा लाविला आपुलिया सर्वे नव्हे मज काही ऐसा केला ॥७॥
काया वाचा मने सांडोनिया मज अनुसरला तुज मनोभावे ॥८॥
नकळे तुझी माव काय या दाविले परतेनासे केले चित्त याचे॥९॥
आता माझा शीण निवारिल कोण । एका तुजविण पांडुरंगा॥१०॥
गोणाई म्हणे देवा देई जीवदान सुखाचे निधान नामा माझा॥११॥

16.
राही रखुमाई सत्यभामा माता सिकवा वो कांता बहुता परी॥१॥
संत सनकादिक साक्ष हे सकळ । येणे माझे बाळ चाळविले ॥२॥
हा काय आमुचा धनी की गोसावी । नाही ते शिकवी लेकुरासी ॥३॥
जाला देव तरी पडो याच्या पाया । मैदावे केलिया भले नव्हे॥४॥
भीड तुटलिया नेईन चोघां चारी होईल समसरी याची ॥५॥
देव काहीं] आम्ही नसति ऐकिले परी नाही देखिले ऐसे को॥६॥
दर्शथि जे जीवित्वाची हानी । नाठवे परतोनि घराचार ॥७॥
कैची वो पंढरी मी वो काय जाणे याच्या पुत्रपणे देखियेली ॥८॥
या देवासी गेटी जन्ममरण तुटी मावळली गोष्टी संसाराची ॥९॥
तुम्ही अवध्याजणी जीवाच्या सांगातिणी पुसा याचे मनी काय आहे॥१०॥
देऊनिया नामा मज लावा वाटे । गोणाई म्हणे वोखटे न करा देवा॥११॥

17.
अरे विठोबा आता पाहे मजकडे कारे केले बेर्डे बाळ माझे॥१॥
तुझे उच्छिष्ट खादले त्वां काय दिधले । भले दाखविले देवपण॥२॥
आधी त्वां तयाचे भोगू मे जाणावे । भक्ता सुख द्यावे आनंदाचे ॥३॥
गोणाई म्हणे देवा तुज बांधले दाये तरी तुज भ्यावे लागे संता ॥४॥

18.
हरी त्वां कोणाचे बरवे केले । पूर्ण आम्हा कळो आले॥१॥
नारद वैष्णव जगजेठी । त्यासी लाविली लंगोटी॥२॥
मयुरध्वज राजा भला । त्यासि करवती घातला॥३॥
बळी दानशीळ भला । तुवा पाताळ घातला ॥ ४॥
भीष्म वैष्णवांचा राव त्याचा बाणे पूजिला ठाव ॥५॥
रूक्मांगद हरिचा दास त्याचा गावच केला वोस॥६॥
बाळ एकुलते एक । ते त्वां ज्ञानीच केला शुक॥७॥
उपमन्यु बाळक पाहें । क्षीरसागरी कोंडिले आहे ॥८॥
धुरू बाळक गोजिरवाणे । त्याचे खुंटले येणे जाणे॥९॥
हरिश्चंद्र ताराराणी । डोंबा घरी वाहे पाणी॥१०॥
प्रल्हाद भक्तीचा भुकेला । त्याचा बाप त्वां वधिला॥११॥
हनुमंत भक्त निकट । त्यासी केले तू मर्कट॥१२॥
पुण्यवंत राजा नळ । त्याचा केला तुवा छळ॥१३॥
श्रियाळ राजा भला त्याचा बाळ त्वां खादला॥१४॥
तुज कोणी न म्हणे भले बाळ पोटीचे कोवळे॥१५॥
जिकडे तिकडे तुम्ही दोघे तिकडे तिसरा नामा मागे॥१६॥
तुज नाही जाती कुळ । जेऊनि भ्रष्टविले बाळ॥१७॥
जेणे तुझे नाम घेतले । ते संसारावेगळे केले॥१८॥
आता जेविसी तरी तुज आण ऐकोनि हांसे जगज्जीवन॥१९॥
नामा दिला माते हाती । नयन भरले अश्रुपाती ॥२०॥
माय पाहे नामदेव । तव तो जाला केशवराव॥२१॥
माय म्हणे नये कामा । तुझा ओपिला तुज नामा॥२२॥
गोणाई म्हणे हरी तुझी करणी तुजचि वरी ॥२३॥

19.
गोणाई म्हणे नाम्या वचन माझे ऐक पोटींचे बाळक म्हणोनि सांगे॥१॥
महिमेचा संसार सांडोनि आपुला संग त्वां धरिला निःसंगाचा ॥२॥
या काय मागसी तो काय देईल । शीघ्रची नेईल वैकुंठासी॥३॥
सविल्याची लॅकुरे वर्तताती कैसी तू मज जालासी कुलक्षय ॥४॥
धनधान्य पुत्र कलत्रे नांदती । तुज अभाग्याचे चित्ती पांडुरंग ॥५॥
शिवण्या टिपण्या पातले पाणी न पाहासी परतोनि घराकडे॥६॥
कैसी तुझी भक्ती या लौकिकावेगळी संसाराची होळी केली नाम्या॥७॥
याची तुवा कैसी धरियेली कास हा तव कवणास जाला नाही ॥८॥
त्याते जे अनुसरती त्याचे नुरे काही । देव नव्हे पाही हा घरघेणा॥९॥
गोकुळी करी चोरी आफुले पोट भरी तो तुम निर्धारी देईल काई॥१०॥
लक्ष्मीसारिखी सुंदर टाकोनी वाटिका गौळणी गौळीयांच्या॥११॥
अष्टसिद्धी दासी जयाच्या कामारी कल्पवृक्ष द्वारी कामधेनु॥१२॥
बळीच्याचि घरा भीक मागू गेला । धरूनी बांधिला दारवंटा॥१३॥
कुबज्या करूप कंसाचिया दासी । जीवे भावे तिसी रतलासे॥१४॥
याते भजती त्याच्या संसाराची नासी । जडला जीवेसी नवजाय॥१५॥
ठकोनिया येणे बहु नाडियेले । तैसे तुज जाले सत्य जाण॥१६॥
गोणाई म्हणे नाम्या बरे नाही केले । घर बुडविले कुळासहित॥१७॥

20.
गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलते । तुज कोण्या दैवते वोढियेले॥१॥
लाजिरवाणे तुवा केले रे हैं जिणे । हासती पिसुने देशोदशी॥२॥
सांडी सांडी नाम्या तू हे देवपिसे बळे घर कैसे बुडवितोसी ॥३॥
नवमास उदराभीतरी वाहिला माझ्या नेणत्या बाळा चाळविले ॥४॥
तुझे द्वारी बैसोनि उपवास करिन । नामा घेऊन जाईन गुणराशी॥५॥
येथे ते होईल लटिकेंचि भांडण । नामा द्यावा म्हणे गोणाई माझा ॥६॥
गोणाई म्हणे नाम्या कळेल ते करी । स्वहित विचारी सांगो किती॥७॥

21.
पोर निर्दय जाले देवपिसे लागले । लोकाचे गोविले तेहि पोर॥१॥
नित्य करी अंघोळी धोत्रेंहि फाडिली । कळी मांडियेली याही पोरे ॥२॥
गावीचे महाजन करिती गुडघे स्नान या पोरा व्यसन अंघोळीचे ॥३॥
जन्मोजन्मी नेणो आम्ही ह्या तुळसी । या पोरे विवसी मांडियेली ॥४॥
गोणाई म्हणे नाम्या तुवा भले केले । जया वस्य केले विठोबासी॥५॥

22.
ज्याचे देव त्या सांगाते मला नवल वाटते । ॥१॥
एक बैसतो अश्वावरी एक चालती चरणचाली ॥२॥
एक जेविती मिष्टात्र एका न मिळे कोरान्न ॥३॥
गोणाई म्हणे धन्य देवा । नामयाचा संचित ठेवा ॥४॥

23.
सोये सांडिली सर्वाची जोडी केली विठोबाची ॥१॥
मायबापासी टाकिलें । ध्यान देवाचे लागले ॥२॥
स्त्री पुत्र बंधु बहिणी केली सर्वाची सांडणी ॥३॥
गणगोत इष्टमित्र सर्व जोडिले विठ्ठलपात्र ॥४॥
गोणाई म्हणे नामा । मली केली बारे सीमा॥५॥

24.
नामयाची माता विनवितसे संता म्हणे पुत्रनाथा काय करू ॥१॥
नामा चाळविला पंढरिये नेला । विठ्ठल मीनला नामदेव ॥२॥
के अन्नपाणी शिवणी टिपणी अखंड चक्रपाणि हृदयी बसे ॥३॥
संत म्हणती गोणाई विपरीत अवधारी नामा पंढरपुरी वैष्णवांमाजी ॥४॥

25.
देव जाला नामा नामा जाला देव गोणाईचा भाव पाहावया ॥१॥
हा घे तुझा नामा काय चाड आम्हा । आनंदाचा प्रेमा गोणाईसी ॥२॥
हाती धरोनिया घेऊनी चालिली फिरून पाहतीजाली तो देव ॥३॥
अगा माझ्या बापा तू कोणा हवासी मजदुर्बळासी काय होय ॥४॥
सोहळा सहस्र मुख्य अष्ट तुझ्या कांता । त्या माझिया पाता प्रवर्तती ॥५॥
पुंडलिकासी तुवा दिली आहे भाका गोणाई म्हणे तक बहु होसी ॥६॥

26.
माझा नामा मज देई जीव देईन तुझे पायी ॥१॥
पुंडलिका भुलविले । तैसे माझे बाळ केले ॥२॥
ते गा न चले मजपासी दे गा माझ्या नामयासी ॥३॥
तुज संगती जे लागले ते त्वां जितेचि मारिले ॥४॥
विठ्ठल म्हणे गोणाई आपुला नामा घेऊनी जाई ॥५॥
हाती धरोनिया गेली । गोणाई तेव्हा आनंदली ॥६॥

(संत नामदेव गाथेतील आत्मनिवेदनपर अभंग संत गोणाईच्या नाममुद्रा असलेले अभंग)

संत गोणाई अभंग गाथा समाप्त.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग