न कळेचि अदृष्टाची गत
43.
न कळेचि अदृष्टाची गती ।
न कळे कर्माकर्माची संभूती ।
न कळे मृत्यूचीही रीती ।
कैशी घडवील कोण वेळ ॥१॥
न कळे कर्माकमाची संभूती ।
न कळे होणार ते बळीवंत ।
भोगणे भोगवील अकस्मात् ।
न कळे विधीचेही लिखित ।
जे का रेखियले निढळी ॥२॥
कंसराव चिंताग्रस्त ।
उठुनी बैसला सभेआंत ।
प्रधान सेनाधिप समस्त ।
ग्लान वदने भासती ॥३॥
पुढील विचार सुचिता ।
न सुचे काहीची त्या तत्वता ।
कृष्ण धाकेंचि त्याचिया चित्ता ।
धरचि कोठे न सापडे ॥४॥
मग बोले कंसासुर ।
सेना सिध्द करा भार ।
जाऊनिया अति सत्वर ।
वधा हो कुमर नंदाचा ॥५॥
तव ते म्हणती रायाप्रती ।
बळाची तेथे न चले युकती ।
पहा ते पूतनेची शक्ती ।
इंद्रादिकासी अलोट ॥६॥
निमिषमात्रे तिची शांती ।
ठेला करुनिया श्रीपती ।
तव त्या माभळभट बोलती ।
नव्हे हे कार्य स्त्रियांचे ॥७॥
आम्हा ब्राम्हणांचे हे कृत्य ।
जाणे सकळाचेही घटित ।
दयाल आज्ञा तरी मी तेथे ।
जाऊनिया साधीन कार्यार्थ ॥८॥
निळा म्हणे बोलता ऐसे ।
अवघे उल्हासले मानसे ।
म्हणती यथार्थ हे ऐसे ।
ऋषी बोलिले माभळ ॥९॥
