नव्हती ते संत करिता
55.
नव्हती ते संत करिता कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ॥१॥
येथे नाही वेश सरते आडनांव । निवडे घावडाव व्हावा अंगी ॥२॥
नव्हती ते संत धरिता भोपाळा । पांघरती वाकाळा नव्हती संत ॥३॥
नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराण नव्हती संत ॥४॥
नव्हती ते संत वेदाच्या पठणे । कर्म आचरणे नव्हती संत ॥५॥
नव्हती संत करिता तप तीर्थाटण । सेविलिया वन नव्हती संत ॥६॥
नव्हती संत माळा मुद्रांच्या भुषणे । भस्म उधळणे नव्हती संत ॥७॥
तुका म्हणे नाही निरसला देह । तोवरी अवघे हे सांसारिक ॥८॥
