वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › ७. लंकानगरीचे निरीक्षण

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088243 · अभंग क्र. ७

7.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय सातवा ॥
रावणाचे अशोकवनात आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मारूतीचे अशोकवनात आगमन :

पूर्वप्रसंगाप्रती । दूतिकांमागें मारूती ।
आला अशोकवनाप्रती । सीता सती वंदावया ॥१॥
देखोनिया अशोकवन । हनुमान घाली लोटांगण ।
करोनिया श्रीरामस्मरण । सीतादर्शन करू निघे ॥२॥

अशोकवनाचे वर्णन :

साधावया सीता चिद्रत्‍न । हनुमान क्षण एक धरी ध्यान ।
देखोनिया अशोकवन । आले स्फुरण हनुमंता ॥३॥
जैसा श्रीरामाचा बाण । तैसे करोनि उड्डाण ।
अशोकवनामाजी जाण । आला आपण हनुमंत ॥४॥
वृक्ष सफळ आणि सरळ । वन देखोनि विशाळ ।
करी हर्षाचा गोंधळ । घोंटी लाळ मिटक्या देत ॥५॥
दाट देखोनिया झाडां । उल्लास आला माकडा ।
वृक्षोवृक्षीं उडें तडतडां । नाचवी पुढा निजपुच्छ ॥६॥
सांपडली श्रीरामाची कांता । फिटली आधिव्याधिचिंता ।
विचकोनियां निजदांतां । देवा देवतां वांकुल्या दावी ॥७॥
नारळी घडघडती घडें । हनुमान पाहे तिकडे ।
पक्व खर्जूरी देखोनि पुढे । वेगे उडे गटकावया ॥८॥
पिकले आंबे देखोनि तेथ । हनुमान डोळे मिचकावित ।
द्राक्षांचे घड लोंबत । हालवी तेथ निजपुच्छ ॥९॥
मातुलिंगी आणि नारिंगी । देखोनि हनुमान नाचे रंगी ।
माझे दांत सभाग्यभागी । फलांलागीं करंडावया ॥१०॥
फणसें परिपक्व घनदाटें । हनुमतें नखे खुडिले कांटे ।
पिकली केळें चेपोनि बोटे । निंबेम आंबटे मी नेघे ॥११॥
जांबुळें देखोनि कुळकुळितें । हनुमान विचकी दातांतें ।
आंवळें न सेवीच हातें । कार्तिकव्रतें स्वीकारी ॥१२॥
देखोनि उंबरें टेंबरें । बिब्बे विधामणें चारें बोरें ।
पिकलीं करवंदे नागरे । मिटक्या वानरे देइजेति ॥१३॥
तोरणे अळुवें मव्हकें घोटीं । वाळकें कांकड्या भरल्या पाटी ।
मोहळे मधु देखोनि दाटी । लाळ घोटी वानर ॥१४॥
भरले खर्बुजांचे भारे । देखोनि पिकलीं भोंकरे ।
उल्लास कीजे पै वानरे । पुच्छ पुढारे नाचवित ॥१५॥
देखोनि साकरेची राशी । हनुमान खाजवी दोन्ही कुशी ।
कोण खाईल या गुळासी । नाबदेसी गटकावूं ॥१६॥
देखोनिया ऊंसपेरणी । वानर नाचे पै रंगणी ।
रसे देखोनि भरली मांदणी । पुच्छ घाली त्यामाजी ॥१७॥
त्या प्रक्षाळून निर्मळ जळी । गुज सांगे पुच्छाजवळी ।
भेटलिया जनकबाळी । वनरवंदळी मग करू ॥१८॥
हनुमान पुच्छासी करकी एकांत । सीतेसी पुसोनि वृत्तांत ।
मग या फळांसी लावूं हात । तंववरी शांत त्वा असावे ॥१९॥

मारूतीचे तटावर आरोहण :

ऐसी सांगोनि निजखूण । वेगे करोनि उड्डाण ।
प्राकारावरी जाण । हनुमान आपण वळंघला ॥२०॥
अशोकवनामाझारीं । रावणाची शृगांरओवरी ।
उपराउपरी गोपुरी । हनुमान त्यावरी वळंघला ॥२१॥

तेथून त्याला दिसलेली रमणीयता :

त्यावरी बैसोनि आपण । अवलोकी अशोकवन ।
नित्य वसंते शोभायमान । सदा संपन्न फळपुष्पीं ॥२२॥
अशोकवनाचियां आंत । नित्य नांदे वसंत ।
सदा सफळित सर्व वृक्ष । देखे हनुमंत स्वानंदे ॥२३॥
शाल तमाल तरू तमाळ । सरळ शोभा अति विशाळ ।
कर्णिकारी पुष्प प्रबळ । अशोकीं विशाळ विश्रांति ॥२४॥
कल्पित्थ बिल्व चूत चंपक । पिचुमंद नीप शिंसिपक ।
आंवळी सालफळी मधुक । वृक्ष अनेक शोभती ॥२५॥
नागपंचक उधाळक । मांदार कल्पतरू पारिजातक ।
फणस पाटल नंदानक । टवटवित शोभती ॥२६॥
रजतवृक्ष कैलासगिरीं । रावणे प्रार्थोनि त्रिपुरारी ।
सार्द्रसुमनसुगंध भारी । अशोकामाझारी रजतवृक्ष ॥२७॥
विभांडोनि कुबेर नगरी । सुमनवृक्ष नानापरी ।
सुगंध न माये अंबरी । अशोकामाझारीं रावण आणी ॥२८॥
यज्ञ राखितां सुगंधिनी । सार्द्रा सुवर्णकमलिनी ।
रावण आणिलिया हिरोनी । अशोकवनी घमघमिती ॥२९॥
सुवर्ण रजतवृक्षमेळीं । पुष्पें सुगंध पांढरी पिवळीं ।
फळे स्वादिष्ठ चवी आगळी । बीजरत्‍नावळी त्यांमाजी ॥३०॥
तया बीजापासोनि पुढतीं । नव्हे वृक्षाची उत्पत्ती ।
एक वेळ फळे येती । मग शोभती नुसतींचि ॥३१॥
ऐशिया वृक्षांचिया जाती । अशोकवनी नेणो किती ।
शोभा स्वये शोभती । उडे मारूती त्यामाजी ॥३२॥
वृक्षशोभा देखिल्यावरी । मन मूर्च्छित त्यामाझारीं ।
दृष्टि जावोनी विसरे बाहेरी । सुगंध हरी घ्राणाते ॥३३॥
ऐशिया वृक्षावृक्षीं जाण । गदापाणि वीर दारूण ।
राक्षस ठेविले रक्षण । पाहे कोण तयांकडे ॥३४॥
दुर्धर वृक्षांमाझारी । हनुमान स्वइच्छा क्रीडा करी ।
राक्षसबळाची थोरी । तृणावारी गणीना ॥३५॥

त्या वनातील देवळे व प्रासाद राक्षसांनी सुरक्षित :

अशोकवनी देऊळ । रावण करी अति विशाळ ।
सहस्त्रस्तंभांचे प्रबळ । रत्‍नप्रवाळें मेखळां ॥३६॥
पाच पाचुका माणिके वरी । हिरे मुक्ताफळें हारोहारीं ।
कळस लखलखिती अंबरीं । तयावरी पताका ॥३७॥
सुवर्णवेदिका दोही बाही । रत्‍ने जडली त्यांमाजी पाही ।
ओठंगणें ठायी ठायी । दिसे भुयीं प्रतिबिंब ॥३८॥
नंदनवन चैत्रवन । त्यांहूनि दिसे शोभायमान ।
आनंदवनेंसीं समान । कैलासभुवन तेंवी शोभे ॥३९॥
वनद्वारीं प्रासादद्वारीं । राक्षस सावधान शस्त्रास्त्रीं ।
वारा यावया वाट नव्हे भीतरी । सुरासुरी दुर्धर ॥४०॥
बोट दाखविता हात तोडी । डोळा दाखविल्या डोळा फोडी ।
दुर्धर राक्षसपरवडी । कडोविकडी घर राखत ॥४१॥
लंकेप्रति आड सागर । पुढे दुर्ग अति दुर्धर ।
त्यामाजी रावण मंदिर । अति दुस्तर प्रवेश ॥४२॥
त्याहीमाजी स्त्रियांचे भुवन । अतिशयेंसी दुर्गम गमन ।
त्याचि माजी अशोकभुवन । दुर्गम गमन सुरासुरा ॥४३॥
दुर्गमी रिघावया हनुमंत । अति दक्ष आणि समर्थ ।
हेमरजतवृक्षाआंत । निःशंक क्रीडत ते ऐका ॥४४॥
असो हा वनविचार । सीतादर्शनी अति सादर ।
संमुख चालिला वानर । धरोनि सूत्र लक्षाचें ॥४५॥

सीतेची आंतर्बाह्य अवस्था :

वरीवरी सीता दिसे समळ । अंतरी रामध्यानें निर्मळ ।
बाह्य अति चिंते व्याकुळ । अंतरी निश्चळ चिन्मय राम ॥४६॥
बाह्य उपवासें आक्षिप्त । अंतरी परमानंदे तृप्त ।
बाह्य दिसे बंदीं प्राप्त । आंत निर्मुक्त चहू देही ॥४७॥
बाह्य रोडेली दिसे काष्ठ । अंतरी रामनामे धष्टपुष्ट ।
बाह्य राक्षसा मानी दुष्ट । अंतरी निर्दुष्ट आत्मा मानी ॥४८॥
बाह्य रामे दिसे वियुक्त । अंतरी श्रीरामे नित्ययुक्त ।
बाह्य दिसे दुःखाभिभूत । अंतरी सदोदित स्वानंदे ॥४९॥
बाह्य दिसे हीन दीन । अंतरी दिसे सुप्रसन्न ।
बाह्य दिसे अति खिन्न । अंतरी चैतन्यचिन्मात्रज्योति ॥५०॥
बाह्य दिसे लंके नेली । परी ते रामापासोनि नाही ढळली ।
बाह्य दिसे कोमाइली । अंतरी टवटविली श्रीरामे ॥५१॥
बाह्य दिसे मलिनांबर । अंतरी शोभे चिदंबर ।
बाह्य दिसे अनलंकार । अंतरी शृगांर श्रीरामे ॥५२॥
दिसे श्रीरामावेगळी । परी ते सबाह्य रामे रचिली ।
ऐसी देखोनि जनकबाळी । पिटिली टाळी हनुमंते ॥५३॥

सीतेचे रूपलावण्य :

सीता अनुभवी रामचंद्रा । कैसेनि कळलें वानरा ।
श्रीरामे दिधली निजमुद्रा । तेणे कपींद्रा लक्षले ॥५४॥
सांगता सीतेचे लक्षण । श्रीरामे सांगितली जी जी खूण ।
त्याची स्थिती पाहता जाण । देखे पूर्ण वानर ॥५५॥
ऐसे सीतेचे पूर्णपण । हनुमान लक्षी स्वये आपण ।
बाह्य लौकिक लक्षण । दिसे ते चिन्ह अवधारा ॥५६॥
निधानाभोंवती विवसी । तैशा राक्षसी सीतेपासीं ।
खाऊ गिळू घेऊ रक्तासी । देखे चौपांसीं हनुमंत ॥५७॥
गजपतीचे चुकोनी । पांगडीमाजी पडे हस्तिनी ।
तैसी सीता अशोकवनी । दीनवदनी दिसत ॥५८॥
नाही अभ्यंग ना स्नान । तेणे सर्वांग मलिन संपूर्ण ।
वस्त्र पीतांबर अति जीर्ण । नाही प्रावरण दुसरे ॥५९॥
कुचासी उदर आच्छादोनी । दोनी गुडघे ह्रदयी धरूनी ।
बैसली असे श्रीरामपत्‍नी । चित्ती अनुदानी श्रीराम ॥६०॥
घ्यावया श्रीरामाची भेटी । आत्मा धरिलासें कंठी ।
ऐसियापरी सीता गोरटी । देखे दृष्टी हनुमंत ॥६१॥

तिची शांत व निर्भय वृत्ती :

कराळ विकराळ दुष्ट नष्टी । भोंवत्या राक्षसींच्या कोटी ।
सीतेसी त्यांचे भय नुठी । निर्भय पोटी श्रीराम ॥६२॥
जंव नाठवे श्रीरघुनाथ । तंवचि भयाचा आवर्त ।
श्रीराम आठवल्या ह्र्दयाआंत । भवभयार्थ मग कैंचा ॥६३॥
देखता राक्षसी क्रूरदर्शन । सीता श्रीराम देखे संपूर्ण ।
वृक्षवल्ली तृण पाषाण । देखे परिपूर्ण श्रीराम ॥६४॥
भय पावले भयाप्रती । सुख पावले सुखावर्तीं ।
ऐशिया निष्ठे सीता सती । देखे मारूती आनंदें ॥६५॥
ह्रदयीं श्रीरामप्रतीती । श्रीराम देखे सर्वा भूतीं ।
भयामाजी निर्भयप्राप्ती । सीता सती सव्यें भोगी ॥६६॥
श्रीराम देखता सर्वा भूतीं । सकळ भयांसी समाप्ती ।
भय ते होय ब्रह्ममूर्ती । सुखसंवित्ती श्रीरामे ॥६७॥

अखंड नामस्मरण, नाममहिमा :

ऐसिया अनुभवेंसीं जाण । श्रीरामनाम मुख्य साधन ।
नामे निरसे जन्ममरण । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥६८॥
नामापासीं विरक्ति शांती । नामस्मरणें परम भक्ती ।
नामापासी चारी मुक्ती । नामे निश्चिती परब्रह्म ॥६९॥
नामासी नाही स्नान बंधन । नाही नामापासीं विधिविधान ।
अबद्ध नाम अति पावन । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥७०॥
नामे दूषण होय भूषण । नामे पापी अति पावन ।
नाम स्मरतां यम शरण । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥७१॥
नामासी नाही कर्मबंधन । वेगळ्या कर्मा नामस्मरण ।
अच्युतनामें कर्म पावन । हे स्मृतिवचन श्रुत्यर्थ ॥७२॥
नामी नाही अनध्यावो । नामापासीं नित्य स्वाध्यावो ।
नाम परब्रह्म स्वयमेवो । नामनिर्वाहो सभाग्य ॥७३॥
नाम चैतन्याचा मुढा । नाम परब्रह्माचा हुडा ।
ब्रह्म नामाचिया पुंढा । नाचे घडघडां स्वानंदे ॥७४॥
स्त्रियांसी रामनामस्मरण । ते भूषणाचें निजभूषण ।
अहेवपणा अहेवपण । नामे पावन स्त्रीशूद्र ॥७५॥
स्त्रियांसी गळसरी कृष्णमणी । पुरूषां गळसरी नामस्मरणी ।
ते तुटलिय़ा रांडपणीं । काळकर्मणी करावी ॥७६॥
सीतेसी श्रीराम स्वधर्म । सीतेसी श्रीराम नित्यकर्म ।
सीतेसी भ्रतार श्रीराम । राम परब्रह्म सीतेसी ॥७७॥
श्रीरामनाम स्मरतां सीता । देही वर्ते विदेहता ।
भय न मानी लंकानाथा । हेंही हनुमंता कळो सरले ॥७८॥
श्रीरामनामांकित सीतापत्‍नी । भूषणा भूषणशिरोमणी ।
नामे निःशंक अशोकवनी । अनुदिनी निर्द्वंद ॥७९॥

मारूतीला भेटीची उत्सुकता :

ऐसी देखोनि जनकबाळी । हनुमान भेटीसी तळमळी ।
कराळा राक्षसींच्या किंकाळी । देखोनि जवळी शंकला ॥८०॥
जैसी नारायणाची रमा । तैसी सीता श्रीरामा ।
तिची भेटी घेता आम्हा । राक्षसी अधमा प्रतिबंध ॥८१॥
यांदेखतां भेटी घेता । या मज झोंबती सर्वथा ।
यांच्या की करिता घातां । रावण सीता वधील ॥८२॥
वधिलिया रामकांता । माझे कष्ट जाती वृथा ।
म्या मारिलियां लंकानाथा । सुख रघुनाथा उपजेना ॥८३॥
यालागी आपण तत्वता । जंव राक्षसी होती निद्रिस्ता ।
तंव वृक्षी राहू गुप्तता । एकांती सीता जंव भेटे ॥८४॥
ऐसे स्वये विचारून । हनुमान वृक्षी होय लीन ।
जेंवी का चपळ पवन । होय सुलीन आकाशी ॥८५॥
जेंवी अभ्रामाजी भास्वत । स्वये असे अति गुप्त ।
तेंवी वृक्षांमाजी हनुमंत । सावचित गुप्तत्वे ॥८६॥
जेंवी आत्मा ह्रदयाआंत । असोनि न देखती समस्त ।
तेंवी वृक्षीं हनुमंत । अति गुप्त राहिला ॥८७॥
जेंवी का वेदींचा वेदार्थ । असोनि कोणा नव्हे व्यक्त ।
तेंवी वृक्षी हनुमंत । अति गुप्त राहिला ॥८८॥

अरूणोदय वेळा व वर्णन :

वृक्षीं राहता मारूती । जाहली अरूणोदयप्राप्ती ।
गौळी दोहावा करिती । गोपी आरंभिती गोरसमंथन ॥८९॥
वेदपाठक वेदाध्ययनीं । राजद्वारी मंगळध्वनी ।
ललितगंधर्व गायनीं । जयजयध्वनी देवद्वारीं ॥९०॥
अग्निहोत्रिमाज्यगंध । उन्मत्त गजांचा मदगंध ।
शुद्ध सुमनांचा सुगंध । सुधूपगंध देवालयीं ॥९१॥
नेसली प्रिया काळिमाबुंथी । सोडोनि पीतांबर दे पती ।
तेंवी अंधार त्यजोनि राती । दे गभस्ती पीतप्रभा ॥९२॥
झाली सूर्योदयप्राप्ती । व्यवहारपर त्रिजगती ।
निशाचरें लीन होती । सुखसंभूती दिवाचरा ॥९३॥
हनुमंताचे निजचित्तीं । एकांती भेटावी सीता सती ।
अति शीघ्र व्हावी राती । वृक्षांतरवर्ती तिष्ठत ॥९४॥

हनुमंताची उत्कंठा व सूर्यास्त :

ऐसे हनुमंते धरिता चित्ती । श्रीरामकार्याचे निजस्वार्थी ।
कपीस भेटावया सीता सती । गेला गभस्ती अस्तमाना ॥९५॥
जैसी श्यामसुंदर बाळी । लेइली मोतियांची जाळी ।
तैशा नक्षत्रांच्या ओळी । नभोमंडळी शोभती ॥९६॥
रात्री नव्हे ते सखी हनुमंता । भेटावया श्रीरामकांता ।
दोघा संवाद गुप्तकथा । साधू एकांता आली असे ॥९७॥
भेटावया सीता स्वामिनी । रात्री नव्हे ती सखी जननी ।
जानकी संवादपान्हा पाजूनी । समाधानीं बैसवील ॥९८॥
संवादपान्ह्याचे तुष्टपुष्टीं । अखयाक्षयासी करी भेटी ।
इंद्रजिताची पुरवोनि पाठी । राक्षसकोटी गांजील ॥९९॥
रात्री नव्हे ते महाकाळी । येवोन हनुमंताजवळी ।
भेटवोनि जनकबाळी । करीळ होळी लंकेची ॥१००॥
रात्री नव्हे ते सप्तशती । शुंभनिशुंभा केली समाप्ती ।
आता येवोनि हनुमंताप्रती । करील शांती राक्षसा ॥१०१॥
रात्री नव्हे ते चामुंडा । धरोनि काळिमेचे बळबंडा ।
छेदावया रावणाच्या मुंडा । कपी प्रचंडा भेटो आली ॥१०२॥
रात्री नव्हे ते काळरात्री । प्रवेशोनि कपींद्रीं ।
रिघोनियां लंकेमाझारी । करील बोहरी राक्षसा ॥१०३॥
ऐसी देखोनिया राती । रावणा आठवें सीता सती ।
जाली विरहज्वरप्राप्ती । सीताकामार्थी सकाम ॥१०४॥
ऐसी देखोनिया राती । आनंदे उल्लासेम मारुती ।
पुढील कथेची अनुवृत्ती । सावध श्रोती परिसावी ॥१०५॥

रावणाची मन : स्थिती, सीतेचे चिंतन :

वस्त्राभरणी दूषित । दिव्यचंदन अगरूलिप्त ।
सीताकामें लंकानाथ । पुष्पसेजेंआंत तलमळी ॥१०६॥
जैसे का खदिरांगार । तैसा लागे सुमनसेजार ।
सुमनमाळा पोळी जिव्हार । चंदने शरीर तप्त होय ॥१०७॥
नावडती भोगोपचार । नावडे वीणातंती मधुर ।
नावडे स्त्रियांसी सेजार । नावडे मधुर रसपान ॥१०८॥
जैसी देखिली स्वयंवरी । तैसी आठवली सीता सुंदरीं ।
शेंदूरचर्चित भांग शिरी । चांफेगोरटी सुकुमार ॥१०९॥
कमलनयन कमलवदन । ठाणमाण गुणलक्षण ।
आठवितां घनस्तन । मूर्च्छापन्न रावण ॥११०॥
नावडे दुजयाचा संचार । नावडे गायन सुस्वर ।
सीतेने झडपिला दशशिर । भूतसंचार जानकी ॥१११॥
सीता लागली महद्‌भूत । जींवे घेईल लंकानाथ ।
झाडणी भरणी न चले तेथ । सांडणीची मात मानीना ॥११२॥
आंवरूं न शके निजचित्ता । सीता लागली तिही अवस्था ।
धीर न धरवे लंकानाथा । सकामता विव्हळ ॥११३॥
सीताकामें कामातुर । त्यजिली शय्या स्त्रीशेजार ।
अल्पही होता संचार । कोपे दुर्धर सेवकी ॥११४॥
ब्रह्मा वेद पढे घडघडाट । पढती नित्य शांतिपाठ ।
त्यांसी वारिती राजभाट । मौननिष्ठ राहा स्वामी ॥११५॥

सर्वत्र निःस्तब्ध शांतता :

दूत म्हणती बृहस्पती । वृथा बडबड करिसी किती ।
जल्पसी इंद्रसभेप्रती । तैसी वदंती न करावी ॥११६॥
नारदा वीणा आंवरीं । तुंबरा आलाप पुरे करी ।
रावणा स्वस्थता नाही शरीरी । नाचणी दूरी दवडाव्या ॥११७॥
भाटीं गर्जावें ना बाहेरीं । ब्रीदें पढावी ना कैवारीं ।
उगे रहावे समग्रीं । रावणशरीरीं अति व्यथा ॥११८॥
दूत ब्रह्मयाते नमस्कारिती । समयो नव्हे अध्ययनाप्रती ।
कोण व्यथा लंकापती । पुसे प्रजापति दूतांसी ॥११९॥

रावणाची अस्वस्थता :

दूत म्हणती हे गुप्त मात । प्रकट करों नये लोकांआंत ।
तुमचा समर्थ वचनार्थ । ऐका वृत्तांत व्यथेचा ॥१२०॥
सीतेचा भांग शेंदूराचर्चित । तोचि भाला धगधगित ।
रूतला रावणाचे ह्रदयांआंत । तेणे अस्वस्थ लंकेश ॥१२१॥
जानकीकामें रावण भ्रांत । सर्वथा नेणे निजस्वार्थ ।
हित सांगे त्याचा करी घात । सीतासन्निपात लंकेशा ॥१२२॥
ब्रह्मवंशज लंकानाथ । न सांगावा जानकीमुख्यार्थ ।
करू धांवेल अति अनर्थ । सीतासन्निपात रावणा ॥१२३॥
ऐशा सांगता एकांतगोष्टी । अशोकवन लक्षोनि दृष्टी ।
रावण कामक्षोभें उठी । सीता गोरटी देखावया ॥१२४॥
चारी महिनें म्या सीता । अशोकवनी ठेविली वृथा ।
बळेंचि भोगीन मी आता । म्हणोनि सकामता ऊठिला ॥१२५॥

अशोकवनात सीतेकडे जाणे, बरोबर स्त्रियांचा लवाजमा :

कामोन्मत्त चाले लंकापती । सवे योषिता शतानुशतीं ।
सुवर्णदीपिका घेवोनि हाती । तैल सिंचिती सुगंध ॥१२६॥
कनकदंडें युक्त माणिकी । शशांकच्छत्रें धरिली एकी ।
व्यजने वारिती अनेकी । विडिया कितेंकी देताती ॥१२७॥
कांसे पाटोळा नीलांबर । त्यासी कटिसूत्र कटार ।
किंकिणीज्वाळमाळा विचित्र । ब्रह्मसूत्र सांगद ॥१२८॥
मुकुट कुंडले अलंकार । मणि मुक्तामाळा नीळहार ।
वांकी अंदुवांचा गजर । चरणी तोडर ब्रीदांचा ॥१२९॥
सुगंध चंदनाची उटी । पदकें शोभती दशकंठीं ।
खड्ग वसवोनि मुष्टी । सीताभेटी चालिला ॥१३०॥
चालिला अशोकवनाप्रती । सवे स्त्रिया नेणो किती ।
एक दीपिका दाविती । बळी ये म्हणती पै एकी ॥१३१॥
दडापती द्राक्षांचीं आळीं । खचती नागवेलीपाळी ।
लखलखिती सोनकेळी । वरिल्या पौळी चालिला ॥१३२॥
देखोनि बनकरांचा थाट । स्त्रिया चालती घडघडाट ।
लवोन वृक्ष होती सपाट । स्पर्श दुष्ट स्त्रियांचा ॥१३३॥
स्त्रियांच्या स्पर्शाखालीं । वाटिकां वाळती समूळी ।
वृक्ष झडती पुष्पी फळी । वरिल्या पौळी चालिला ॥१३४॥
दीपिकातेजाचे कडाडी । वृक्षा होईल फलपानझडी ।
अमृतवल्ली तडातडी । रोपे रोकडीं जळतील ॥१३५॥
स्त्रिया आघातें मोडती चांफे । मोडती हेमकमळिणीचाफे ।
वारिले पौळीचे साटोपे । सीतेसमीप तो आला ॥१३६॥

रावण्याच्या येण्यामुळे मारूतीचा क्रोध :

रावण येता सीतेप्रती । कोप हनुमंताचे चित्ती ।
वृक्षीं सरसावला मारूती । लंकापतीतें घुमसावया ॥१३७॥
रावण झोंबतां सीतेंसी । बोंब नेतां रामापासी ।
सांगो जाता सुग्रीवासी । लाजेल मजसी पुरूषार्थ ॥१३८॥
हेंचि वानरे सांगों जाता । हनुमान म्हणे नपुंसकता ।
घाये मारीन लंकानाथा । न पुसता श्रीरामासी ॥१३९॥
मजदेखतां श्रीरामभाजा । गांजो जाता राक्षसराजा ।
दाही शिरें वीस भुजा । घाये पूजा करीन मी ॥१४०॥
पंचोन्मत्त रावणाचे वर्तनावरून पुढील उपक्रम :
आधींच न करावा घात । सीतेपासीं लंकानाथ ।
कैसी कैसी बोली बोलत । तो वृत्तांत ऐकों पा ॥१४१॥
सीता अनुसरली रावणासी । हे तो न घडे कदा काळेंसीं ।
जरी हा भोगील बळेंसी । तरी मी यासी धुमसीन ॥१४२॥
मानोन्मत्त पानोन्मत्त । राज्योन्मत्त बळोन्मत्त ।
ज्ञानगर्वे ज्ञानोन्मत्त । पंचोन्मत्त रावण ॥१४३॥
पंचोन्मत्त अति उन्मत्त । यालागी त्याते क्षीब म्हणत ।
सीताकामें अति भ्रांत । भ्रमोन्मत्त रावण ॥१४४॥
यापरी अशोकवनांत । लंकानाथ आणि हनुमंत ।
साधू पाहती निजस्वार्थ । तो कथार्थ अवधारा ॥१४५॥
आधींच गोड रामायण । श्रीरामाचे चरित्र गहन ।
त्याहीमाजी हनुमंतकथन । गोड निरूपण अवधारा ॥१४६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
रावणाशोकवनाभिगमनं नाम सप्तमोऽध्यायः ॥
॥ ओव्या १४६ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १४६ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग