दत्तराया करु प्रथम न
1795.
दत्तराया करु प्रथम नमन । द्वीतीय चरणा सदगुरुच्या ॥१॥
सदगुरुच्या चरणा करावा प्रणाम । मुखी नित्य नाम सद जप ॥२॥
नित्य जपा वाचे गुरुराया स्वामी । तेणे सुखधामीं प्राप्त व्हाल ॥३॥
प्राप्त व्हाल तुम्ही आत्यांतीक सुखा । जेथे जन्म दुःखा पार नाही ॥४॥
पार नाही वेदा शास्त्रे मौनावली । पुराणे ती झाली मौनरुप ॥५॥
शेष ब्रह्मा आणि इंद्र । सुर्य अग्नि चंद्र अंत नाही ॥६॥
अंत नाही त्याचा अनंत स्वरुप । अनिर्वाच्य रुप सदगुरुचे ॥७॥
सदगुरुचे रुप ते स्वयंप्रकाश । दृश्यीं जो प्रकाश सद्गुरुचा ॥८॥
सद्गुरूचा प्रेमा माझिया अंतरी । अनुभव साक्षीत्कारी झाला असे ॥९॥
झाला असे अनुभव अपरोक्ष । शास्त्री जे विवक्षा केली असे ॥१०॥
केली असे स्तुति संत महानुभावी । सदगुरु वदवी मजलावी ॥११॥
मजलागी त्यांनी दिली असे वाचा । उपकार तयाचा काय वानु ॥१२॥
काय वानु माझ्या सदगुरुदयाळा । बहुत कळवळा ज्यासी माझा ॥१३॥
ज्यासी माझा प्राण अर्पण मी केला । देहा हा विकिला सर्वस्वं मी ॥१४॥
सर्वस्वें मी वसे सदगुरुचे पायी । अन्य प्रिय नाही मजलागी ॥१५॥
मजलागी दया केली गुरुराये । ह्रुदयीं ते पाय धरियले ॥१६॥
धरियेली जीवी पाउले कोवळीं । कंठी एकावळी नाममाळा ॥१७॥
नाममाळा कंठी शोभे ही साजिरी । हृदयी गोजरीं गुरुमुर्ति ॥१८॥
गुरुमूर्ति वसे ज्याचे हृदयकमळीं । तया चंद्रमुळी मागे पुढे ॥१९॥
मागे पुढे उभा राहे तो रक्षित । कांहीच आघात येवो नेदी ॥२०॥
येवो नेदी कदा कल्पनेची बाधा । आणिक आपदा शिष्यालागीं ॥२१॥
शिष्यालागीं गुरु करिताती बोध । स्वरुप स्वानंद देती तया ॥२२॥
देती त्या गुरु अनुपम सुख । स्वानंद कौतुक त्यासी लाभे॥२३॥
त्यासी लाभे आत्मा सर्व अंतर्यामी । चिन्मयसुख धार्मीं पहुडे तो ॥२४॥
पहुडे तो नये कदाकाळीं देहा । तोचि निःसंदेहा पावलासे ॥२५॥
पावलासे ब्रह्मा अखंड परात्पर । सारासार विचार करोनिया ॥२६॥
करोनिया जेणे नित्य सनानसंध्या । दोषाची ते बाधा वारियेली ॥२७॥
वारियेली जेणे चित्तविक्षेपता । अकरोनि उपास्यता सगुणमूर्ति ॥२८॥
सगुणमुर्तीसी न म्हणावे मायीक । शास्त्र आत्यांतिक सांगतसे ॥२९॥
सांगतसे शास्त्र देवध्यान करा । विक्षेप तो वारा चित्ताचा पै ॥३०॥
चित्ताचा गेलिया विक्षेप सकळ । आवरण केवळ राहिलेसे॥३१॥
राहिलेसे जया स्वरुपावरण । त्याचे निवारण ज्ञाने होय॥३२॥
ज्ञाने अहोय परी ज्ञानप्राप्तिलागीं । साधने ती अंगी विवेकादी॥३३॥
विवेक वैराग्य शमादी ते षटक । चौथी ते देख मुमुक्षता॥३४॥
मुमुक्ष ते पुढे श्रवण मनन । निजे ते ध्यासन पाहिजें कीं॥३५॥
पाहिजें की तत्त्व पदार्थशोधन । साधने ही जाण अंतरंग॥३६॥
अंतरंग साधने करावी परमार्था । त्यागावी सर्वथा बहिरंग॥३७॥
बहिरंग साधने होय स्वर्गप्राप्ती । निष्कामी होती चित्तशुद्दी॥३८॥
चित्तशुद्धि झाल्या अंतरंगा आधिकार । विवेक निर्धार सांगतसो॥३९॥
सांगतो आता विवेकांचे तथ्य । ब्रह्मा हेंचि सत्य जगन्मिथ्या॥४०॥
मिथ्या माया कार्य जगत प्रकार । ब्रह्मा हेंचि सार विवेक हा॥४१॥
विवेक हा स्मरा अनुभवकरा । वैराग्य अवधारा एकचित्तें॥४२॥
एकचित्ते करा वैराग्य श्रवण । तेणे समाधान स्वरुपी होय॥४३॥
स्वरुपी होय स्थिती वैराग्याच्या योगे । अन्ना विषसंगें सेवु नये॥४४॥
सेवुं नये विषय वमनांचें परी । विट तो अंतरी सदा असो॥४५॥
सदा असो प्रीति परमार्थालागीं । विषयी विरागी यांचें नांव॥४६॥
याचे नांव शम मनाचा निग्रहो । विषयी आग्रहो चित्ता नाहीं॥४७॥
चित्ता नाही कधी विषयाची स्फुर्ति । अंतर हे वृत्ति झाली असे॥४८॥
झाली असे सर्व इंद्रिया स्थिरता । दम हे तत्त्वता म्हणती त्या॥४९॥
म्हणती त्य औपरम स्वधर्मासी । त्यागवे विधीसी सर्वस्वची॥५०॥
सर्वस्वेचि शीत उष्णाएं साहणें । तितिक्षा म्हणनेम तयालागीं॥५१॥
तयालागीं श्रद्धा म्हणताती जनी । सदगुरुवचनीं विश्वास तो॥५२॥
विश्वास असावा वेदांतांचे ठायी । सदगुरुचे पायी लीन व्हावें॥५३॥
लीन व्हावे चित्त्त सदगुरुवचना । तोचि समाधान प्राप्त झाला॥५४॥
प्राप्त झाला प्राणी मुमुक्षतेंलागीं । प्रपंचसंसंगीं विटला तो॥५५॥
विटला संसारा आणि घरदारा । पुत्र परिवारा मिथ्या मानी॥५६॥
मिथ्या मानी सर्व प्रपंचवैभव । विषयाचे नांव नांवडें ज्यासी॥५७॥
नावडे ज्यांसी इष्ट मित्र ते सोयरे । परमार्थी वेव्हारे चित्त ज्याचें॥५८॥
चित्त ज्यांचें झाले प्रपंचासी विरक्त । त्याचे मनी आर्त सदगुरुभेटी॥५९॥
सदगुरुभेटी व्हावी ऐसे ज्याचे मनी । तो सर्वालागुनिअ विचारित॥६०॥
विचारित मला सदगुरु कैं भेटती । रात्रंदिवस चित्ती दुजे नाहीं॥६१॥
दुजे नाही तया आणिक जगांत । सदगुरु सर्वत्र दिसतसे॥६२॥
दिसतसे गुरु आसनी शयनी । आणिक भोजनी गुरु दिसे॥६३॥
गुरु दिसे जागृती स्वप्न आणि सुषप्ती । आनंद नेणई गुरुवीण॥६४॥
गुरुवीण जनी न दिसे ज्या अन्य । चित्त होय धन्य गुरु भेटी॥६५॥
गुरुभेटी होता चित्त स्थिर होय । तळमळ जाय मनांचीं तें॥६६॥
मनाची ते शंती होता पाय धरी । दंडवत करी वेळोवेळां॥६७॥
वेळोवेळां गुरुसी करी नमस्कार । जोडोनियां कर उभा राहीं॥६८॥
जोडोनियां हात पुढे गुरुराया । बोलत सखया तारा स्वामी॥६९॥
तारा स्वामी मज भवाचे सागरी । व्हावे कर्णधारी मजलागीं॥७०॥
मजलागी गुरों तुमचा आधार । वोस चराचर तुम्हांवीण॥७१॥
तुम्हावीण सखा मज नाही कोणी । वाटतें चरणी घालु मिठी॥७२॥
मिठी घालु पायंसदगुरुसमर्थ । तेणे निजस्वार्था पावतील॥७३॥
पाववीअल सुखा सदगुरु माउली । ती मज गाउली शिष्यवत्सा॥७४॥
शिष्यवत्सालागी पाजी ज्ञानदुग्ध । तेणे देह शुद्ध होय त्याचा॥७५॥
देह त्याचा केला ब्रह्मा हा गुरुनें । काय वाचा मनें चरण धरी॥७६॥
चरण धरीतसे शिष्य वेळोवेळा । माझा कळवळा असो तुम्हां॥७७॥
तुम्हावीण मज कोण हो तारील । दीन उद्धरेल कैशापरीं॥७८॥
कैशापरी मज होईल सुटका । प्रपंच लटिका वाटे केव्हां॥७९॥
केव्हा वाटे मज जगत हे मिथ्या । ब्रह्माचे सत्यत्व केव्हा पावें॥८०॥
केव्हा पावएअ मज स्वरुपचि शांती । ते मज निश्चिती सांगा स्वामी॥८१॥
सांगा स्वामी मज कृपा हो करुनी । शिष्य विनवणी करी ऐशीं॥८२॥
करी ऐशी दया मज गुरुराया । लागतसे पाया शिष्यराज॥८३॥
शिष्यराजा झाली अष्टभाव प्राप्ती । सदगुरुंनीं हाती धरियेला॥८४॥
धरियेला करी नेला एकांतांत । अंकी बैसवीत सदगुरुराव॥८५॥
सदगुरुराव बोलती त्या क्षणी । लागली उन्मनी तया लागीं॥८६॥
तयालागीं नाही देहींची आठव । स्थुल सुक्ष्म भाव मावळले॥८७॥
मावळले चारी देह चारी अवस्था । शिष्य तो तत्त्वता ब्रह्मा झाला॥८८॥
ब्रह्मा झाला तयाचा देह आत्मस्थिती । द्वैताद्वैतप्रतीत नाही जया॥८९॥
नाही जया सुखदुःखाची भावना । समुळ वासना निरसली॥९०॥
निरसली त्याची अहंकार कल्पना । सुखदुःख यातना नाही तया॥९१॥
नाही तया जीव शिव भेदाभेद । समुळ हे वाद मिथ्या झाले॥९२॥
मिथ्या झाले ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता । भोज्य भोग भोक्ता मावळला॥९३॥
मावळला तेव्हा सद्वैत प्रपंच । एक ब्रह्मा साच अनुभविलें॥९४॥
अनुभविलें तेणे अनुभव वेडावला । विचार निमाला जिये ठायीं॥९५॥
जिये ठायींगती नाही षटप्रमाणा । साधन लक्षणा ठाव कैंचा॥९६॥
ठाअव कैंचा तेथे परादिका वाच । जेथे त्या शब्दाचा लाग नाहीं॥९७॥
लाग नाही तेथे उपपत्ति युक्ति । अपरोक्ष प्रतीति लया गेली॥९८॥
लया गेली तया स्थानी मज ठेविले । सदगुरुदयाळें दीनानाथें॥९९॥
दीनानाहें तया ठायी निजविलें । नवजाती वर्णिलें गुण तया॥१००॥
एका जनार्दन गुरुपायीं लीन । ब्रह्मा परिपुर्ण अनुभविलें॥१०१॥
