विठ्ठलु नाही जये शरी
1.
विठ्ठलु नाही जये शरीरी । वाया कांगा जन्मले संसारी ।
विठ्ठलु नाही जये नगरी ते अरण्य जाणावे ॥१॥
विठ्ठलु नाही जये देशी । स्मशान भूमि ते परियेसी ।
रविशशिवीण दिशा जैसी । रसना तैसी विठ्ठलेविण ॥२॥
विठ्ठला वेगळे जितुके कर्म । विठ्ठला वेगळा जितुका धर्म ।
विठ्ठला वेगळे बोलती ब्रम्ह । तितुकाही श्रम जाणावा ॥३॥
सच्चिदानंदघन । पंढरिये परिपूर्ण ।
कर ठेवोनिया जघन । वाट पाहे भक्ताची ॥४॥
विठ्ठलेविण देवो म्हणती । ते संसार पुढती ।
विठ्ठलाविण तृप्ती । नाही प्रतीति विठ्ठलेविण ॥५॥
श्रीगुरुनिवृत्तीने दिधले । ते प्रेम कोणे भाग्ये लाधले ।
बापरखुमादेविवर विठ्ठले । ऐसे केले ज्ञानदेवा ॥६॥
