जन्माचे व्याज आपणचि
783.
जन्माचे व्याज आपणचि गिळिले ।
मुद्दलाचा ठावो नाही ऐसे केले ॥१॥
ऋणाईत नव्हे हा निर्गुणासी समंधु ।
येणे परमबोधु बोधविला ॥२॥
ऐसी आपुली साक्षी कवणे पै द्यावी ।
निवृत्ति म्हणे काही ठायी न ठेवीची ॥३॥
बापरखुमादेविवरे केला घातासी घातु ।
आपला लक्षाचा लाभु वरी दिधला ॥४॥
अर्थ :
पुन्हा जन्माला येण्याचे निमित्त जे पूर्विचे कर्म ते निवृत्तिरायांनी गिळून मुद्दलाचा ठाव ठिकाणा नाहीसा केला. या निर्गुणासी संबंध झाला असता जन्ममरणाचे ऋण राहात नाही. त्या निर्गुणाचा परमबोध श्रीगुरू निवृत्तिनाथानी मला ठसवून दिला. आता ही साक्ष स्वतःच्या अंतःकरणाशिवाय कोणी द्यावी. श्रीगुरू निवृत्तिनाध म्हणतात. हे ज्ञानदेवा तू आता आपल्याठिकाणी काही एक पापपुण्य ठेवू नकोस. याप्रमाणे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी जीवाचा घात करणारा जो संसार त्याचाच घात करून टाकला. आणि आपले जे लक्ष्यार्थस्वरूप त्याचा लाभ करून दिला असे माऊली सांगतात.
