जाणोनी अंतरी । ताळीस
3415.
जाणोनी अंतरी । ताळीसील करकर ॥१॥
तुज लागली हे खोडी । पांडुरंग बहु कुडी ॥२॥
उठविसी दारी । धरणे एखादिये परि ॥३॥
तुका म्हणे पाय । कैसे सोडीन ते पाहे ॥४॥
अर्थ :
देवाला उद्देशून महाराज म्हणतात, देवा तुला माहित आहे माझ्या अंत:करणात काय आहे तरी देखील माझ्या पाठीमागे काहीतरी मायिक पदार्थ लावून त्यात मला तू गुंतवून टाकशील आणि तुझ्या पाठीमागची करकर तू टाळशील असे तुला वाटत असेल. हे पाडूरंगा तुला ही वाईट खोड लागली आहे. तुमच्या दारामध्ये एखादा भक्त धरणे धरुन बसला तर त्याची काहीतरी समजूत काढून तुम्ही त्याला उठवून देता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पण मी तुझा भक्त आहे तुझे पाय सोडीनच कसे तू याचा विचार करुन बघ माझ्या मागे कितीही तू मायिक पदार्थांचे भुंगे लाव तरी मी तुझे पाय सोडणार नाही.
