गोकुळीं ठेवितां श्री
12.
गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ । वसुदेवास माया प्राप्त । तेणे पावला त्वरित । देह बंदिशाळे ॥१॥ तंव तुटली जडली बेडी । कपाटा पडली कडी । भव भयाच्या कडाडी । अहं कंस पावे ॥२॥ श्रीकृष्ण सांडिला मागे । पंचमहाभूत पाठी लागे । मिथ्या बंधन वाउगें । उठी मरण भये ॥३॥ कंस पुसे लवलाह्या । काय प्रसाली तुझी जाया । म्हणोनी आणिली योगमाया । वसुदेवें ॥४॥ वेगे देवकी म्हणे । कंस पुसेल जेव्हा तान्हें । तेव्हा तुवा देणे । हे तया हाती ॥५॥ ते ते देता देवकी जवळी । गर्जे ब्रह्मांड किंकाळी । टाहो फुटली आरोळी । दैत्या निधीची ॥६॥ तेणे दचकलें दुर्धर । कामक्रोधादि असुर । कंस पावला सत्वर । धरावयासी ॥७॥ वेंगी आठवा आणवी । तंव हाता आली आठवीं । कंस दचकला दुर्धर जीवी । नोहें जालेंचि विपरित ॥८॥ आठवा न दिसे डोळा । आठवी पडली गळा । कर्म न सोडी कपाळा । आले मरण मज ॥९॥ परासि मारिता जाण । मारिल्या मारी मरण । कंस भीतसे आपण । कृष्ण भय करी ॥१०॥ आठवीं उपडितां तांतडी । तंव ते ब्रह्मांड कडाडी । हातांतुन निष्टली हडबडी । कंस भयाभीतु ॥११॥ तंव ते गर्जलीं अंबरीं । पैले गोकुळी वाढे हरी । तुज सगट बोहरी । करील दैत्याकुळाची ॥१२॥ वधिता देवकीचीं बाळें । माझे पाप मज फळले । माझे निजकर्म बळे । आले मरण मज ॥१३॥ भय संचलें गाढे । तेणे पाऊल न चले पुढे । पाहता गोकुळाकडे । मूर्च्छित कंस बा ॥१४॥ आसनी भोजनीं शयनी । भये क्रृष्ण देखे नयनी । थोर भेदरा मनी । जनी वनी हरी देखे ॥१५॥ कृष्ण भयाचें मथित । कंसपणा विसरे चित्त । एकाजनार्दनी भक्त । भयें जीवन्मुक्त ॥१६॥
