वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(सीताशोक)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079833 · अभंग क्र. ३६५३

3653.
(सीताशोक)
मी अल्पमतिहीन । काय वर्णु तुझे गुण । उदकी तारिले पाषाण । हे महिमान नामाचे ॥१॥
नाम चांगले चांगले । माझे कंठी राहो भले । कपिकुळ उद्धरिले । मुक्त केले राक्षसा ॥धृपद॥
द्रोणागिरी कपिहाती । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयी ॥२॥
शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ती वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशाने ॥३॥
राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥४॥

अर्थ :
हे प्रभू रामचंद्रा मी तर अल्पबुध्दी आहे मतिहीन आहे तुझे गुण मी कसे वर्णन करु ? अहो देवा तुमच्या नामाचा महिमा एवढा मोठा आहे की ते नाम दगडावर लिहिले व दगड पाण्यात तारले गेले. देवा तुझे नाम चांगले आहे खूप चांगले आहे आणि तेच माझ्या कंठामध्ये राहू दयावे. संपूर्ण वानरकुळाचा उध्दार या नामाने केला व सर्व राक्षसांचाही उध्दार या नामाने केला. या सीतापती रामचंद्राने ज्यावेळी लक्ष्मणाला शक्तीबाण लागला त्यावेळी हनुमंताच्या हाती द्रोणागिरी पर्वत आणविला. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करुन सर्वत्र रामराज्य निर्माण करुन मोठी ख्याती केली व अयोध्येत परत गेल्यानंतर प्रथमत: भरताला प्रेमाने मिठी दिली. गौतम ऋषीच्या शापाने अहिल्या शिळा झाली व प्रभू रामचंद्राच्या चरणस्पर्शाने ती पुन्हा मनुष्य झाली अशी मोठी किर्ती प्रभू रामचंद्रांनी केली. हनुमंताने लंकेचे दहन केले ते कोणाच्या जोरावर तर रामाच्याच जोरावर. तुकाराम महाराज म्हणतात, राम जानकीचे जीव आहे, योगियांचे नीजध्यान आहे, राम राजीवलोचन आहे मी त्याचे चरण वंदन करतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग