माझे मज कळो येती अवग
1175.
माझे मज कळो येती अवगुण । काय करू मन अनावर ॥१॥
आता आड उभा राहे नारायणा । दयासिंधुपणा साच करी ॥धृपद॥
वाचा वदे परी करणे कठीण । इंद्रिया अधीन जालो देवा ॥२॥
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरी उदास मायबापा ॥३॥
अर्थ :
हे पांडुरंगा माझे मन सारखे विषयांकडे धाव घेतात माझे अवगुण मला कळून येतात पण मी काय करू ते तूच मला सांग. त्यामुळे हे नारायणा माझे मन जर विषयांकडे धाव घेऊ लागले तर त्यांना तु आडवा उभा हो त्याला विषयांकडे धाव घेऊ देऊ नकोस. आणि तुला दया संधू म्हणतात तर तुझ्या या ब्रीदाला तू खरे करून दाखव. माझी वाचा परमार्था विषयी खूप गप्पा मारते परंतु तसे वागणे तर अवघड आहे कारण मी इंद्रियांच्या अधीन झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी जसा असेल तसा असो पण मी कसाही असो तुझा दास आहे त्यामुळे हे मायबापा तू माझी उपेक्षा करू नकोस.
