तुझिया दासांचा हीन झ
2980.
तुझिया दासांचा हीन झालो दास । न धरी उदास मायबापा ॥१॥
तुजविण प्राण कैसा राहो पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥धृपद॥
आणिक माझ्या जीवे मोकलिली आस । पाहे तुझी वास पांडुरंगा ॥२॥
सर्वभावे तुज आणिला उचित । राहिलो निश्चिंत तुझे पायी ॥३॥
तुका म्हणे तुज असे माझा भार । बोलतो मी फार काय जाणे ॥४॥
अर्थ :
हे मायबापा देवा मी तुझ्या दासांचाही हीन दास झालो आहे त्यामुळे माझ्याविषयी तू उदासीनता धरु नकोस. अहो देवा तुझा वियोग मला क्षणभर देखील सहन होत नाही मग तुझ्यावाचून माझा प्राण कसा राहील हे तूच आता पाहा. हे देवा पाडूरंगा माझ्या जीवाने आता सर्व इच्छांचा त्याग केला आहे ते केवळ तुझीच वाट पाहात आहेत. कायावाचामनाने मी माझा देह तुझ्याठिकाणी अर्पण केला आहे व तो देहच तुला अर्पण करण्यासाठी योग्य आहे उचित आहे व तो तुला अर्पण करुन तुझ्या पायाच्या ठिकाणी मी निश्चिंत राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी फारच बोलतो मला काय कळतेय परंतू एवढे मात्र कळते की, माझ्या योगक्षेमाचा भार तुझ्या खांदयावर आहे.
