अद्वैत अंबुला परणीला
917.
अद्वैत अंबुला परणीला देखा ।
दुसरा विचार सांडिला ऐका ॥१॥
सांडिणी सांडिला पै घराचारु ।
दुसरा विचारु नाही केला ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलेसी घराचार ।
ठकला व्यवहार बाईयांनो ॥३॥
अर्थ :
अखंड अद्वैत स्वरुप जो परमात्मा हा नवरा समजून त्याच्या बरोबर विवाह केला. आणि दुसरा प्रापंचिक सर्व विचार टाकून दिला. सांडण्याला योग्य असा घराचार सोडून देऊन परमात्म स्वरुपांशिवाय दुसरा विचार केला नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या बरोबर ऐक्य झाले असता सर्व घराचाराचा व्यवहार टाकला असे माऊली सांगतात.
