धालो सुखे ढेकर देऊ ।
1789.
धालो सुखे ढेकर देऊ । उमटे जेवू तोवरी ॥१॥
क्रीडा करू निरांजनी । न पुरे धणी हरीसवे ॥धृपद॥
अवघे खेळो अवघ्यामधी । डाई न पडो ऐसी बुद्धि ॥२॥
तुका म्हणे वांचविता । आम्हा सत्ता समर्थ ॥३॥
अर्थ :
ज्ञानामृत सेवनाने आम्ही तृप्त झालो आहोत. आता सुखाने ढेकर देऊ ; आणि देहावर देखील तृप्ततेची लक्षणे उमटतील तोपर्यंत ज्ञानामृताचे जेवण करू. आता एकातात बसून निर्गुण हरीच्या अधिष्ठानावर सगुण हरीबरोबर खेळ करू. हा खेळ कितीही खेळला, तरी तृप्तता होत नाही. या सा-या विश्वात विश्वाशी खेळ खेळू, पण " जन्म-मरणाच्या डावात सापडणार नाही. " अशी आम्ही अलिप्त बुद्धी ठेवू. तुकाराम महाराज म्हणतात, शिवाय, काळापासून आमचे रक्षण करणारा सर्वसत्ताधीश सर्वसमर्थ हरी आहे.
