वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

मज तुरंबा का वो जिये

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074667 · अभंग क्र. ८७७

877.
मज तुरंबा का वो जिये तिये ।
जेणे वेधे हरि सोयरा होये ।
मज लावा का वो चंदन ऐसिये परीचे ।
जे लाविलियाची अनादि पुसोनि जाये वो ॥१॥
मज करा का वो माये काही एक ।
जेणे करणे ठाके अशेख ।
सरा का वो मज आडुनी मज पाहो द्या ।
आपुले मुख गे माये ॥२॥
मज शृंगारा का वो तया जोगी ।
पुढती अंग न समाय अंगी ॥
या मना पासोनी पढिये तो गोंवळु ।
तोचि तो जिव्हारी भोगीन गे माये ॥३॥
देह पालटा वो तयासाठी ।
वरच या देईन अवघी सृष्टी ।
बापरखुमादेविवरा विठ्ठल संयोगी ।
तोचि तो त्यागुन भोगी गे माय ॥४॥

अर्थ :
मला अलंकार वगैरे घालून 'जिये तिये' म्हणजे जिकडून तिकडून सर्व प्रकाराने अशी नटवा की 'जेणे वेधे' म्हणजे ज्या नटवण्याच्या योगाने हरि माझा सोयरा, माझा प्रीति करणारा होईल. माझ्या अंगाला, अशा प्रकारची उटी लावा की ज्या उटीच्या वेधाने श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती होऊन अनादि जो जन्ममरणरूपी संसार पुसोन जाईल. मला अशी काही एक युक्ति करा की ज्या करण्याने हरि प्राप्त होऊन काही एक करावयाचे राहणार नाही. आणि कर्तव्यभावही राहणार नाही. ज्याच्या योगाने श्रीकृष्ण परमात्मप्राप्ती सुखावह होईल. या दर्शनाच्या आड येणाया अशा ज्या माझ्या स्वरूपांत मावणार नाही. 'तया जोगी' म्हणजे अशा प्रकारचे मला अलंकार घाला. या सर्व प्रयत्नांचा हेतु एवढाच की मला मनापासून तो गोवळु म्हणजे श्रीकृष्ण. 'पडिये' म्हणजे अत्यंत प्रियकर वाटतो. अशा उपायाने तो प्राप्त झाला म्हणजे मग त्याचा मी 'जिव्हारी' म्हणजे अंतकरणात भोग भोगिन त्याच्या प्राप्ती करता मााझा सर्व देह पालटुन टाका. कोणी असतील त्या बाजूला सारा मध्ये आड येऊ नका. मला आपल्या त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे 'मुख पाहू द्या. ज्या शृंगाराच्या योगाने माझे अंग म्हणजे माझे स्वरूपच अंतःकरणांत भोग भोगीन. त्याच्या प्राप्तीकरिता माझा सर्व देह पालटून टाका. काय सांगू त्याच्या प्राप्तीपुढे सगळी सृष्टी तुम्हाला बक्षीस देईन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्या संयोगांत तो दुखःरूप संसार टाकून आनंदाचा फार भोग भोगीन. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग