नाही बळयोग अभ्यास कर
3264.
नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥१॥
तुझिये भेटीचे प्रेम अंतरंगी । नाही बळ अंगी भजनाचे ॥धृपद॥
काय पांडुरंगा करू बा विचार । झुरते अंतर भेटावया ॥२॥
तुका म्हणे सांगा वडिलपणे बुद्धी । तुजविण दयानिधी पुसो कोणा ॥३॥
अर्थ :
माझ्या अंगी योगाभ्यास करण्याइतके बळ नाही आणि इतर साधने व क्रिया कसे करावे हे देखील मला कळत नाही. पण देवा तुझ्या भेटीविषयी माझ्या अंतरंगात खूप प्रेम आहे साधे तुझे भजन करावे तर तेवढे देखील बळ माझ्या अंगात नाही. त्यामुळे हे पाडूरंगा मी काय करु तुझ्या भेटीसाठी विचार तरी कोणता करु कारण माझे मन तुला भेटावे यासाठी खूप झुरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हीच मला माझ्या वडिलांसारखे आहात तुमच्या भेटीसाठी काय उपाय करावा त्याची बुध्दी तुम्ही मला दयावी आणि हे दयानिधी तुमच्यावाचून तरी मी दुसऱ्या कोणाला काय विचारावे ?
