युक्ती तव झाल्या कुं
1343.
युक्ती तव झाल्या कुंठीत सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥
संतचरणी भावे ठेविले मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसे ॥धृपद॥
जाणपणे नेणे काहीचि प्रकार । साक्षी ते अंतर अंतरासी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही केले अभयदान । जेणे समाधान राहिलोसे ॥३॥
अर्थ :
संतांविषयी युक्ती आणि दृष्टांत आता कुंठित झाले आहे. आता उरले ते फक्त त्यांच्याविषयी कार्याचा भाग. संतांच्या पुढे मी भक्तिभावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो आहे. आणि त्यांच्यापुढे मी माझे दोन्ही हात जोडून उभा आहे, मी माझ्या शहाणपणाच्या जोरावर परमार्थातील कोणतेही गुढ जाण्यास गेलो तर ते मला कळत नाही याविषयी माझे मनच मला साक्षी आहे.अर्थात संतांची कृपा झाल्याशिवाय काहीही कळत नसते. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही संतजनांनी मला “भिऊ नकोस” असे अभयदान दिले त्यामुळेच मी निवांत राहिलो आहे.
