उठा पांडुरंगा प्रभात
348.
उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला । वैष्णवांचा मेळा गरुडपारी दाटला ॥1॥ वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत । सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥2॥ शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडा आडूनि पाहताती जगजेठी ॥3॥ सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ । रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ ॥4॥ रंभादिक नाचती उभ्या जोडूनि हात । त्रिशूळ डमरू घेऊनि आला गिरजेचा कांत ॥5॥ पंचप्राण आरत्या घेऊनिया देवस्त्रिया येती । भावे ओवाळिती राही रखुमाईचा पती ॥6॥ अनंत अवतार घेसी भक्तांकारणे । कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणे ॥7॥ चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी । पाठीमागे डोळे झांकुनि उभी ती जनी ॥8॥
