मथने भोगे सार । ताके
2883.
मथने भोगे सार । ताके घडे उपकार ॥१॥
बरवी सायासाची जोडी । अनुभविया ठावी गोडी ॥धृपद॥
पाक आणि रुचि । जेथे तेथे ते कइंची ॥२॥
वाढितो पंगती । तुका आवडी संगती ॥३॥
अर्थ :
दह्याचे मंथन केले तर लोणी आपल्याला मिळते आणि उरलेले ताक दुसऱ्याला दिले तर त्यात परोपकार घडते. अशा प्रकारे कष्ट केल्याने चांगला लाभ आपल्याला प्राप्त होतो आणि अनुभवी माणसाला त्या लाभाची गोडी ठाऊक असते. स्वयंपाक आणि त्या स्वयंपाकाची रुची हे एका ठिकाणी जेथे तेथे कसे येऊ शकतात परंतू ज्याला स्वयंपाकाची पूर्ण माहिती आहे त्याच्याविषयी अनुभव आहे तेथे मात्र स्वयंपाक आणि स्वयंपाकाविषयी आवड हे मात्र येतेच. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या आवडीचे ब्रम्हरसाचे भोजन संतांच्या संगतीत राहून व जे कोणी संतांच्या पंगतीत बसले आहेत त्यांना मी माझ्या आवडीचे ब्रम्ह रसाचे भजन वाढत आहे.
