डोळ्याची निशी कोणे क
803.
डोळ्याची निशी कोणे काढिली ।
की रविबिंबा हारी कोणे आणिली ॥
की काळिमा पाठी प्रकाश तरी चंद्र हा नव्हे चकोरा पारणे ।
फिटले विकासित कमोदिनी चंद्र हा न दिसे सेखी नवलावो हे तुझी बोली रया ॥१॥
तू आर्त चंद्रमा चकोरे आम्ही ।
तृप्त झालो तुझ्या नामी रया ॥धृ॥
जाणाचिया सुजाणा ।
की जीवाचिया जीवना ।
जिवलगा सोईरिया निधाना गा ऐसा ।
तो प्रकृतिपरू न कळे तुझा विचारू ।
साचारी वेवादती दाही दिशा ।
ऐसेंचि लाघव कोणा दाविसी दातारा ।
बोलु ठेविसी कोणा कैसा रया ॥३॥
आवडीमाजी लागे हे गोडी ।
नाम रसनेसी सुखनिजकिर्ति हे गाढी ।
की तुझा स्वरूपतंतू लागो या मना ।
अंतरींच्या जीवना अगा तूचि ॥४॥
लक्षालक्ष संभार नातुडे हा विचार म्हणोनी श्रुती नेति नेति ।
तो तू येकलाचि नट ना देखिलासी दातारा न कळे तुझी हेहि स्थिति ।
म्हणोनी सांडिमांडी करू नको मना सगुण जोडे ते करी प्रीति रया ॥५॥
यालागी मनेंसी बोध चाळावा की जोडलेपणे पाहावा ।
की कोणाहि या मावा इंद्रियांचिया ।
सकळ इंद्रियेंसी नगर कोंदले दशदिशी विस्तार ।
म्हणोनी तुझे रूप अनावर कोणे धरिजे दातारा ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला धीरा उघडा ।
डोळा देखिजे निधान तव मार्ग सोपा रया ॥६॥
अर्थ :
माझ्या अंतःकरणातील अज्ञान काढून ज्ञानाच्या योग्यतेला मला कोणी आणिले. तसेच सूर्याप्रमाणे तेजस्वी ज्ञानाच्या पंक्तिस कोणी बसविले. असा विचार करू लागलो तर हे मनमोहना श्रीकृष्णा हे सर्व तूंच केलेस अंधाऱ्यारात्रीत चकोराचे पारणे फेडण्याकरता व कमळांना विकसीत करण्याकरिता जसा चंद्र उगवतो त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा तू अज्ञानाच्या रात्रीमध्ये आम्हाला सुख देण्याकरिता जणू चंद्रच उदयाला आला आहेस. तुझ्या स्वरूपाविषयी हे बोलणे मोठे चमत्कारिक आहे. आम्ही चकोरासमान आर्तभक्त आहोत व आम्हाला तृप्त करणारा तू चंद्र आहेस. म्हणून तुझ्या नामाच्या ठिकाणीच आमचे फार प्रेम आहे. सर्व जाणणाऱ्या मध्ये अत्यंत सुजाण सर्व जीवांचे जीवन आपल्या भक्तांना प्रेम देणारा असा जो प्रकृतिच्या पलीकडे असणारा आनंदाचा ठेवा असा जो तू त्या तुझ्या स्वरूपाचा विचार चार वेद, सहा शास्त्रे, सर्व प्रकारे सतत विवाद करितात. पण त्यांच्यात एकविचार होत नाही. असे तुझे विचित्र लाघव असलेल्या हे दातारा श्रीविठ्ठला आम्ही कोणावर कसा बोल ठेवावा? पण एक आहे की आम्हा तुझ्या ठिकाणी प्रेम ठेवण्यामध्ये तसेच तुझ्या नामाचा उच्चार करण्यामध्ये व तुझी अगाध कीर्ति वर्णन करण्यामध्ये गोडी वाटते. म्हणून हा तुझा स्वरूप प्रेमतंतू माझ्या मनाला लागावा कारण सर्वाच्या अंतरी वास करणारा असा तूंच आहेस. लक्षअलक्ष असा जो शास्त्रीय गंभीर विचार त्या विचाराला तू आकलन होत नाहीस. म्हणूनच तुझ्या ठिकाणी श्रुति 'नेति नेति' म्हणून थांबल्या. असा निर्गुण स्वरूप असलेला जो तू तोच तू सगुणरूपाने नटलेला आहेस. असे मी पाहिले अशी ही तुझी स्थिति कशी काय आहे. हे काही समजत नाही. म्हणून हा खटाटोप करणे चांगले नाही. फक्त सगुण स्वरूपाची प्राप्ती कशी होईल असे प्रेम माझ्या अंतःकरणांत दे. याकरिता मी निर्गुण स्वरूपाचा चाळा टाकून देऊन हा प्रत्यक्ष सगुण रूपाने जो तू प्राप्त झाला आहेस तोच पहावा असे वाटते. या निर्गुणस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही इंद्रियांनी भानगडीत कशाला पडावे ? शरीररूपी नगराच्या दाही इंद्रियांत कोदून भरलेले इतकेच काय दशदिशेला व्यापून राहिलेले असे जे तुझे स्वरूप त्याच्या प्राप्तीच्या भानगडीत आमच्या सारख्यांनी कशाला पडावें. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना धैर्य धरून उघड्या डोळ्यांनी पाहावे हा मार्ग सोपा आहे. असे माऊली सांगतात.
