उपजोनी संसारी आपुला
218.
उपजोनी संसारी आपुला आपण वैरी ।
मी माझे शरीरी घेऊनि ठेला ।
या देहाते म्हणे मी पुत्र दारा धन माझे ।
परी काळाचे हे खाजे । ऐसे नेणतु गेला ॥
काम क्रोध मद मत्सराचेनि गुणे ।
बांधला आपण नेणे भ्रमित जैसा ।
मिथ्या मोह फांसा शुक नळिके जैसा ।
मुक्त परी अपैसा पळो नेणे ॥
जळचरू आमिष गिळी ।
जैसा का लागलासे गळी ।
आपआपणापे तळमळी । सुटिका नाही ।
तैसे आरंभी विषयसुख गोड वाटे इंद्रिया ।
फळपाकी पापिया दुःख भोगी. ॥
राखोंडी फुकिता दीप न लगे जया परी ।
तैसा शब्द ब्रह्मकुसरी ज्ञान न पवे ।
व्रत तप दान तीर्थ भजन वेचिले पोटा ।
दंभाच्या खटपटा । सिणतु गेला ॥
मृगजळाची नदी दुरूनी देखोनी धांवे ।
परी गंगोदक न पवे तान्हेला जैसा ॥
तैसे विषयसुख नव्हेचि हित ।
दुःख भोगितो बहुत ।
परी सावधान नव्हे ॥
परतोनी न पाहे धावता सैरा ।
करितो येरझारा संसारीच्या ।
ज्ञानदेव म्हणे बहुंता जन्माचा अभ्यासु ।
तरीच होय सौरसु परब्रह्मी ॥
अर्थ :
ह्या संसारात जन्म घेऊन तुच तुझा वैरी झालास. मी म्हणजे हा देह हे मानु लागलास, देहाचे असणारे पुत्र, दारा व धन स्वतःचे मानु लागलास हे सर्व देहासकट काळाचा खाऊ आहे. हे मात्र विसरलास, काम क्रोध मत्सराने बांधला गेलास व मी वेगळा आहे हा भ्रम पाळत बसलास. नळीवरचा पोपट स्वतःच बध्द असतो व बांधलेला समजतो तसे तुझे झाले आहे. तु मुक्त आहेस पण बध्द समजतोस. गळाला लागणारा मासा आमिषाला भुलतो व गळ गिळतो व तिकडे अडकतो. तसेच विषयांचे आहे. ते इंद्रियाना आमिष दाखवतात. व मग सुटका होत नाही फक्त तळमळ व दुःख मिळते. राखोंडी फुंकुन अग्नी लागणार नाही तदवत शब्द ज्ञानाने ब्रह्म कळणार नाही पोटासाठी व्रत तप दान भजन व तीर्थयात्रा केल्या हा नुसता दंभ वाढवणारा शिण झाला. मृगजळ पाहुन धाव घेणाऱ्याला गंगोदक मिळत नाही तसे विषयसुख भोगणाऱ्याचे आहे. ती ही नुसती खटाटोपच आहे. व दुःखमय आहे तरी सावध होत नाहीस. नुसता संसारासाठी जन्ममरणाच्या फेऱ्यात येरझरा करत आहेस. अरे अनेक जन्म ज्याने ब्रह्माभ्यास केला त्यालाच ह्या जन्म ब्रह्मप्राप्तीची गोडी लागते असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
