ब्रम्ह सर्वगत सदा सम
4.
ब्रम्ह सर्वगत सदा सम । जेथे आनु नाही विषम ।
एसे जाणती ते अती दुर्गम । तयांचि भेटी जालिया भाग्य परम ॥१॥
ऐसे कैसियाने भेटती ते साधू । ज्याचा अतर्क्य तर्कवेना बोध ।
ज्यांसी निजानंदी आनंदु । ज्याचा परमानंदी उद्वोधु ॥२॥
पवना घालवेल पालाण । पायी चढवेल गगन ।
भुत भविष्य कळो येईल वर्तमान । परी त्या साधूचे न कळे महिमान ॥३॥
चंद्रामृत सुखे सेववेल । रवि अस्ता जाता धरवेल ।
बाह्या हेळा सागर तरवेल । परी त्या साधूची भेटी न होईल ॥४॥
जप तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल निजध्यान ।
ज्ञेय ज्ञाता विवर्जित ज्ञान । ज्ञाना ध्यानाचे मूळ हे साधुजन ॥५॥
निजवृत्तीचा करवेल निरोधु । जीवाशिवाचा भोगवेल आनंदु ।
एका जनार्दनी निजसाधु । त्यांच्या दर्शने तुटे भवबंधु ॥६॥
