पाहोनिया दिठी नवजाय
278.
पाहोनिया दिठी नवजाय भुली ।
मायेची घरकुली खेळतुसे ॥
माया मन पाही मायेसीही पर ।
परते सत्वर निमिष्य नाही ॥
खेळता बाहुली स्वप्नचि वर्तवी ।
रावोरंक दावी भेद बुध्दी ॥
बापरखुमादेवीवर अभेदु हे अभिन्न ।
हरिरुपी लीन जीव शिवी ॥
अर्थ :
इतर विषयाला न भुलता आत्मस्वरुपाला पहा. तो परमात्मा शरीररूपी मायेच्या घरात खेळत आहे. मायारुपी मनाने मायेकडे पाहिलेस तर त्या परमात्म्याला पहाण्यास क्षणभर वेळ लागणार नाही. त्याचा हा विलास खरा नसून स्वप्नाप्रमाणे भासतो व तेथे राजा व रंक असा भेद राहात नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल यांच्या ठिकाणी जीव शिवादी भेद मावळतात व ते अभेद स्वरुप आहेत असे माऊली सांगतात.
