कृपेच्या सागरा भक्तक
1793.
कृपेच्या सागरा भक्तकरुणाकरा | परियेसी उदारा केशिराजा ॥१॥
मज घातले संसारी काळाचे आहारी | करुणा कैसी हरि न ये तुज ॥२॥
माझी सोडवण करी कृपानिधी | तोडी हे उपाधि संसाराची ॥३॥
पुत्र कलत्र बंधु सांगाति देहाचे | बांधिले मोहाचे वज्रपाशी ॥४॥
तिही माझे चित्ती केले ताडातोडी | नाही एक घड़ी सुखलेश ॥५॥
सकळिक सांगाती संभार कामाचे | परी नेदिती नामाचे स्मरण कोणी ॥६॥
दुःखाचे डोंगर पडिले मजवरी | धांव वा श्रीहरी पांडुरंगा ॥७॥
ऐशा सुखगोष्टी न करिती मजसी कोण्ही | जालो चक्रपाणि परदेशी ॥८॥
शिणलिया न म्हणती बैस घे विश्रांति | आठवी या श्रीपति पांडुरंगा |॥९॥
सकळांचे दास्यत्व केली थोर आशा | मानिला भरंवसा होतील म्हणोनी ॥१०॥
तंव ते भजती आपुलिया हिता | न करिती माझी चिता परलोकींची ॥११॥
ऐसा दुर्जनांचा करूनि पातेरा | केला मी मातेरा आयुष्याचा ॥१२॥
कुटुंब काबाडी सदा कानकोंडा | जालो या ब्रह्मांडा भूमिभार ॥१३॥
ऐसी करुणेची वचने ऐकोनी पंढरिरायें| कटिवरूनी बाहे उभारिली ॥१४॥
ना भी नामया भय न धरी सर्वथा | माझ्या शरणागता कोण गांजी ॥१५॥
