कशी जाऊ मी वृंदावना
136.
कशी जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवी कान्हा ॥धृ॥
पैलतीरी हरी वाजवी मुरली । नदी भरली यमुना ॥१॥
कासे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करु बाई कोणाला सांगू । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरीने कौतुक केले । जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥
