संत गोरोबा कुंभार अभ
2259.
संत गोरोबा कुंभार अभंग
प्रेम अंगी सदा वाचे भगवंत । प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा ॥१॥
असे घराश्रमी करीत व्यवहार । न पडे विसर विठोबाचा ॥२॥
कालवुनी माती तुडवीत गोरा । आठवीत वरा रखूमाईच्या ॥३॥
प्रेम आंगी से झांकुनी नयन । करीत भजन विठोबाचे ॥४॥
तयाचिये कांता आणू गेली जळ । खेळतसे बाळ आंगणांत ॥५॥
रांगत लेंकरू गेले असे तेथे । तुडविले त्याते न कळता ॥६॥
तत्क्षणी त्याचा गेला तेव्हा प्राण । घेउनी जीवन आली कांता ॥७॥
पाहती तो चिखलांत दिसे रक्तमांस । केला तो आक्रोश मोठा तिने ॥८॥
पिटीयेले तेव्हा आपुले वदन । जळो हे भजन तुझे आता ॥९॥
डोळे असोनिया जाहलासी आंधळा । कोठोनी कपाळा पडलासी ॥१०॥
कसाबासी तरी कांही येती दया । कांरे बाळराया तुडविले ॥११॥
विठोबाने कैसे लावियेले वेड । नाही मागेंपुढे पाहिलेंसी ॥१२॥
निर्दयाची तुज लागली संगती । अधर्मी श्रीपति देखियेला ॥१३॥
काय तुझा याने केला असे अन्याय । दूर परता होय चांडाळा तू ॥१४॥
होती लोटोनिया केला तो परता । आग लाव आता विठोबासी ॥१५॥
ऐकूनिया शब्द सावध तो जाहला । कांगे भंग केला भजनाचा ॥१६॥
विठोबासी । माझ्या कांगे त्वा गांजिले । कर्म ओढवले बाळकाचे ॥१७॥
सांग मज ऐसे कोणाचे ते जाले । पुण्य फळा आले लेंकुराचे ॥१८॥
याजसाठी माझ्या गांजिलेंसे देवा । पाठी लागे तेव्हा मारावया ॥१९॥
हात बोट मज लावशील आता । आण तुज सर्वथा विठोबाची ॥२०॥
ऐकतांचि ऐसे ठेवियेली काठी । राहिला उगाची गोरा तेव्हा ॥२१॥
न करी तो कांही तयेसी भाषण । वर्जियेली तेणे कांता तेचि ॥२२॥
विनवीते कांता गोरिया लागुनी । न मोडी मी आण विठोबाची ॥२३॥
जाली तेव्हा श्रमी वंश बुडविला । विठोबा कोपला मजवरी ॥२४॥
मनामाजी तेणे केला तो विचार । करावे दुसरे लग्न याचे ॥२५॥
बोलाविला तिने आपुला तो पिता । सांगितली वार्ता त्याजलागी ॥२६॥
कनिष्ठ हे कन्या दे माझ्या भ्रतारा । नको या विचारा पाहू आता ॥२७॥
अवश्य म्हणूनिया विनविला गोरा । लग्नाची हे त्वरा केली तेव्हा ॥२८॥
लग्न झाल्यावरी घाली वोसंगळा । दोघीसही पाळा समानची ॥२९॥
न पाळिता आण तुम्हा विठोबाची । धरा या शब्दाची आठवण ॥॥३०॥
अवश्य म्हणोनिया निघाला तो गोरा । आला असे घरा आपूलिया ॥३१॥
कनिष्ठ स्त्रियेसी आले असे न्हाण । न करी भाषण तिसी कांही ॥३२॥
येऊ म्हणे बाई कैसा हा भ्रतार । करू मी विचार कैसा आता ॥३३॥
पहिली ती कांता बिनवी गोरियाते । अंगिकारा इते स्वामी आता ॥३४॥
मामाने ही मज घातलीसे आण । दोघींचे पाळण समान करा ॥३५॥
गेला तरी आता जावो माझा प्राण । न मोडी मी आण विठोबाची ॥३६॥
जाहल्या दोघी श्रमी कपाळ पिटिती । पुरविली पाठी विठोबाने ॥३७॥
वंश बुडविला ह्या मेल्या काळयाने । जळो थोरपण याचे आता ॥३८॥
बेडे मेले लोक घेती दरुशन । नसावे भाषण यासी कांही ॥३९॥
होवोनिया श्रमी बिसल्या घरांत । काढियेली युक्ति कनिष्ठेने ॥४०॥
म्हणे बाई आता मोडू याची आण । करील भाषण आपणची ॥४१॥
निजतो हा जेथे तेथे हो जाऊन । करावे शयन दोघीनी ते ॥४२॥
निद्रेमाजी उरस्थळी याचे हात । ठेऊ अवचित आपूलिया ॥४३॥
मग हा करील सहजचि भाषण । न लगे सांगणे कोणासी ते ॥४४॥
निद्रेमाजी गोरा जाहला तोनिमग्न । दोघींनी शयन केले तेथे ॥४५॥
उचलोनियाम कर ठेविले शरीरी । नाही देहावरी गोरा तेथे ॥४६॥
सावध होवोनी पाहियेले तेणे । अन्याय हाताने केला माझ्या ॥४७॥
विठोबाची माझ्या मोडियेली आण । टाकाबे तोडून हातचि हे ॥४८॥
घेऊनिया शस्त्र तोडियेली कर । आनंदला फार मोरा तेव्हा ॥४९॥
समजले तेव्हा लोका त्या सकळा । भक्त हा आगळा देखियेला ॥५०॥
कैसा बाई आता करावा विचार । बुडाला संसार सर्वस्व हा ॥५१॥
आता शरण जाऊ तया पांडुरंगा । करील तो चिंता आमुचीय़े ॥५२॥
सांगू वर्तमान रुक्मिणीजवळी । विनची वनमाळी आम्हांविसी ॥५३॥
शरणागता हरी नेदीच अंतर । वर्णिताती । शास्त्रे मोठींमोठी ॥५४॥
संत हे गाताती बाई सदोदीत । पाहू तो अनंत कैसा असे ॥५५॥
दोघी तेव्हा गेल्या रुक्मिणीजवळी । विनविली बाळी रुक्मिणी ॥५६॥
सांगितला तिसी सकळ वृत्तांत । विनवी हा कांत आम्हाविसी ॥५७॥
ऐकेलग बाई तुझे तो वचन । समजले पूर्ण आम्हांलागी ॥५८॥
करी माते आम्हा येवढा उपकार । न पडे विसर जन्मोजन्मी ॥५९॥
करुनी प्रार्थना आल्या त्या अश्रमा । उभा होता नामा कीर्तनासी ॥६०॥
आवडीने गोरा करीत श्रवण । आणीक सज्जन हरिभक्त ॥६१॥
नामयाने टाळी पिटीली गजरे । गोरियासी कर फुटले ते ॥६२॥
रांगत लेंकरू आले तयावेळी । मातेच्या जवळी आनंदाने ॥६३॥
आलिंगुनी तिणे धरिले ह्रदयी । झाली विठाबाई कृपावंत ॥६४॥
आलिंगुनी गोरा बोले मेघ :— शाम । करी घराश्रम सुखे आता ॥६५॥
संशयाची जात नको धरू चित्ता । आण तुज आता माझी असे ॥६६॥
ऐकोनिया गोरा वर्ते घराश्रमी । लक्ष असे नामी विठोबाच्या ॥६७॥
ऐसिया संतांचे आठविता गुण । जाती हे जळोन सर्व दोष ॥६८॥
नामदेव त्यासी करी विनवणी । ठाव ह्या चरणी तुमचीया ॥६९॥
हेंचि तुम्ही आता मज द्यावे दान । आठवीन गुण वारंवार ॥७०॥
