मधुरा उत्तरासवे नाही
3028.
मधुरा उत्तरासवे नाही चाड । अंतरंगी वाड प्रेम असो ॥१॥
प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥धृपद॥
जननिंदा होय तो बरा व्यापार । थोरवीचा भार कामा नये ॥२॥
तुका म्हणे भाव निष्ठावंत चित्ती । दया क्षमा शांत सर्वा भूती ॥३॥
अर्थ :
गोड बोलण्याविषयी तर मला अजिबात आवडच राहिली नाही केवळ हरीविषयी माझ्या अंतरंगात खूप प्रेम असो. माझ्या प्राणापेक्षा मी नारायणाला वेगळे करणार नाही मग मला कोणतेही ज्ञान नसले तरी चालेल मी मूर्ख जरी राहीलो तरी बरेच होईल. लोकांनी माझी निंदा केली तरी देखील चांगले होईल कारण मोठेपणाचे ओझे कामाला येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या चित्तामध्ये केवळ एका देवाविषयी निष्ठावंत भक्तीभाव असावा आणि सर्व भूतमात्रांविषयी मनामध्ये दया, क्षमा, शांती असावी.
