आत्मतेजे तेज रवितेज
586.
आत्मतेजे तेज रवितेज बिंबे ।
जीव शिवी बिंबे ज्ञानतेजे ॥१॥
तैसे तुज ज्ञान जाले रे हे काज ।
केशवी विराज चित्त जोडे ॥२॥
समाधीचे रुप रूपासी आले काह्या ।
पसरूनी बाह्या देती क्षेम ॥३॥
प्रवृत्ति निवृत्ति दोहींची तटाक ।
उतरलासी एक सिंधोदके ॥४॥
क्षीर नीर हरि जाला असे स्वादु ।
अवघाची गोविंदु नानादेही ॥५॥
निवृत्ति संपत्ति आलिया पै हाता ।
तत्त्वी तत्त्व निमथा उलथा तू ॥६॥
अर्थ :
सूर्यामध्ये जे तेज दिसते ते आत्मतेजाचे प्रतिबिंब आहे. त्याचप्रमाणे जीवशिवामध्ये जे ज्ञान दिसते. तेही आत्मज्ञानाचेच प्रतिबिंब आहे. त्या आत्मतेजानेच केशव जो परमात्मा त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझी चित्तवृत्ति जडून विराजमान झाली आहे. मला असे वाटते की समाधीचे रूप बाह्या पसरून जणू काय तूझ्या स्वरूपाला भेट देण्याकरीताच आले आहे. प्रपंचाची प्रवृत्ति निवृत्ति ही दोन तटाके सोडून तू एक परमात्मरूप सिंधुच बनला आहे. अशा स्थितीत क्षीरनीराचा स्वाद सर्व परमात्माच झाला आहे. आणि तो माझ्याच ठिकाणीच झाला आहे असे नाही. तर अनंत देहाच्या ठिकाणी तो सर्व गोविंदरूप परमात्माच आहे. अशी तुझी स्थिती झाल्यामुळे निवृत्ती मार्गातली जी विवेक वैराग्यादि ज्ञानसंपत्ती ती तुला आज लाभली आहे. त्यामुळे तुझ्या ठिकाणचा संसार उलथा म्हणजे परमार्थ होऊन गेला आहे. असे माऊली सांगतात
