देवाचिये पायी देई मन
2968.
देवाचिये पायी देई मना बुडी । नको धावो वोढी इंद्रियांचे ॥१॥
सर्व सुखे तेथे होती एकवेळे । न सरती काळे कल्पाती ही ॥धृपद॥
जाणे येणे खुंटे धावे वेरजार । न लगे डोंगर उसंतावे ॥२॥
सांगणे ते तुज इतुलेचि आता । मानी धन कांता विषतुल्य ॥३॥
तुका म्हणे तुझे होती उपकार । उतरो हा पार भवसिंधु ॥४॥
अर्थ :
हे मना देवाच्या पायीच तू बुडी दे इंद्रियांच्या उडीने उगाचच स्वैरभैर धावू नकोस देवाच्या पायाच्या ठिकाणी गेले की सर्व सुखाचा लाभ एकाच वेळी आपल्याला प्राप्त होतो व ते सुख असे आहे की ते कल्पातातही संपत नाही ते सुख अविनाशी आहे. अरे मना तू जर देवाच्या पायाच्या ठिकाणी बुडी दिली तर तुला जन्ममरणाच्या येरझाऱ कराव्या लागणार नाही आणि दु:खाचे डोंगर ओलांडावे लागणार नाही. हे मना आता तुला एवढेच एक सांगायचे आहे की परधन व परस्त्री हे विषतुल्य तू मान. तुकाराम महाराज म्हणतात, हे मना माझ्यावर उपकार करणे हे तुझ्या हातात आहे तू जर देवाच्या पायी बुडी दिली तर मी हा भवसागर उतरुन जाऊ शकतो.
