बरवी पाऊले पाउले । स
255.
बरवी पाऊले पाउले । सुंदर सकुमार पाउले ॥
शीतळ हरीची पाउले । गोमटी हरीची पाउले ॥
शिवासी उपदेशिले । तेचि प्रल्हादे स्मरिले ॥
उपमन्या प्रसन्न जाले । तेचि गजेंद्रे चिंतिले ॥
अहल्येसी उद्धरिले । तेचि द्रौपदीये धांविन्नले ॥
यशोदेने ओवाळिले । तेचि गोवर्धनी रंगले ॥
शकटा अंगी जे उमटले । तेचि बळीपृष्ठी शोभले ।
शिवे शक्तिप्रती कथिले । धर्मराजे ते पूजिले ।
बापरखुमादेविवरा विठ्ठले । ते विटेवरी दाविले ॥
अर्थ :
श्रीहरिची पाऊले सुंदर, सकुमार आहेत. शीतल, गोमटी, शंकराला उपदेश करणारी प्रल्हादाने स्मरण केलेली. उपमन्युला प्रसन्न झालेली, गजेंद्राने चिंतन केलेली. अहिल्येचा उद्धार केलेली, द्रौपदीकरिता धावून आलेली. यशोदेने ओवाळलेली, गोवर्धन पर्वतावर खेळांत, रंगून गेलेली. शकटासुराच्या अंगावर उमटलेली, बळीच्या पाठीवर शोभलेली, शंकराने पार्वतीला सांगितलेल धर्मराजाने पुजा केलेली. विटेवर उभा राहिलेली, अशा रितीने वर्णन केलेली माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल यांची अशी पाऊले आहेत. ती त्यांनी विटेवर दाखवली आहेत असे माऊली सांगतात.
