रुक्मिणी स्वयंवर-प्र
5.
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग पाचवा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग पाचवा
श्रीगणेशाय नम: ॥ सन्नद्ध करिता दळभार । येथे लागेल उशीर । मी एकला एकांगवीर । भीमकी घेऊनि येईन ॥१॥
जो दुजियाची वास पाहे । त्यांचे कार्य कंहीच नोहे । यश कैसेनि तो लाहे । साह्य पाहे सांगाती ॥२॥
विकल्परुक्मिया मज द्वेषी । तेणे निवारिले विवाहासी । विटंबूनि त्याचिया मुखासी ॥ रुक्मिणीसी आणीन ॥३॥
चैद्यादिक पक्षपाती । त्यासी रणी लावीन ख्याती । मी तव कोपलिया श्रीपती । त्रिजगती कोण राहे ॥४॥
जैशा दो काष्ठांच्या भरणी । मथूनि काढिजे जेवी अग्नी । तेवी अरिवीरांते त्रिभांडोनी । पवित्र रुक्मिणी आणीन ॥५॥
माझिया कोपाची भृकुटी । रणा आणीन सकळ सृष्टी । त्यामज युद्धाची आटाटी । लग्नासाठी केवढी ॥६॥
रुक्मिणीचिया लग्नासी । कवण दिवस कवणे मासी । कवण नक्षत्र ते द्विजासी । मधुसूदने पूसिले ॥७॥
सारथी बोलावूनि दारुकासि । वेगी संयोजी रथासी । जाणे असे कौंडिणपुरासी । दुजियासी कळो नेदी ॥८॥
जैसे चारी पुरुषार्थ । तैसिया वारुवी जुंपिला रथ । ऎका नांवे सुनिश्चित । जेथे श्रीकृष्णनाथ आरूढे ॥९॥
शैब्य सुग्रीव बलाहक । चौथा मेघपुष्प देख । चारी वारू अति नेटक । सारथी दारुक धुरेसी ॥१०॥
अनर्घ्यरत्नी रत्नखचित । गरुडध्वज लखलखित । लोल पताका डोलत । रथ शोभत अतिशोभा ॥११॥
शस्त्रास्त्रांचे संभार । रथी घालूनि अपार । दारुके केला नमस्कार । जोडोनि कर राहिला ॥१२॥
रथी चढला नारायण । तुरुंगी बैसविला ब्राह्मण । एक दिवसे जनार्दन । कौंडिण्यपुरा पातला ॥१३॥
नगर देखिले श्रीपती । जैसी मुमुक्षूची संपत्ती । तेथे राजा कौंडिण्यपती । विधानस्थिती करीतसे ॥१४॥
भीमक वश्य जाहला पुत्रासी । जैसा विवेक महामोहासी । कन्या नेमिली शिशुपाळासी । जीवी कृष्णासी हे द्यावी ॥१५॥
जरी असेल आमुचे भाग्य । भीमकी भाग्याची सभाग्य । भावे पावेल श्रीरंग । येणे उल्हास करीतसे ॥१६॥
नगर श्रृंगारिले वाडेकोडे । घातले कुंकुमाचे सडे । तोरणे पताका चहूकडे । महोत्साहो मांडिला ॥१७॥
गंधाक्षता कुसुममाळा । नगरनारीलोका सकळा । वस्त्रे भूषणे पाहता डोळा । जनलीला शोभतसे ॥१८॥
घाव घातला निशाणी । मंगळतुरे वेदध्वनी । हळदी लाविली रुक्मिणी । मंगळस्नान करविले ॥१९॥
पीतांबर परिधान । लेइली अलंकार भूषण । नोअरीचे दुश्चित मन । कृष्ण आगमन पाहतसे ॥२०॥
नांदीश्राद्ध देवकविधान । केले ब्राह्मणांचे पूजन । यथाविधी ब्राह्मणसंतर्पण । स्वस्तिवाचन विधीचे ॥२१॥
चहू वेदींचे ब्राह्मण । येऊनि पुरोहित आपण । अथर्वणवेदे केले हवन । ग्रहशांति दान यथोचित ॥२२॥
सोने रुपे नानावस्त्रे । घृतेंसहित तिळपात्रे । गोभूदाने विचित्रे । द्विजां नृपवरे दीधली ॥२३॥
दमघोष याचिपरी । महोत्सावो आपुले नगरी । पुत्रविवाहाचा करी । द्विजवरी यथोचित ॥२४॥
वर्हाड निघाले बाहेरी । मदगज परिवारिले भारी । सुवर्णरथांचिया हारी । वीर अश्वांवरी आरूढले ॥२५॥
चालती पायांचे मोगर । पातले कौंडिण्यपुर नगर । आणीक वर्हाडी महावीर । चैद्यभार तेही आले ॥२६॥
रुक्मिणी कृष्णासी होती दीधली । ते शिशुपाळा देऊ केली । ते संधी पाहिजे साधिली । म्हणोनि आले पक्षपाती ॥२७॥
शाल्व आणि जरासंध । विक्रदंत विदूरथ । पौंड्रक वीर अद्भुत । सैन्यभारेंशी पातले ॥२८॥
वर्हाडी मीनले ते कैसे । महामोहाचे मेहुडे जैसे । खद्योतसमुदाय निशी वसे । वीर तैसे वाटीव ॥२९॥
कृष्णतरणीचिया किरणी । मावळती रणांगणी । भीमकी उल्हासे कमळिणी । कृष्णदिनमणी देखलिया ॥३०॥
जैसे गंधर्वनगरींचे हुडे । तैसे शिशुपाळाचे वीर गाढे । वर्हाड आले वाडेकोडे । भीमकापुढे सांगितले ॥३१॥
राव सामोरा गेला त्यासी । केले सीमांतपूजनासी । सन्मानूनी समस्तांसी । जानवशासी आणिले ॥३२॥
रुक्मिणीहरणासी उद्यत । एकला गेला कृष्णनाथ । यादवसभेसी आली मात । जाहला विस्मित बळिभद्र ॥३३॥
काल आला होता ब्राह्मण । भीमकीचे पत्र घेऊन । प्रगट न करीच कृष्ण । निवारू कोण म्हणवूनी ॥३४॥
यालागी गुप्त केली मात । एकला गेला कृष्णनाथ । अतुर्बळी हा अनंत । नाही भीत कळीकाळा ॥३५॥
तो ब्राह्मण नव्हेची निश्चित । मूर्तिमंत भीमकीचा भावार्थ । भावे नेला कृष्णनाथ । एकाएकी एकला ॥३६॥
वक्रदंत जरासंध । शाल्व पौंड्रक उन्नद्ध । चैद्य मीनले सन्नद्ध । होईल युद्ध दारुण ॥३७॥
कृष्ण करील कार्यसिद्धी । हे तव न चुके त्रिशुद्धी । टाकूनि जावे युद्धसंधी । हेचि बुद्धी सर्वथा ॥३८॥
रथ कुंज पालाणा । सन्नद्ध करा चतुरंगसेना । घाव घातला निशाणा । केली गर्जना बळिभद्रे ॥३९॥
सेनापती तो सात्त्विक । भारी बळराम नेटक । यादववीरांसी हरिख । अतिसुटंक दरभाळ ॥४०॥
सुख, संतोष आणि स्वानंद । कैवल्यापाशी निजबोध । तैसा पावला हलायुध । यादववीरी हरिपाशी ॥४१॥
नातरी शमदमादि संपत्ती । बोधावेगळी नव्हे निश्चिती । तैसे कौंडिण्यपुरा येती । जेथे श्रीपती उभा असे ॥४२॥
येरीकडे राजकुमरी । अवस्था लागलीसे भारी । का पा न येचि श्रीहरि । विचार करी लिखिताचा ॥४३॥
कृष्णासी नाही विषयगोडी । म्या पत्रिका लिहिली कुडी । जे भार्या होईन आवडी । जाहली अनावडी तेणे कृष्णा ॥४४॥
आढाल ढालाची पै थोर । अभाव भावे अतिसुंदर । दाटोनि रिघो पाहे घर । वशीकरण मज करील ॥४५॥
मग मी होईन तिज आधीन । जिवे जिता करील दीन । अमना आणूनिया मन । नाचवील निजछंदे ॥४६॥
कार्याकारण समस्त । तेचि करील निश्चित । सुचित्त आणि दुश्चित्त । आंदण्या दासी आणील ॥४७॥
तिच विकल्पिया बंधु । आंदणा येईल कामक्रोधु । तिचा बोळवा गर्वमदु । घरभेदू वाटेल ॥४८॥
माझेनि आंगे थोरावेल । मज ते नांवरूप करील । विषयगोडी वाढवील । मुद्दल वेचील निजज्ञान ॥४९॥
होईल निर्लज्जा नि:शंक । मज देखो न शकती लोक । ऎसे जाणोनि निष्टंक । न योचि देख श्रीकृष्ण ॥५०॥
लिखिती चुकी पडली मोठी । पावेन शतजन्मांपाठी । हे देखोनि जगजेठी । उठाउठी न पवेची ॥५१॥
मज नाही वैराग्य कडाडी । भेटी न मागेचि रोकडी । माझिया मुखरसाची गोडी । प्रतिबंधक मज झाली ॥५२॥
शिवादि चरणरज वांछित । त्या मज पाठविल लिखित । आंगे उडी न घालीच येथ । आळसयुक्त भीमकी ॥५३॥
लिखितासाठी जरी मी सापडे । तरी का साधक शिणती गाढे । भीमकी आहे केवळ वेडे । येणे न घडे मज तेथें ॥५४॥
कृष्ण न यावया एक भावो । द्विजे देखिला देवाधिदेवो । विस्मय दाटला पाहाहो । कार्य आठवो विसरला ॥५५॥
कृष्ण देखता त्रिशुद्धी । ब्राह्मणासी लागली समाधी । हरपली मनोबुद्धी । लग्नशुद्धी कोण सांगे ॥५६॥
जे कृष्णासी मीनले । ते परतोनि नाही आले । मज आहे वेड लागले । वाट पाहे द्विजाची ॥५७॥
मायबापासी नेणता । वधूने पाठविले लिखिता । हेच जाणोनि निंदिता । येता येता परतला ॥५८॥
लग्नाआड येक राती । का पा न येची श्रीपती । परात्पर उपरियेवरती । वाट पाहात उभी असे ॥५९॥
डोळा नलगेचि शेजेशी । निद्रेमाजी देखे कृष्णासी । तेणे स्वप्न -सुषुप्तीसी । जागृतीसी नाठवे ॥६०॥
अन्न न खाय तत्त्वता । जीविता देखे कृष्णनाथा । गोडी लागली अनंता । न लगे आता धड गोड ॥६१॥
करू जाता उदकपान । घोटासवे आठवे कृष्ण । विसरली भूक तहान । लागले ध्यान हरीचे ॥६२॥
तोंडी घालिता फोडी । घेऊ विसरली ते विडी । कृष्णी लागलीसे गोडी । अनावडी विषयांची ॥६३॥
आळविल्या कानी नायके । थापटिलीया न चक्के । देह व्यापिले यदुनायके । शरीरसुखे विसरली ॥६४॥
पाय ठेविता धरणी । कृष्णा आठवी रुक्मिणी । सर्वांगी थरथरोनी । रोमांचित होऊनि ठाके ॥६५॥
लीला कमल घेता हाती । कृष्णचरण आठवती । नयनी अश्रु लोटती । कृष्णप्राप्तीलागी पिशी ॥६६॥
गोविंदे हरिले मानस । जाहली विषयभोगी उदास । पाहे द्वारकेची वास । मनी आस कृष्णाची ॥६७॥
का पा न येचि गोविंद । तरी माझेचि भाग्य मंद । नाही पूर्वपुण्य शुद्ध । म्हणौनि खेद करीतसे ॥६८॥
मग म्हणे गा कटकता । किती करू गे आहाकटा । मरमर विधातया दुष्टा । काय अदृष्टा लिहिले असे ॥६९॥
आजिचेनि हे कपाळ । कृष्णप्राप्तीविण निष्फळ । म्हणूनिया भीमकबाळ । उकसाबुकसी स्फुंदत ॥७०॥
मज नलगे विंजणवारा । तेणे अधिक होतसे उबारा । प्राण रिघो पाहे पुरा । शार्ङ्गधरावाचोनि ॥७१॥
आंगी न लावा गे चंदन । तेणे अधिकचि होय दीपन । माझे निघो पाहती प्राण । कृष्णचरण न देखता ॥७२॥
साह्य नव्हेचि गे अंबा । विन्मुख जाहली जगदंबा । आता कायसी लग्नशोभा । प्राण उभा सांडीन ॥७३॥
शिवा भवानी रुद्राणी । का पा न पवतीच कोणा । का विसरली कुळस्वामिणी । चक्रपाणी न पवेचि ॥७४॥
नेत्री अश्रूंचिया धारा । दु:खे कांपतसे थरथरा । धरिता न धरवेचि धीरा । विकळ सुंदरा जातसे ॥७५॥
तव लविन्नला डावा डोळा । बाहू स्फुरती वेळोवेळा । ही तव चिन्हे गे गोपाळा । प्राप्तिकर पै होती ॥७६॥
कृष्णे सांगितले द्विजासी । वेगी जावे भीमकीपासी । थोर चिंता होतसे तिसी । उद्वेगेसी अपार ॥७७॥
तिसी द्यावे आश्वासन । उदईक आहे तुझे लग्न । तुवा असावे समाधान । पाणिग्रहण मी करीन ॥७८॥
आठा भावांची परवडी । उभवूनि स्वानंदाची गुढी । द्विज धाविन्नला लवडसवडी । घालती उडी त्वरित ॥७९॥
भीमकी करीत असता चिंता । द्विज देखिला अवचिता । हरिखे वोसंडली चित्ता । प्रसन्नता देखोनि ॥८०॥
पहिला ब्राह्मण अतिदीन । याचे पालटलेंसे चिन्ह । दिसत आहे प्रसन्नवदन । घेऊनि कृष्ण पै आला ॥८१॥
कृष्णदर्शनासी प्राप्ती । द्विज पालटला देहस्थिती । आनंदमय जाहली वृत्ती । लिखितासाठी द्विजाची ॥८२॥
जीवप्रयाणाची सुमुहूर्तता ॥ भक्तिनवरत्नांचे तारू बुडता । धैर्याचा स्तंभ पडता । जाहला रक्षिता सुदेवो ॥८३॥
मरतया अमृतपान । किंवा अवर्षणी वर्षे घन । दुष्काळलिया जेवी मिष्टान्न । तेवी आगमन दिजाचे ॥८४॥
मोहअंधारी मणी पडला । तो युक्तीच्या हाती चांचपडिला । न सांपडता दीप लाविला । कृष्णागमनसुखाचा ॥८५॥
यापरी आला तो ब्राह्मण । कृष्णागमन भीमकीप्राण । घेऊनि आला जी संपूर्ण । जीवदानी सुदेवो ॥८६॥
ब्राह्मण म्हणे ना मी आता । घेऊनि आलो वो अनंता । देखिला गरुडध्वज झळकता । आनंद चित्ता न समाये ॥८७॥
आंगीची उतटली कांचोळी । मदिका दाटली आंगोळी । सर्वांगे हरिखली वेल्हाळी । जीवे वोवाळी द्विजाते ॥८८॥
याचिया उपकारा उत्तीर्णता । पाहता ने देखो सर्वथा । जेणे आणिले श्रीकृष्णनाथा । त्यासी म्या आता काय द्यावे ॥८९॥
यालागी हो सद्गुरूसी । उत्तीर्णता नाही शिष्यांसी । कवण द्यावे पदार्थासी । हे वेदांसी न बोलवे ॥९०॥
चिंतामणी दे चिंतिल्या अर्था । कल्पतरू तो कल्पिले देता । सद्गुरु दे निर्विकल्पता । त्यासी उत्तीर्णता कैसेनि ॥९१॥
जो चुकवी जन्ममरण । त्यासी नव्हेचि उत्तीर्ण । कोटिजन्मांचे जन्ममरण । चुकविले येणे गुरुनाथें ॥९२॥
देहे उतराई होऊ गुरुसी । तव नश्वरता या देहासी । नश्वरे अनश्वरासी । उत्तीर्णता कैसी घडे ॥९३॥
जीवे व्हवे उतराई । तव तो समूळ मिथ्या पाहीं । जीवासि जीवपण नाही । होईल कई उतराई ॥९४॥
गुरूसी उतराई होता । न देखो कवणिया पदार्था । यालागी चरणी ठेविला माथा । मौनेंकरूनि रुक्मिणी ॥९५॥
मनी देओनि साचार भावो । अति संतोषला सुदेवो । तुझेनि धर्मे आम्हा पाहा हो । कृष्णप्राप्ती साचार ॥९६॥
श्रीकृष्ण आला परिसोन । भीमकी पावली समाधान । उल्हासयुक्त जाहले मन । हर्षे त्रिभुवन कोंदले ॥९७॥
करिता अंबिकापूजन । कृष्ण करिल भीमकीहरण । एका विनवी जनार्दन । श्रोती ध्यान मज द्यावे ॥९८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे पंचम: प्रसंग: ॥५॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
